Sunday, May 19, 2024
Homeजळगावअंतःकरणातून आलेली प्रार्थना

अंतःकरणातून आलेली प्रार्थना

लतादीदींचा आवाज आपल्याला जवळून ऐकायला मिळाला हे आपले सौभाग्य आहे. त्यांच्यासाठी काही गाणी लिहिण्याचे भाग्य मला लाभले म्हणून मी स्वतःला नशीबवान समजतो. ‘किती सुंदर गाणारी गायिका होती ही,’ अशी साधीसुधी प्रतिक्रिया लतादीदींचा स्वर ऐकून देताच येत नाही. त्यांचे संगीत अंतःकरणापासून ऐकावे लागते. त्या स्वरांबद्दल मनात आदराची भावना निर्माण होते. त्यांच्या गायकीला दाद देण्यासाठी साध्या-सोप्या शब्दांची योजना आपल्याला करताच येत नाही. त्यांच्या आवाजातून आणि गायकीतून त्यांना प्रयत्नपूर्वक गावे लागते आहे असे जाणवतच नाही. हे गाणे अतिशय सहज होेते. अंतःकरणाच्या आतून आलेली ती एक प्रार्थना होती.

पूर्वजांकडून आपल्याला अनेक गोष्टी वारसा म्हणून लाभलेल्या असतात. संगीताच्या क्षेत्रात ध्रुपद, ख्याल, भजन, ठुमरी या माध्यमातून आपल्याला मोठा वारसा लाभला आहे. गेल्या शंभर वर्षांमधील चित्रपट संगीतात ऐकलेल्या विविध आवाजांचा इतिहास आपण पाहिला तर लता मंगेशकर यांचा स्वर अविचल राहिल्याचे आपल्याला दिसते. मागील शतकात अनेक मोठमोठ्या कलावंतांनी कमालीचे संगीत आपल्याला दिले. यामध्ये बडे गुलाम अली खाँ, अमीर खाँसाहेब आणि किशोरी आमोणकर यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. परंतु या सर्वांचे गाणे स्वतःचे, स्वतःसाठीचे, स्वतंत्र आहे. या बाबतीत लता मंगेशकर यांचा स्वर हा एक वेगळा वारसा म्हणून डोळ्यांपुढे येतो. दुसर्‍या व्यक्तीचा आवाज बनून गाणे ही खूपच वेगळी गोष्ट आहे. संगीतातील ही परंपरा लता मंगेशकर यांच्यापासून सुरू होते. सहगल यांनी कधी दुसर्‍यासाठी गाणे गायिले नाही. त्यांचे गायन बहुपदरी असले तरी ते स्वतःसाठीचे होते. लतादीदींचा आवाज चंद्रावर पोहोचलेला आवाज आहे. त्या नील आर्मस्ट्राँग होत्या. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा हा स्वर होता.

लतादीदींच्या गायकीच्या बाबतीत अनेक बाबी आश्चर्यकारक आहेत. उदाहरणार्थ, कथा, पात्र, परिस्थिती, चित्रपट, संगीत आणि गीत कुणाचेही असो, जर ते गाणे लतादीदी गात असतील तर ते गाणे बहुतांश लतादीदींचेच बनून जायचे. त्यानंतर कोणतेही अन्य तपशील महत्त्वाचे राहात नसत. ही खूपच मोठी गोष्ट आहे. त्यांचा आवाज, त्यातील माधुर्य आणि तयारी कमालीची होती. कलेतील समर्पणवृत्ती ही बाब इतरांनी लतादीदींकडून शिकण्याजोगी आहे. त्यांच्या गायकीत काहीतरी वेगळेपण होतं. ते सादरीकरण होतं, कसब होतं, वेगळ्या प्रकारची कला होती की आणखी काही होतं की या सर्व गोष्टींचा एक सुंदर मिलाफ होता, हा चिंतनाचा विषय. ङ्गअरेबियन नाइट्सफमधील कथांमध्ये असते तशी एक जादुई चटई त्यांनी आपल्या गाण्यांमधून अंथरून ठेवली आणि त्यावरून गेल्या 60-70 वर्षांपासून असंख्य लोकांनी जादुई सैर केली. त्यांचे ‘रसिक बलमा…’ ऐकल्यास आपण अशा प्रकारे संमोहित होतो, जणू लहान मुले जादूटोण्याच्या गोष्टी ऐकून संमोहित होतात. त्या कथांच्या प्रभावात गुंतून पडतात. सलील चौधरी यांच्यासारख्या अवघड चाली तयार करणार्‍या संगीतकाराच्या रचनांमध्ये बनारसमधील गर्दीच्या गल्ल्यांप्रमाणे कितीही अवघड जागा असल्या, तरी लतादीदी त्या जागांवरून विनासायास फिरून येत. ङ्गओ सजना, बरखा बहार आयीफ ही अशीच एक अवघड धुन असून, या चालीवर लतादीदींचे स्वर सहजतेने संचार करताना दिसले.

- Advertisement -

त्यांच्यासाठी गाणे लिहिताना नेहमी असे वाटायचे की, एखादे रूपक किंवा प्रतिमा आपण गाण्यात लिहिली तर लतादीदींची त्यावर प्रतिक्रिया काय असेल? एकदा ‘देवदास’ चित्रपटातील एका गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी गाण्यात ङ्गसरौली जैसी मीठी लागेफ असे शब्द पाहून त्यांनी विचारले, ‘ये सरौली क्या है?’ सरौली हा आंब्याचा एक प्रकार असून, अत्यंत गोड असा हा आंबा आम्ही लहानपणापासून चोखून खात आलो आहोत, असे त्यांना सांगितले. गाण्यातून हा शब्द वगळू का, असेही मी त्यांना विचारले. लतादीदी म्हणाल्या, ‘नाही, राहूदे हा शब्द. मला फक्त गोडव्याचे प्रमाण किती आहे, हे समजून घ्यायचे होते.’

पंचमदांसोबत ङ्गघरफ चित्रपटातील एका गाण्याचा सराव आम्ही करत होतो. ‘आपकी आँखों में कुछ महके हुए से ख्वाब है’ या ओळीनंतरची ओळ होती, ‘आपकी बदमाशियों के ये नये अंदाज है.’ या ओळीबद्दल पंचमदा साशंक होते. त्यांनी मला विचारले, ‘शायरीत बदमाशी कशी चालेल? हे गीत तर लतादीदी गाणार आहेत.’ मी म्हटले, ‘तुम्ही ही ओळ कायम ठेवा. लतादीदींनी नकार दिल्यास मी शब्द बदलेन.’ रेकॉर्डिंगनंतर लतादीदींना विचारले, ङ्गतुम्हाला गाणे कसे वाटले?फ मग मी विचारले, ‘ती बदमाशियां वाली ओळ..?’ त्यावर त्या म्हणाल्या, ङ्गतीच तर या गाण्यातील चांगली ओळ होती. तो शब्दच तर या गाण्याचे वेगळेपण आहे.फ लतादीदींचे हे गाणे तुमच्या स्मरणात असेल, तर ‘बदमाशियां’ शब्दाजवळ त्या हलकेच हसल्या होत्या. त्यामुळे त्या शब्दाची अभिव्यक्ती अत्यंत सुंदर भासते.लतादीदींचा आवाज आपल्याला जवळून ऐकायला मिळाला हे आपले सौभाग्य आहे. त्यांच्यासाठी काही गाणी लिहिण्याचे भाग्य मला लाभले म्हणून मी स्वतःला नशीबवान समजतो. ‘किती सुंदर गाणारी गायिका होती ही,’ अशी साधीसुधी प्रतिक्रिया लतादीदींचा स्वर ऐकून देताच येत नाही. त्यांचे संगीत अंतःकरणापासून ऐकावे लागते. त्या स्वरांबद्दल मनात आदराची भावना निर्माण होते. त्यांच्या गायकीला दाद देण्यासाठी साध्या-सोप्या शब्दांची योजना आपल्याला करताच येत नाही.

गुलजार,

ज्येष्ठ गीतकार

- Advertisment -

ताज्या बातम्या