नाशिक | प्रतिनिधी
पंचवटीतील मखमलाबाद रोडवर असलेल्या ड्रीम कॅसल परिसरात राहणाऱ्या ५१ वर्षीय व्यक्तीने सुसाईड नोटमध्ये दोघांच्या नावासह आर्थिक व्यवहारातून फसवणूक झाल्याचा उल्लेख करत आत्महत्त्या केली. सुदर्शन कारभारी सांगळे (रा. रेणुका हाईटस्, जॉगिंग ट्रॅकशेजारी) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी सुदर्शन यांचा भाऊ सचिन सांगळे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार दोघा संशयितांविरोधात भावास आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद नोंदवली आहे. सचिन हे वाहने खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांच्या फिर्यादीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सुदर्शन यांनी घरातील बेडरुममध्ये ओढणीने गळफास घेतला. ही घटना लक्षात येताच नातलगांनी खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याचवेळी सुदर्शन यांचा भाचा निखिल आव्हाड याच्या हाती सुदर्शन यांच्या हस्ताक्षरातील आत्महत्यापूर्व चिठ्ठी लागली. त्याने ही चिठ्ठी नातलगांसह पोलिसांकडे सोपवली.
दरम्यान, या सुसाईड नोटमध्ये सुदर्शन यांनी ‘कुटुंबावर प्रेम करतो, मिस्ड यू असे म्हणूण काही आर्थिक व्यवहाराचा उल्लेख केला आहे. त्यात संशयित नवनाथ परसराम टिळे (रा. थर्मल पॉवर स्टेशन, एकलहरा कॉलनी) वराम किसनराव शिंदे (रा. हिवरखेड, ता. चांदवड, जि. नाशिक) यांनी आर्थिक व्यवहारात फसवणूक केल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे संशयितांनी त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद सचिन सांगळे यांनी नोंदवली आहे. तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.
नेमके कारण व व्यवहाराचा तपास
सुसाईड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली असून आवश्यक तपास सुरू केला आहे. त्यात टिळे व शिंदे यांनी सांगळे यांच्याशी काय व्यवहार केला, किती पैसे घेणे वा देणे होते आणि कशामुळे त्यांनी हे पाऊल उचलले यादृष्टीने तपास सुरू असून दोघांना ताब्यात घेतले जाणार आहे. तसेच कुटुंबाचे जाबजबाब नोंदवले जाणार आहेत.




