सातपूर | प्रतिनिधी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत बुधवारी रात्री अंदाजे १०.३० ते ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आगीची घटना घडली. सिध्दिविनायक पॉलीमर या कंपनीत अचानक आग लागली, काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले.
आग लागल्याची माहिती मिळताच सातपूर विभागातील अग्निशामक दलाचे चार बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आग इतकी तीव्र होती की कंपनीतील यंत्रसामग्री, कच्चा माल तसेच तयार माल जळून खाक झाला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. आगीचे नेमके कारण व एकूण नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, आगीचे वृत्त समजताच परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती देताना सातपूर अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख एस. आर. पगार यांनी सांगितले की, वेळीच केलेल्या कारवाईमुळे आग शेजारील इतर उद्योगांमध्ये पसरण्यापासून रोखणे शक्य झाले.
या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लीडिंग फायरमन विजय मुसळे, लीडिंग फायरमन ताराचंद सूर्यवंशी, ट्रेनी फायरमन प्रसाद भडके, हर्षित परदेशी, रोशन गांगुर्डे, उमेश गावित, तसेच वाहनचालक रिहान सय्यद आणि संजय तूपलोंढे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




