Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखकोशिश करनेवालोंकी...

कोशिश करनेवालोंकी…

भारतातील वृद्ध महिलांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा निष्कर्ष ‘हेल्पेज इंडिया’ या संस्थेच्या अहवालात नोंदवण्यात आला आहे. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष माध्यमात प्रसिद्ध झाले आहेत. ज्येष्ठांवर होणारे अत्याचार जागरूकता जागतिक दिवस नुकताच पार पडला. त्यानिमित्त हे सर्वेक्षण करण्यात आल्याचे वृत्तात म्हंटले आहे. २०११ मध्ये साठी ओलांडलेल्या महिलांची संख्या भारतात ११ टक्के होती. त्यापुढील काळात या संख्येत भर पडली असणार. त्यात निरक्षर, विधवा महिलांचा समावेश आहे. नावावर कोणतीही मालमत्ता नसलेल्या आणि बचत नसलेल्या महिलांचे प्रमाण अनुक्रमे ६६ व ७५ टक्के आहे.

बहुसंख्य वृद्ध महिलांना सामाजिक असमानतेला सामोरे जावे लागते असेही हेल्पेज इंडियाच्या कार्यकर्त्यांचे निरीक्षण आहे. हेच या सामाजिक समस्येचे प्रमुख कारण असावे का? यासर्वेक्षणाचे निष्कर्ष महिलांना नवीन आहेत का? असमान दृष्टिकोनाचा सामना महिलांना नेहमीच करावा लागतो. महिलांना दुय्यमत्व भारतीय समाजरचनेचा एक भाग बनले आहे. मुलीच्या जन्मापासून तिच्या मृत्युपर्यन्त तेच तिच्या वाट्याला येते. दुर्दैवाने त्यात काही गैर आहे असे समाजाला, विशेषतः महिलांना देखील वाटत नाही. इतके ते त्यांच्या अंगवळणी पडले आहे. क्षमता असतांनाही सर्वच पातळ्यांवर नाकारले जाणे सहन करणे वाटते तितके सोपे नसते. महिलांनी डोके चुलीपुरते चालवावे, त्यांची हुशारी स्वयंपाकपुरीच मर्यादित ठेवावी, अन्याय गपगुमान सहन करावेत असे टोमणे ऐकतच घर आणि संसार संभाळण्याची कसरत बहुसंख्य महिला आयुष्यभर पार पाडतात.

- Advertisement -

मालमत्तेवरचा त्यांचा हक्क नाकारण्यासाठी तो हक्क समाजाने मान्य तर करायला हवा. त्याबाबतीतही काहीसा अंधारच महिलांच्या वाट्याला येतो. त्यांची निरक्षरता समाजाला खटकत नाही. नव्हे तशी गरजही समाजाला वाटत नाही हे महिलांचे खरे दुखणे आहे. महिलांनी शिकावे, त्यांच्यात निर्णयक्षमता विकसित व्हावी, त्यांनी त्यांचे मते ठामपणे मांडावी, निदान कौटुंबिक पातळीवर घेतल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेत सहभागी व्हावे असे किती लोकांना वाटते? नियमाला अपवाद असतो असे म्हंटले जाते. तसे याही बाबतीत काही अपवाद समाजात आढळतात. पण त्यांचे प्रमाण हाताच्या बोटावर मोजण्याइतके देखील नाही. ही परिस्थिती बदलावी यासाठी अनेक सामाजिक संस्था कार्यरत आहेत. तथापि महिलांना देखील पुढाकार घ्यावा लागेल. त्या ‘माणूस’ आहेत याची जाणीव त्यांना स्वतःला वारंवार करून द्यावी लागेल. अन्याय करणाऱ्याइतकाच अन्याय सहन करणाराही तितकाच दोषी असतो याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न अनेक समाजधुरीणांनी सातत्याने केला, करत आहेत. बदलाच्या प्रक्रियेत महिलांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे. मुली शिकल्या की डोक्यावर मिरे वाटतात, जास्त शहाण्या होतात, ऐकत नाहीत, स्वतःचेच मत खरे करतात असे महिलांच्या बाबतीतील अनेक भ्रम खोटे ठरवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्याची सुरुवात महिलांनी स्वतःपासून करायला हवी. घरातील मुलगा आणि मुलीचे संगोपन समान पद्धतीने करण्यापासुन बदलाचे पहिले पाऊल टाकता येऊ शकेल. ‘नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है..चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है..आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती..कोशिश करने वालों की हार नहीं होती’ यातील मर्म महिला लक्षात घेतील का?

- Advertisment -

ताज्या बातम्या