दोन वर्षांच्या शुभमच्या दुडूदुडू धावण्याचे, बोबड्या बोलांचे घरात कौतुक करण्याचे ते दिवस होते. पण वाढीच्या वयात असूनही त्याचा चेहरा फिका पडत असल्याचे त्याच्या आईबाबांच्या लक्षात आले.
एकदा पडण्याचे निमित्त होऊन त्याच्या गुडघ्याला सूज आली आणि त्याची त्वचा काळीनिळी पडली. प्राथमिक तपासणीतच त्याला रक्ताचा कॅन्सर अर्थात ल्युकेमिया झाल्याचे निष्पन्न झाले.
रक्त हा शरीरातील सर्वात कार्यक्षम घटक, रक्तवाहिन्या या शरीरातील वाहतूक यंत्रणाच असते. रक्ताचा कॅन्सर सर्व वयातील व्यक्तींना होतो. पण लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक आढळते. यात रक्तातील पांढर्या पेशींच्या निर्मितीमध्ये दोष निर्माण होतो.
अनुवंशिकता, किरणोत्सार, रासायनिक औषधे व विषाणू ही त्याचे कारणे आढळतात. अणुयुद्धानंतर हिरोशिमा व नागासकी या शहरांमध्ये असंख्य लोकांचा रक्ताचा कॅन्सर झाल्याचे आढळले ते तेथील किरणोत्सारामुळेच. औद्योगिक कारखान्यातील बेन्झीनसारख्या रसायनांमुळेही हा कॅन्सर होण्याची शक्यता असते.
रक्ताचा कॅन्सर कुठल्याही वयात होऊ शकतो. लहान मुलांमध्ये त्याचे प्रमाण जास्त आहे. ताप येणे, वारंवार सर्दी, खोकला होणे, नाकातून रक्तस्त्राव होणे, किरकोळ जखमांमधून दीर्घकाळ रक्तस्त्राव होणे, सांधे दुखणे, किरकोळ मार लागल्यावर रक्त गोठणे, सूज येणे, अशक्तपणा येणे, रक्त कमी होणे, भूक मंदावणे, यकृतावर सूज येणे, हाडांना वेदना होणे, लसिका ग्रंथींना सूज येणे ही लक्षणे आढळतात. काही रुग्णांमध्ये डोकेदुखी, उलट्या होणे, चेहरा वाकडा होणे असेही त्रास आढळतात.
रक्ताच्या तपासणीत पांढर्या पेशींची संख्या कमी किंवा अधिक आढळल्यास याचे निदान करता येते. कमरेच्या हाडातून मगज काढून त्याची तपासणी करण्यात येते.
इन्डक्शन थेरपीत रासायनिक औषधांद्वारे रक्तातील कॅन्सरच्या पेशी पूर्णपणे नष्ट केल्या जातात. आळीपाळीने याची इंजेक्शन्स रुग्णाला देण्यात येतात. कन्सॉलिडेशन किमोथेरपीत कॅन्सरग्रस्त पेशींचा समूळ नायनाट केला जातो. रासायनिक औषधे मेंदूपर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे मेंदूवर रेडिएशनद्वारे उपचार केले जातात. पाठीवर मज्जातंतूजवळ रासायनिक औषधे दिली जातात. अन्य कोणत्याही उपचारांना प्रतिसाद न देणार्या रुग्णांमध्ये बॉन मॅरो ट्रान्सप्लॅन्टचे उपचार केले जातात.
क्रॉनिक ल्युकेमिया हे संथ गतीचे असतात. रुग्णाला विशेष त्रास होत नाही. गोळ्यांच्या स्वरुपात यशस्वी उपचार उपलब्ध असल्या कारणाने रुग्ण, सर्वसामान्यांसारखे जीवन जगतात.
लहान मुलांना रक्ताचा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शतो. अलीकडच्या काळातील विविध संशोधनांमुळे रक्ताच्या कॅन्सरवरील उपचार यशस्वी होऊ शकतात. या रुग्णांचा दृढ निश्चय व सहनशीलता महत्त्वाची असते. या उपचारात रुग्णांना भरपूर पोषक आहार द्यावा. लहानग्या शुभमला किमोथेरपी देण्यात आली. सुरुवातीला त्याच्या आई-वडिलांना खूप त्रास झाला. पण शुभमने उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आणि त्याने असाध्य रोगावर मात केली.