मासिक पाळीच्या पहिल्या दिवशी, क्वचित 2-3 दिवसही पोट, कंबर, मांड्या दुखणे, मळमळ, उलटी वाटणे अशी लक्षणे काही स्त्रियांना त्यांच्या अवघड दिवसांच्या वेळी दिसतात. यालाच ‘पाळीचा त्रास’ असे म्हणतात.
पाळी येण्याच्या थोडे आधी गर्भाशयाचे आतील आवरण प्रोस्टाग्लँडीन नावाचा एक स्त्राव सोडते. त्यामुळे गर्भाशय आकुंचन पावून त्यातील रक्त व बाहेर पडण्यायोग्य स्त्रावांचा निचरा होतो. यालाच ‘पाळी आली’ असे म्हणतात. या काळात पोटात किरकोळ दुखणे नैसर्गिकच समजावे. काही स्त्रियांमध्ये मात्र याच प्रोस्टाग्लँडीनच्या अतिस्त्रावामुळे अवघड दिवसांची वर सांगितलेली लक्षणे दिसतात. त्या काळातील वेदनांमुळे मात्र 2-3 दिवस त्यांची कॉलेज, नोकरी, दिनक्रम यांची घडी विस्कटू शकते. परत पुढील पाळी येईपर्यंत मधल्या काळात काहीही त्रास नसतो. पाळी सुरू होणे (रजोदर्शन) वयाच्या 11 ते 14 वर्षांपर्यंत होते. त्यानंतर सुरुवातीची 4-5 वर्षे सहसा काही त्रास होत नाही. नंतर स्त्रीबीजाची निर्मिती दर महिन्यास सुरू होते तेव्हा हा पाळीचा त्रास ‘चारचौघींना’ सुरू होतो. काही वर्षांनंतर तो आपोआप कमीही होतो.
काही स्त्रियांना वयाच्या 30-35 वर्षांनंतर असा पाळीच्या काळातील त्रास सुरू होतो. तो मात्र नैसर्गिक नसतो. गर्भाशयाची सूज, बीजांडकोशाचे आजार अशा ओटीपोटाची सूज वाढवणार्या रोगांमुळे असे होते. या स्त्रियांनी मात्र त्वरित डॉक्टरी तपासणी व उपचार करणे आवश्यक असते.
दु:खातले सुख
17-18 व्या वर्षी सुरू होणारा काहीसा त्रास नैसर्गिक आहे व ते एक प्रकारचे सुचिन्ह आहे हे समजून घेतल्यास, त्या दिवसांकडे ‘अवघड’ म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. सुचिन्ह एवढ्यासाठी की, ते शरीर आता स्त्रीबीजही निर्मिती करू लागले आहे. याचे ते चिन्ह असते. ज्यांच्या आईला वा बहिणील असा त्रास पूर्वी झाला आहे, त्यांच्यातही दुखण्याचे प्रमाण अधिक असते. पाळी येण्याचा काळ सोडून बास्केटबॉल, सायकलिंग, धावणे, पोहणे यासारखे व्यायाम केल्याने स्नायूंचा तोल वाढून त्रास कमी होतो. आहारात फळे, कच्च्या भाज्या, नारळपाणी, दूध यांचा अंतर्भाव करावा बद्धकोष्ठाचा त्रास असल्यास त्यावर डॉक्टरी सल्ल्याने उपचार करावा.
पाळीच्या काळात कंबर, पोट शेकावे. पाण्याची पिशवी अथवा इलेक्ट्रिक पॅडचा शेक 15 मिनिटांपर्यंत असा दिवसातून 3-4 वेळा घ्यावा. ‘अॅस्पिरिन’च्या गोळीत प्रोस्टाग्लँडीन विरोधी गुण आहेत. ज्यांना अॅस्पिरीन चालते त्यांना त्यांच्यासारखे उत्तम औषध या त्रासावर नाही. सॅरिडॉन, अॅस्प्रो, अॅनासिनसारख्या गोळ्यातील महत्त्वाचा घटक अॅस्पिरिनच आहे. त्यापैकी 1-2 गोळ्या दर 6-8 तासांनी भरपूर पाण्याबरोबर सुरुवातीच्या 1-2 दिवस घ्याव्यात.
वरील उपायानंतरही असा त्रास चालूच राहिल्यास काही पाळ्यांपुरते स्त्रीबीज निर्मितीचे काम थांबवणे यासाठी डॉक्टर काही गोळ्या देऊन करू शकतील. गर्भधारणा होऊन गर्भाशय पिशवीचे तोंड योग्य प्रकारे विकसित होणे हा त्यावरील शेवटचा व हमखास इलाज आहे.
शेवटी थोडी गंमत
दिवस राहिल्यावर व पुढे बाळंतपणानंतरही काही महिने पाळीच येत नाही. त्यामुळे ते ‘अवघड’ दिवस टाळण्याचा मार्ग शोधला. 15 मुलांना जन्म देऊन तिने जवळपास आयुष्यभर पाळीच चुकवली!