हाड मोडणे
चालायला शिकत असताना मुले वरचेवर पडत असतात. यामुळे काही वेळा ग्रीनस्टिक फ्रॅक्चर होऊ शकते. यात ग्रीनस्टिकच्या अर्थाप्रमाणेच काही वेळा हाड सरळ मोडत नाही. ते फक्त वाकते आणि क्ष किरण तपासणीत हाडाच्या एकाच बाजूला तडा गेल्याचे दिसते. चालताना त्या पायावर भार टाकणे मूल टाळते आणि लगंडल्यासारखे चालू लागते. दुखत असल्याची किंवा वेदना होत असल्याची तक्रार मूल करत असेल तर त्याला इबुप्रोफेनचा एक किंवा दोन डोस द्या. परंतु तरीही तशीच लक्षणे राहिली आणि त्या भागावर सूज आली, तर लगेच डॉक्टरांकडे जा.
हाड पूर्ण मोडले असेल, परंतु वरची त्वचा नसेल, तर त्वचा न उचलता तसेच हाड बसवण्याचा प्रयत्न केला जातो. याला ‘क्लोज्ड रिडक्शन’ असे म्हणतात. हाड मोडून त्वचा फाटून हाड बाहेर पडले असेल, तर त्याला कंपाऊंड फ्रॅक्चर असे म्हणतात आणि त्यावेळी हाड बसवण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज भासते. तिला ‘ओपन रिडक्शन’ असे म्हणतात.
लांब हाडांच्या टोकाला असलेल्या एपिफिजिअल प्लेटलाही धक्का बसला असेल तर त्यावेळी ती गंभीर बाब असते. त्यावर योग्य प्रकारे उपचार केले गेले नाहीत, तर हाडांवर अनिष्ट परिणाम होतात.
खालील लक्षणे आढळली तर हाड मोडल्याचा संशय घ्यायला जागा असते
1) वेदना टिकल्या किंवा वाढल्या.
2) सूज टिकली किंवा वाढली.
3) हाडाला धक्का बसलेली जागा (किंवा हात अगर पाय) हलवता येत नसेल.
जर मुलाचे हाड मोडल्याचा संशय तुम्हाला आला, तर डॉक्टरकडे मुलाला नेण्याआधी त्याला त्या भागाची हालचाल करू देऊ नका. एखाद्या वर्तमानपत्राची घडी किंवा लाकडी किंवा प्लॅस्टिकची पट्टी जखमी भागाच्या खाली ठेवा आणि त्यावरून बँडेज बांधा. त्यामुळे त्या भागाची हालचाल थांबेल. पाठीच्या भागाच्या खाली ठेवा आणि त्यावरून बँडेज बांधा. त्यामुळे त्या भागाची हालचाल थांबेल. जर पाठीच्या मणक्याला दुखावत झाली असेल तर मुलाला हलवू नका. कारण त्यामुळे कायमस्वरुपी हानी होऊन मुलाला अर्धांगवायूचा झटका येण्याचीही शक्यता असते. अशावेळी रुग्णालयातील तातडीच्या सेवेला फोन करा.
मुरगाळणे
कोणत्याही हाडाचा सांधा मुरगाळू शकतो. परंतु तरीही घोटा मुरगाळणे ही सहसा अनेक वेळा होणारी गोष्ट असते. कारण घोट्यात अनेक छोटी छोटी हाडे अनेक स्नायूबंधांनी एकत्र जोडलेली असतात. शिवाय संपूर्ण शरीराचे वजन घोट्यावरही पडत असते.
खेळताना, उड्या मारताना किंवा धावताना सांधा एकत्रित ठेवणारा स्नायूबंध एक तर अतिरिक्त प्रमाणात ताणला जातो किंवा फाटतो. त्यामुळे सांध्याभोवती वेदनादायी सूज येते. काही वेळा घोटा मुरगाळणे अत्यंत त्रासदायक असते. कारण प्रदीर्घ काळापर्यंत सूज आणि वेदना टिकून राहतात. क्ष किरण तपासणीत खाली असलेली हाडे मोडल्याचे दिसत नाही.
वेदना आणि सूज कमी करण्यासाठी मुलाला इबुप्रोफेन दिले जाते. मुरगाळलेला सांधा उंचावर राहील. अशा प्रकारे पाय ठेवून थंड पाण्याच्या घड्या पायावर ठेवल्या तर सूज उतरण्यास मदत होते. सांधा हलू नये म्हणून चांगल्या दर्जाच्या क्रेपच्या तलम कापडाचे बँडेज बांधून ठेवा. खालच्या बाजूची हाडे मोडल्याची शक्यता असल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यानंतर सूज उतरल्यावर गरम पाण्याच्या घड्या ठेवाव्या.
योग्य, चांगल्या दर्जाच्या पादत्राणांमुळे अशा प्रकारच्या दुखापती घडून येत नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. परंतु एक वडील म्हणून मुलांना वेगवेगळ्या प्रकारच्या फॅशनच्या चपला आणि सँडल्स विकत घेण्यापासून रोखणे किती अवघड असते, हे मला माहिती आहे. त्यातही मुलींना रोेखणे अत्यंत अवघड असते. याची मला कल्पना आहे.
बोट चिरडले जाणे
लहान मुलांमध्ये ही दुखापतही सर्वसामान्यपणे आढळतेच. कार किंवा घराच्या बंद होणार्या दरवाजांच्या फटीत बोटे अडकतात आणि चिरडली किंवा चेंबली जातात. ही अत्यंत वेदनादायी जखम असून तिच्यामुळे नखामध्ये कायमस्वरुपी विकृती येऊ शकते.
रक्तस्त्राव होत नसेल किंवा सूज आली नसेल तर सौम्य जखमांच्या बाबतीत फारसे काही करण्याची गरजच नसते. जर त्वचा कापली गेली किंवा नखाखाली त्वचा फाटली आणि बोटाला सूज आली तर काळजी करण्याची गरज असते. चुरा केलेला बर्फ टाकलेल्या थंड पाण्यात कापड भिजवून तातडीने बोटावर घड्या घालायला सुरुवात करा किंवा थंड पाण्यात बोट बुडवा. नखाखाली रक्त साकळल्यामुळे भरपूर वेदना होत असतील, तर एक छोटेसे छिद्र पाडून साकळलेले रक्त बाहेर काढून टाका. डॉक्टरांना हाड मोडल्याचा संशय असेल तर ते क्ष किरण तपासणी करायला लावतील. त्यात हाड मोडल्याचे आढळले तर हाडांच्या शल्यचिकित्सकाशी सल्लामसलत केली जाते.