नंदन रहाणे
व्यक्ती तिचे कुटुंब आणि सभोवतालचे जग अशा दोन स्तरांवर जगत असते. कुटुंबासोबत असतो तो प्रपंच आणि जगाबरोबर येतो तो व्यवहार म्हणजेच माणसाभोवती ऐहिकतेचे कडे सतत पडलेले असते हे घ्या, ते घ्या, अमूक आणा, तमुक टाका, इथले आवरा, तिथे पसरा असे सतत चालते. कितीही केले तरी ते पुरे होत नाही. सगळ्यांच्या अपेक्षा पुर्या करता करता, माणूस स्वत:ला विसरूनच जातो. माणूस म्हणजे यंत्र नव्हे, माणूस म्हणजे देह नव्हे, त्याला मन असते, आत्मा असतो. त्या मनाची भूक काही वेगळीच असते ती पूर्ण करावी म्हणून आत्मा हाक घालीत असतो. ही भूक असते उन्नत विचारांची! माणसाला आपण कोण? याचा शोध सतत घ्यावासा वाटत असतो पण रोजच्या गरजा या शोधाच्या आड येतात त्या माणसाला संसारात जखडून ठेवतात…
म्हणून मग नामदेवरायांनी वारीच्या संकल्पनेचा विस्तार केला वारी म्हणजे आपल्या आवडत्या देवताच्या दर्शनासाठी, ठराविक काळाने त्या क्षेत्राला जाऊन येणे, ही वारी नामदेव-ज्ञानदेव यांच्या आधी कैक शतके अस्तित्वात होतीच. नामदेव महाराजांनी तिला सार्वजनिक रूप दिले. वैदिकांची कर्मकांडे व्यक्तिगत होती, त्यांच्या पूर्ततेसाठी ते पूर्ण कुटूंब गुंतून राही व यंत्रवत हालचाली करण्यात व्यग्र होई. नामदेवांनी घरातल्या माणसांना या रूक्ष कर्मकांडातून व यांत्रिक गतिविधीमधून बाहेर काढले आणि गतिमान बनवले. देवाचे फक्त नाव घेत चालत सुटावे, अधूनमधून नाचत, गात खेळ खेळावे, रात्री जिथे थांबू तिथे कीर्तन भजनातून त्याला आळवावे अशी पद्धत रूढ केली. घरात राहिले तर बडेजाव असतो, गावात राहिले तर जातीपातीचा विचार चालतो, त्यापेक्षा गावाच्या, राहाळाच्या बाहेर पडावे, व्यक्तीविशेष म्हणून न उरता समष्टीरूप होऊन जावे ही पद्धत संत नामदेव महाराजांनी महाराष्ट्राला घालून दिली. या समूह जीवनामुळे भेदाभेद बरेच कमी होऊन माणसांना आत्मशोधाची भूक भागल्याचाही आनंद गवसू लागला. चोखोबा महाराजांचा हा अभंग किती बोलका आहे.
टाळी वाजवावी गुढी उभारावी।
वाट हे चालावी।
पंढरीची॥1॥
हरिनाम गर्जता नाही भय चिंता।
ऐसे बोले गीता।
भागवत ॥2॥
पताकांचे भार मिळाले अपार।
गर्जे भीमातीर।
जयजयकारी॥3॥
पंढरीची हाट कौलाची ती पेठ।
मिळाले चतुष्ट।
वारकरी ॥4॥
संत चोखामेळा यांनी या लहानशा अभंगात वारी आणि पंढरीचे अतिशय मार्मिक वर्णन करून ठेवले आहे. आषाढीचे दिवस जवळ येऊ लागले की वारीची तयारी करावी? म्हणजे काय… तर एका काठीवर धोतराचे बोचके बांधावे, वर पाण्यासाठीचा लोटा ठेवावा आणि तीच गुढी समजून, खांद्यावर घेऊन घराबाहेर पडावे, धातूचे टाळ नसले तरी काही बिघडत नाही, हाताने टाळ्या वाजवीत मुखाने देवाचे नाव गर्जवीत वाट चालू लागावे… म्हणजे मग ना संसाराची चिंता उरते ना भविष्याचे भय! गीतेत व भागवतात भगवंताने हेच सांगितले आहे की, जो माझ्यावर भार घालून राहातो त्याची काळजी मी स्वत:च वाहातो ! पंढपूरपर्यंत पोचता पोचता माणूस माणसाला मिळत जातेे आणि भगव्या पताकांची अपार गर्दी होऊन, भीमानदीचे दोन्ही तीर विठ्ठलाच्या जयजयकाराने दुमदुमून जातात…
मग दिंड्यांचा पंढरपूरात प्रवेश होतो. सगळीकडे हरिनामाचा बाजार गच्च भरलेला असतो. पंढरी ही साक्षात देवाने पुंडलिकाला कौल देऊन वसवलेली पेठ आहे. तिथे चारही वर्णांना मुक्त प्रवेश आहे. कसलाही भेदाभेद केला जात नाही. अगदी खळ दुष्टांनी, सोंग्याढोंग्यानीही यावे आणि शुद्ध हाऊन जावे हे संतांचे आमंत्रण आहे व ते मी चोखामेळा जाहीर दवंडी पिटून सर्वांना सांगत आहे असे मंगळवेढ्याचे संत चोखोबा महाराज या सुंदर अभंगात सांगतात!




