नंदन रहाणे
वारीला निघालेल्या दिंड्या पाहिल्या की मराठेशाहीतल्या सेनादलाचीच आठवण होते. इ. स. 1670 मध्ये शिवरायांनी औरंगजेबाशी केलेला तह धुडकावून टाकला आणि चढाईचे धोरण स्वीकारले. मिर्झा जयसिंहाला जितके किल्ले द्यावे लागले होते, ते तर त्यांनी परत मिळवलेच.. शिवाय त्यांची सैन्य पथके नाशिक भागात व बागलाण प्रांतात जाऊन धुमाकूळ घालू लागली. पुढे शिवरायांच्या निधनानंतर शंभुराजांनीदेखील बुर्हाणपूरपासून गोव्यापर्यंत वादळी मोहिमा सुरू केल्या. शंभुराजांच्या हौतात्म्यामुळे मराठी शिलेदार इतके संतापले की, इ. स. 1690 ते 1707 म्हणजे सलग 17-18 वर्षे त्यांनी औरंग्याला मराठी मुलुखातच हिंडवून फिरवून, पळवून दमवून पुरते नमवले आणि शेवटी याच मातीला मिळवून टाकले.
मग छत्रपती शाहूंची कारकीर्द सुरू होताच मराठे नर्मदापार होऊन, मध्य भारतात सर्वत्र पसरले. 1720 ते 40 या बाजीरावांच्या काळात, राजस्थानसह दिल्ली, आग्रा, मथुराही मराठ्यांच्या प्रभुत्वास मानू लागले. 1740 ते 60 या पर्वात लाहोर-पेशावर ते कटक-मुर्शिदाबाद… मराठ्यांचे सैन्यदल सर्वत्र फत्ते पावत होते. 1761 च्या पानिपत युद्धात फटका बसला खरा, पण नंतरच्या अवघ्या दहाच वर्षांत मराठी वीरांनी आपला धाक उत्तर भारतात सर्वत्र बसवला. हे वर्चस्व 1770 ते 90 या काळात टिकून होते. कारण मराठा सरदार, शिलेदार, पायदळ, घोडदळ सतत मोहिमांवर असे. शेकडो मैलांच्या मजला मारून आपले वीर शत्रूला जेरीस आणत असत…
पुण्यात मोहिमांची आखणी होई, सरदारांना जबाबदार्या वाटून दिल्या जात. मग ठरल्या दिशेला सैन्याची पथके वाटचाल करू लागत. कधी गुजरात तर कधी उडिसाकडे, कधी कर्नाटक तर कधी बुंदेलखंडाकडे… वाटेतल्या मराठी खेड्यापाड्यातून आणखी मनुष्यबळ येऊन मिळत जाई आणि हजारांचा आकडा पुढे पुढे लाखांपर्यंत फुगत जाई. आज वारीला निघालेल्या संतांच्या पालख्यांचीही अवस्था अगदी अशीच असते. पंढरपूरच्या मार्गावर रोज दिंड्यांच्या गर्दीत भर पडते व मुक्कामाच्या गावी, सैन्याच्या छावण्यांची आठवण यावी तसे चित्र दिसू लागते. पण कुठेही गडबड गोंधळ न होता, शिस्तीत वाटचाल सुरूच असते. ठरल्यावेळी शिंगतुतार्या वाजतात अन् कर्ण्यातून सूचना मिळताच पखवाज घुमू लागतो. शेकडो टाळ एका लयीत खणखणाट करतात, असे वाटते की, सैन्यच निघालेय –
आले हरिदास नेटके ।
भेणे पळाली पातके ॥1॥
गळा घालोनी तुळसीमाळ ।
वीर करिती कोल्हाळ ॥2॥
हाकारिती सहस्त्रनामे ।
रंगी नाचताती प्रेमें ॥3॥
पताका झळकती अंबरी ।
वैष्णव नाचती गजरी ॥4॥
विठा केशवाचा नटू ।
बोले कळिकाळासी धटू ॥5॥
संत नामदेवांचे दुसरे चिरंजीव विठ्ठल तथा विठा यांचा हा अभंग आहे. त्यांचा जन्म 1290 च्या आगेमागे झाला असेल. तेव्हा महाराष्ट्रावर यादवांचे राज्य होते. पंढरपूर हे तेव्हाही गाजणारे धर्मक्षेत्र असून, सम्राट रामदेवराय यादव हा पांडुरंगाच्या देवालयाचा मुख्य आश्रयदाता होता. त्याच्याबरोबर त्याचे सेनादलही पंढरपूरला आलेले असणार व ते या विठाने बालपणीच पाहून पक्के लक्षात ठेवलेले असणार. पुढे नामदेव महाराज गावोगावी जाऊन तिथल्या भक्तांच्या दिंड्या पंढरपूरला जेव्हा आणू लागले तेव्हा नाचणार्या-धावणार्या वारकर्यांना पाहून विठाला सैनिकांच्या पथकाचीच आठवण झाली असणार. त्याच चित्राला अनुसरून विठाने हा अभंग लिहिला आहे.
पाहा हो, सैनिकांप्रमाणे सुसज्ज होऊन हरीचे दास नेटकेपणाने, उत्साहाने भारून चाल करून आले आहेत. त्यांच्या आवेशाने भिऊन सगळी पातके सैरावैरा पळू लागली आहेत. या वीर वारकर्यांनी, एखादे चिलखत अंगावर घालावे त्याप्रमाणे तुळशीच्या माळा घातल्या आहेत आणि ते लढवय्या सैनिकांप्रमाणे कल्लोळ करत, देवाची हजारो नावे युद्धघोषणेप्रमाणे उच्चारीत आहेत. नगारेनौबती झडू लागताच ज्याप्रमाणे वीरांना स्फुरण चढते, त्याप्रमाणेच हे भक्तही धुंद होऊन भजनाच्या रंगात प्रेमाने नाचू लागले आहेत. जसे राजाचे, सरदारांचे, विविध पथकांचे ध्वज असतात तसेच हेही वीर भगव्या पताका आकाशी उंचावत गजर करत आहेत आणि गर्दीत केशवाच्या भक्ताने, मी विठाने अवसान धारण करून, प्रत्यक्ष कळीकाळालाच आव्हान दिले आहे!




