Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजआषाढीची भावदिंडी : भाग १८ - भावें भक्तिवादे करावे कीर्तन

आषाढीची भावदिंडी : भाग १८ – भावें भक्तिवादे करावे कीर्तन

नंदन रहाणे

- Advertisement -

भजन, प्रवचन आणि कीर्तन व निरूपण हे शब्द वारकरी मंडळींच्या रोज बोलण्यात नेहमीच येतात. उत्तरेत कथा, पाठ अन् संकीर्तन या संज्ञा वापरल्या जातात. भागवत किंवा इतर पुराणे यातला एखादा भाग घेऊन, तो रंगवून भक्तांना सांगणे म्हणजे कथा करणेे. हनुमान चालीसा अथवा इतर पदे वेगाने म्हणणे म्हणजे पाठ आणि देवाचे नाव वाद्यांच्या साथीने घेत गाणे व नाचणे म्हणजे संकीर्तन आपल्याकडे, देवाचे नाव तालासुरावर घेणे आणि संतांचे अभंग तालासुरावर म्हणणे याला भजन म्हणतात. एखादा अभंग घेऊन टाळकर्‍यांना प्रमाणे देण्याची मुभा देऊन देवापुढे जी शब्दसेवा केली जाते ते ‘कीर्तन’ आणि त्या अभंगातला अर्थ विशद करणे त्यास ‘निरूपण’ ही संज्ञा असते. ज्ञानेश्वरीतील काही ओव्या पुढ्यात ठेवून त्यावर भाष्य करणे यास ‘प्रवचन’ असे म्हटले जाते. या सगळ्या गोष्टींसाठी भरपूर वाचन, सखोल अभ्यास, प्रदीर्घ चिंतन, सुस्वर गायन, थोडाबहुत विनोद, लोकव्यवहाराची जाण या गुणांची आवश्यकता असते.

YouTube video player

ज्याच्याकडे ही संपदा असते, त्याला समाजात आपोआप लोकप्रियता मिळते. माणसे अशा व्यक्तीला आवर्जून बोलावतात. त्यांचे सांगणे, गाणे लक्ष देऊन ऐकतात, त्याला मानसन्मानही देतात. तो शिष्टाचार असतो. मात्र, आध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीने त्याचे ओझे आपल्या अंगावर वागवायचे नसते. जो मान मिळेल किंवा जो सन्मान होईल तो तिथल्या तिथे देवाच्या चरणी अर्पण करून मोकळे व्हायचे असते. त्याची साठवण ना मनात करायची, ना परत जिभेवाटे त्याचा उच्चार करायचा! किंवा दुसरीकडे जर काही उणा अनुभव वाट्याला आला तर तिथे इतरत्रची उदाहरणेही द्यायची नसतात. नवीन निमंत्रण आले तर मला अमूकच मानधन हवे, तमूकच वाहन हवे, उतरण्याचा ठिकाणा असाच हवा या अटीदेखील घालायच्या नसतात! मग तो होतो शुद्ध ऐहिक व्यवहार, तिथे ना अध्यात्म विचार असतो ना देवाची सेवा! संत शुद्ध चारित्र्य, उदात्त जीवन आणि नैतिक मूल्ये याकरता नेहमीच आग्रही राहिलेले आहेत… नामदेवरायांचे तिसरे सुपुत्र गोविंद यांनी तर कीर्तनकार आणि वक्त्यांना आचारसंहिताच दिली आहे…

भावे भक्तिवादे करावे कीर्तन ।
आशाबद्ध मन ।
करु नये ॥1॥
निष्कामे करावे देवाचे कीर्तन ।
भय हे सांडून । शरीरांचे ॥2॥
रणामध्ये कैसा भिडतो रणशूर ।
होवोनी उदार ।
जीवावरी ॥3॥
तैसा पांडुरंगी धरा हो निर्धार ।
उतरा हा पार । भवसिंधू ॥4॥
सिंधु उतरोनी लावा जगढाल ।
पाहावे नवल ।
विठ्ठलाचे ॥5॥
देवा जोडियला,
तया काय उणे ।
गोंदा मन म्हणे ।
धीट करा ॥6॥

ज्याला कीर्तन करायचे, त्याने आशा अपेक्षा ठेवून या क्षेत्रात उतरू नये. अत्यंत भाविकतेने भक्तीचा प्रचार करावा. प्रसार करावा. सुस्वर गायनात जीव ओतून ईश्वराला गुणानुवाद कथन करावा. बाकी कसलेही वादविवाद लोकांना सांगू नयेत. फक्त देवाची भक्ती एवढेच प्रतिवादन असावे. कीर्तन करताना मनात स्वार्थ विचार असू नये. मनमुक्त नाचावे. गावे.. आपल्या शरीराची लाज बाळगू नये, श्रवणाला जे येतील ते कितीही मोठे, प्रतिष्ठित, श्रीमंत असले तरी त्यांचीही भीड धरू नये. सर्व लक्ष देवावरच केंद्रित करावे. एखादा वीर योद्धा रणांगणात लढायला उतरला की कसा शत्रूवर हल्ला करायला थेट भिडतो…. तसेच कीर्तनकाराने जीवावर उदार होऊन अवगुणांचा नि:पात करणारे निरूपण मांडावे. आपल्या स्वामीला विजय मिळवून देणे हे जसे सैनिकाचे एकमेव ध्येय असते त्याच निर्धाराने पांडुरंगाची महती लोकांच्या मनीमानसी स्थापित करावी, अशी सेवा केली की हा जो भवसागर आहे ना, तो नक्की पार कराल! यात यशस्वी झालात तर जगापुढे तुमचेच उदाहरण नावाजले जाईल, याची दक्षता विठ्ठल स्वत: घेईल!

देवाचे ते कौतुक पाहण्यासाठी आधी मन धीट केले पाहिजे. देव परीक्षा तर पाहतो पण धैर्यवंताला सांभाळूनही घेतोच. एकदा का असा देव तुम्ही साह्यकर्ता म्हणून जोडला की मग हो काय उणे? असे नामदेव सूत गोंदा म्हणत आहे…

ताज्या बातम्या

अपघाताचा बनाव उघड, तपासात खून असल्याचे स्पष्ट

0
त्र्यंबकेश्वर | वार्ताहर Trimbakeshwar जुन्या अपघाताच्या गुन्ह्याचा तपास करताना तो अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाल्याने सराईत आरोपीस अटक करण्यात आली आहे. त्रंबकेश्वर...