नंदन रहाणे
‘उपजे ते नासे’ हीच या जगाची ओळख आहे. दिसतांना आपल्याला सर्व काही सुंदरच दिसते. रोज पूर्व दिशेला सूर्य उगवतो, आषाढ श्रावणात रानेवने हिरवीगार होतात, आंब्याची झाडे फळांनी लहडून जातात, मोर पिसारा फुलवून उंच साद घालतो, पौर्णिमेचा चंद्र मन मोहून घेतो, पिवळ्या केशरी फुलांनी मला शोभिवंत दिसतो, हरणांचे कळप झेपांवर झेपा टाकत कुरणांवरून धावतात, धबधबे आपल्या आवाजाने डोंगरदर्या भारून टाकतात … ही चित्रे आपण नेहमीच पाहतो. पण ती सदासर्वकाळ तशीच टिकून राहतात का? तर, याचे उत्तर आहे : नाही ! सूर्य संंध्याकाळी अस्ताला जातो. चैत्र वैशाखाच्या तडाख्यात रानेवने पार पिवळी पडतात, तोडा झाला की आंब्याची झाडे ओकीबोकी दिसतात, मोराची पिसे इथेतिथे गळून पडतात, दसरा दिवाळीला झेंडू खुडला की मळा उखडून टाकला जातो, वणवा पेटला की देखणी हरणे सैरभैर होतात, उन्हाळा तापू लागताच झरे आटून धबधबे खंडून जातात… हेही सगळे सृष्टीत सुरुच असते! म्हणजे या जगात कायमचे, स्थायी, शाश्वत असे काहीच नाही!
उत्पत्ती, वर्धन, उत्कर्ष, अपकर्ष, विलय या 5 अवस्थांमधून सर्वांना जावेच लागते. परवा जे जसे होते ते काल नाही, आणि आज जे जसे आहे ते उद्या नाही, हे अवस्थांतर इथे सर्व सजीवांना अनुभवाणे भागङ्ग। पडते. अशा परिस्थितीत, नाहीसे होणार्याबद्दल दुःख शोक आणि नवे उभवून येणार्याबद्दल हर्ष उल्हास यात गुंतून राहण्यात काय अर्थ असतो? सगळे काही जर हलते, सरकते, वाहते आहे तर एखाद्यानेच थबकून शहाणे, अडकून पडणे, ठप्प होणे हे अनैसर्गिकच मानले पाहिजे. पण मानवी मन सुखाचे प्रसंग असोत की दुःखाचे… त्यातच भिरभिरत राहाते. साहजिकच वर्तमानाशी सांधा तुटतो आणि माणूस भवतालाचे, प्राप्त-कालाचे आकलन करण्यात कमी पडतो. अशा परिस्थितीत आपण काय केले पाहिजे हे तत्वज्ञ सांगतात, मानसशास्त्रज्ञही सांगतात, पण ते सर्व वैज्ञानिक परिभाषेत मांडले गेल्याने अवघड होते. संत तेच सांगतात. पण अतिशय सोप्या शब्दांत आणि जिव्हाळ्याने बोलल्यामुळे सामान्य माणसाच्याही अंतःकरणात उसते, संत सोयराबाईंचा हा अभंग हे सुंदर उदाहरण
पंच महाभूते अवधा त्यांचा खेळ ।
आत्मा तो निर्मळ ।
शुद्ध आहे ॥1॥
तेथे मरते ते कोण, राहते ते कोण ।
जयाचे कारण ।
तोचि जाणे ॥2॥
वायाचि ते ओझे घेती आपुल्या शिरी ।
वाऊगे हावभरी ।
होती वाया ॥3॥
सोयरा म्हणे यांचे वाटते नवल ।
नकळे काही ओल ।
परमार्थाची ॥4॥
जग म्हणजे काय? तर पंचमहाभूतांचा मिळून सगळा खेळ आहे. मृदा, जल, अग्नी, वायू आणि व्योम ही 5 तत्त्वे कमी अधिक प्रमाणात एकत्र येतात. त्यातून जीवसृष्टी व निसर्गसंंपदा आकार घेते. त्यातला प्रत्येक प्राणी, पक्षी, जलजीव अन् झाडे झुडूपे वेली असे सर्व सांत आहे. म्हणजे प्रत्येकाचा अंत होतोच. पण हा अंत म्हणजे काय? याचा नीट विचार करा. एका हंगामातली धान्ये, भाज्या, फळे, फुले संपली म्हणजे तो तो प्रकार कायमचा नष्ट होतो का? अजिबात नाही! त्या सर्वांची पुन्हा नव्याने निर्मिती ही निसर्गाकडून होतेच! कारण, स्थूल आकार व जड देह जरी विसर्जित झाला तरी त्यातले चैतन्यतत्त्व उरलेलेच असते, तोच त्या त्या जीवाचा आत्मा होय. जो अत्यंत शुद्ध असतो व पुन्हा नवसृजनाच्या कामी लागतो. म्हणूनच प्रत्येकाने हा विचार करावा की इथे मरते ते कोण आणि उरते ते कोण? ज्याने त्याने स्वतःच हे नीट समजून घ्यावे…
पण जगताचे गतितत्त्व समजून न घेता, लोक भूतकाळाचे ओझे उगाच आपल्या मस्तकावर घेतात व त्यापायीच मस्त होतात, यामागे असते केवळ सुखद प्रसंगांच्या आठवणीची हाव किंवा दुःखद क्षणांची उजळणी… सोयरा बाईना अशा लोकांचे फारच नवल वाटते. त्या म्हणतात, हे सगळे ऐहिकाच्या गुंताड्यात गुरफटून वायाच भ्रमिष्ट झालेत. यांना परमार्थाचा आनंद व भक्तीचा रस केव्हा बरे कळेल ? जीवनाला अध्यात्माची ओल असलीच पाहिजे!




