नंदन रहाणे
कुठल्याही काळातला, कोणत्याही प्रदेशाला,कसल्याही प्रकारचा समाज हा कधीच एका वाणाचा, एका पोताचा, एका घाटाचा असा नसतो. त्याला अनेक स्तर आणि वर्ग असतात. लोकांचे जीवन नीट चालावे. त्यांना घर संसारात विविध गोष्टी उपलब्ध व्हाव्यात याकरता अनेक प्रकारचे कारागीर त्या समाजात असावे लागतात. सर्वांना जास्त गरजेचे असते ते म्हणजे अन्नधान्य, ते पिकवणारा शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात लागतो. नुसते धान्य तयार होऊन भागत नाही.. भाकरी असो भात, त्याच्या सोबतीला भाजी, आमटी अन वरणही लागते. म्हणजेच भाज्या, कडधान्ये उगवणारा माळीसुध्दा गरजेचा असतो. यांच्या शेतीची औजारे लाकडी व लोखंडी असतात. म्हणून मग सुतार व लोहार अत्यावश्यक ठरतात. मोट, चाबूक, गळपट्टे यांसाठी चांभार हवाच असतो. बी-बियाणे साठवण्यासाठी माठ, रांजण, गाडगे, मडके जरूरीचे. तेव्हा कुंभार आलेच की, माळवा किंवा धान्य भरायला पाट्या आणि साठवायला कणम्या करणार कोण? बुरूडच । नाडे, दोर, मुसक्यासाठी मातंगही हवेच! हे सगळे झाले बाचे… या सर्वांना रहायला घरे नकोत का? तेव्हा पाया खोदणारे वडार बेलदार, चिरे घडणारे पाथरवट, भिंती रचणारे गवंडी, कौले घालणारे छप्परबंद, अंगण व घरातली भुई चोपणारे कामाठी असे सगळे आलेच.
लहान, मोठ्यांना कपडे लागतात. म्हणजे मग त्यासाठी साळी, कोष्टी, रंगारी, कापड़िये, शिंपी या जाती आवश्यक सैपाकाला तळ्या पितळेची भांडी, तवे, सांडश्या, उलथणी, भगुली हरत-हेची उपकरणी हे कोण देणार? तर तांबट, पांचाळ, ओतारी देणार, घरातल्या देवांना फुले व पत्री गुरख पुरवणार, पंचागातल्या तिथी जोशी सांगणार, असे गाव वसले की मग न्हावी, धोबी, तांबोळी, तेली पण येणार. बरे मोठे बाजारपेठेचे शहर झाले की तिथे वाणी, उदमी, सराफ,सावकार असे धनवत्तर आपला रहिवास करणार. असा समाज संपन्न होत गेला की मग तिथे आपोआपच कलावंत येतात. गायिका नर्तिकावादक इ. रसिक जनांना मोहविणारी नवी सृष्टीच उभी करून दाखवतात. शृंगार हा तिथला प्रमुख रस असतो. पण, काही कलावती अगदी विरागीही असतात! वारकरी संप्रदायात अठरापगड जातीमधले संत जसे आहेत तशीच एक कलावंतीण पण संत म्हणून पूज्य मानली गेलीय ! कान्होपात्रा हे तिचे नाव आणि ही तिचा अभंग.
मुखे घेता हरिनाम । बाकी पडे काळ यम ।।१।।
ऐसी नामाची ते थोरी । उष्दरीले दुराचारी ।।२।।
नष्ट गणिका अजामेळ । झाला वाल्मिकी सोज्वळ ।।३।।
ऐसी दिव्य नाममाळा । कान्होपात्रा ल्याली गळा ।।४।।
पंढरपुरपासून अवघ्या २२ किलोमीटरवर मंगळवेढा हे प्राचीन गाव आहे. बिज्जल बसवेश्वरांपासूनचा इतिहास असलेले. मोठी समृध्द बाजारपेठ तिथे ‘श्यामा’ नावाची एक नायकीण राहात असे. तिच्या नाचगाण्याचे शेकडो चाहते होते. तिला एक मुलगी, तिचे नाव कान्होपात्रा जशी ती वयात आली, श्यामापेक्षा रूपवान दिसू लागली. शिवाय नृत्यात अतिशय निपुण तिच्या सौदर्याची कीर्ती बिच्या बरीदशहापर्यंत गेली. तिला आपल्या जनानखान्यात खेचण्यासाठी त्याने सैन्य पाठवले कान्होपात्रा विठ्ठलाची परमभक्त होती. ती मंगळवेढ्यातुन पळाली आणि पंढरपूरला येऊन पांडुरंगाच्या राऊळात तिने आपले प्राण विसर्जित केले! ती विरागिनी कान्होपात्रा नामभक्तीचा महिमा गातेय.. मुखाने हरिनाम घेतले की प्रत्यक्ष यमालाही धाक पडतो. काळ सर्वांना गिळतो, पण देवाचे नाम त्यावरही मात करते. अशी हरिनामाची थोरवी आहे. कित्येकदृष्ट दुराचारी लोकही नामाने उद्धरून गेले. शीलहीन गणिका, पतित अजामेळा व दरोडेखोरवाल्या हे सुध्दा पापमुक्त होऊन सोज्वळ झाले. मी ही तशीच आहे, पण देवाच्या दिव्य नामाची माळ मी गळ्यात घातलीय आता मला कोणाचेच भय नाही. मी मुक्त व पवित्र झाले आहे.




