नंदन रहाणे
जोवर आपले जीवन आहे, तोवर सगळी सुखे आपल्याला यथेच्छ भोगायला मिळावी आणि मृत्यूनंतर स्वर्गात स्थान लाभावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. सुखप्राप्ती व स्वर्गकांक्षा यासाठी पुण्य कमवावे लागते. ते आपल्या खात्यावर जमा करावे म्हणून जो तो मनास येईल त्या दिशेने धडपड करीत असतो. काही जण व्रतवैकल्ये करतात, काही जण यज्ञयाग करतात, काही जण तीर्थयात्रा करतात. दिसेल त्या देवाला धावता नमस्कार करणारे आणि येईल त्या तिथीला मूठभर धान्य दान देणारे खूप नादिष्ट सभोवताली पहायला मिळतात.पुराणांंच्या पोथ्यांची पाने उलटणारी व विशिष्ट पूंजाचा पसारा मांडणारी मंडळीदेखील दिसून येतातच.
हा सगळा खटाटोप कशासाठी? तर कोणीही कधीही न पाहिलेल्या स्वर्गाच्या प्राप्तीसाठी! तिथे इथुन मागे कोणी गेलाय आणि त्याने काही पत्रसंदेश पाठवलाय असेही घडलेले नाही! बरं, स्वर्ग तरी एक आहे का? मुळीच नाही… ते 7 आहेत! त्यापैकी एकात इंद्राची राजधानी अमरावती आहेे. तिथेच नंदनवन आणि कल्पवृक्ष आहे. अप्सरा व गंधर्व यांचे नृत्यगायन तिथे सतत सुरु असते. मंदाकिनी नामक नदी आणि सुरभी ही कामधेनु याच स्वर्गात आहे..
याशिवाय, शिवाचा कैलास अन् विष्णूचे वैकुंठ आहेच. सत्यलोकात ब्रह्यदेव राहतात. दुर्गा, पार्वती, लक्ष्मी, सरस्वती, गायत्री यांचे स्वतंत्र स्वर्ग असल्याचे त्या त्या देवतांचे भक्त सांगतातच. इतर संप्रदायांची मंडळी पंथदेवतांचे आणि विभूतींचे वास्तव्य कोठे आहेत. त्याचाही उल्लेख करतात. ज्याला ज्याची आवड त्याने त्याची उपासना करुन, त्या त्या स्वर्गात देवाजवळ स्थान मिळवावे असा उपदेश आचार्य, महंत, पीठाधीश वगैरे करीत असतात. वारकरी संप्रदाय हा एकच असा उपासना मार्ग आहे. ज्याने या स्वर्गाला सरळसरळ नकार दिला आहे! म्हणजे स्वर्ग किंवा वैकुंठ, कैलास हे खोटे वा काल्पनिक असा पवित्रा त्यातल्या संतांनी घेतलेला नाही… तर, त्याची आम्हांला गरजच नाही अशी भूमिका ठणकावून मांडली आहे! तू आमचा देव पांडुरंंग, आम्ही तुझे भक्त वारकरी आणि तुझ्या प्रेमासाठी आम्ही पंढरपूरला येऊ असा त्यांचा एकच गजर आहे. नामदेव महाराजांपासून निळोबारायांपर्यंत सगळे याच स्वरांत बोलतात. या मालिकेच्या मध्यावरचे भानुदास महाराजही तेच सांगतात –
साधनांच्या आटी नको
रे कपाटी ।
पंढरी वैकुंठी । पाहे डोळा ॥1॥
मंत्रांचिया आटी पडशील व्यसनी ।
पंढरी जाऊनी ।
पाहे डोळा ॥2॥
तपाचिया आटी पडशी डोंगरी ।
पाहे पा पंढरी । डोळे भरी ॥3॥
यज्ञाचिया आटी
फिरु नको देशा ।
पंढरी पुरेशी । पाहे डोळा ॥4॥
भानुदास म्हणे नामाचा
हव्यास ।
पंढरी सुखास । पात्र होई ॥5॥
हे संत भानुदास म्हणजे एकनाथ महाराजांचे पणजे. विजयनगरच्या सम्राटाने पांडुरंगाची मूर्ती हंपी या आपल्या राजधानीत नेत्याने, इकडे पंढरपुरात हलकल्लोळ झाला. लाखो वारकर्यांचा जीव कासाविस झाला. तेव्हा पैठणचे भानुदास कर्नाटकदेशी गेले. त्यांनी आपल्या भक्तीचे सामर्थ्य कृष्णदेवरायास दाखवले व सावळा विठोबा सवे घेऊन ते महाराष्ट्रदेशी परत आले! इतका ज्यांचा अधिकार, ते भानुदास महाराज पुण्यप्राप्तीसाठी धडपडणार्या माणसाला काय सांगतात ते पहा… अरे बाबा, कशाला वैकुंठाचे वेड घेऊन, नाना प्रकारच्या साधना करण्यासाठी स्वत:ला डोंगरगुहांमध्ये कोंडून घेतो आहेस? त्यापेक्षा या पंढरीलाच वैकुंठाच्या जागी पहा ना! या देवाचा हा मंत्र, त्या देवाचा तो मंत्र… याचा रोज इतके हजार जप, त्याचा एकूण इतके लाख या व्यसनात अडकतोस तरी कशाला? उठ, पंढरपुरी जा अन् वैकुंठीचा राणा डोळ्यांनी बघ!
कोणी म्हणतो वनात जा नि तप कर… लगेच तु निघाला डोंगरदर्यात. तिथे जाऊन एकांतात उग्र तपश्चर्या करुन वैकुंठ खाली येणार आहे काय? त्यापेक्षा पंढरीला पोचून भक्तांसोबत नाचत गात देवाचे दर्शन घे ना! या गावी हा यज्ञ सुरु आहे, त्याक्षेत्रीं तो याग मांडला आहे असे कळताच आटापिटा करुन, सारा देश तू फिरतोस खरा… पण, हे सारे यज्ञयाग त्याच्यासाठी तो परमेश्वर प्रत्यक्ष उभा आहे तो पंढरपूर नगरीतच… जा की तिथे, त्याच्या नामाचाच हव्यास धरुन! मग स्वर्गसुखास तू आपोआप पात्र होशील व ते तुला पंढरीतच प्राप्त होईल!!




