नंदन रहाणे
माणूस म्हणजे अहंकाराचा पुतळा, अगदी ना कळत्या वयातले लहान लेकरुही त्याच्या हातातली वस्तू घट्ट पकडून ठेवते. दुधाची वाटीचमचा म्हणा, वाजणारा खुळखुळा म्हणा की आता अगदी मोबाईल अथवा टीव्हीचा रिमोट म्हणा… जे बाळाच्या हातात असते ते फक्त त्याचेच असते आणि आपल्याच हातात त्याला राहायला हवे असते. दे म्हटले किंवा काढुन घेतले तर मोठ्ठा आवाज काढून ते रडणार हे निश्चित! ही ‘अहं’ची तीव्र जाणीव जीवाला जन्मत: मिळालेली असणार असेच म्हणावे लागते… मग जसजसे वय वाढू लागले की त्या स्वार्थभावनेचा विस्तार फार पटापट व्हायला लागतो. मी असा, मी तसा.. माझा रंग असा, माझी उंची तशी… माझ्याकडे ही पदवी, ती नोकरी… मी कोरी गाडी घेतो, नवा बंगला बांधतो… मला विमान प्रवासच पाहिजे, मला फाईव्ह स्टार हॉटेलच आवडते.. एक ना दोन, शेकडो, भानगडी- ज्यात माणसाचे ‘मी माझे मजला’ पदोपदी उमटत असते!
या अहंभावी वृत्तीचा त्रास घरातल्यांना, शेजारच्यांना, संबंधितांना तर होतोच होतो; पण तो त्याला स्वत:लाही होत असतो हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्याचा स्वभाव हट्टी बनतो, वृत्ती ताठर होते, दृष्टीकोन बाधित ठरते. परिस्थितीशी जुळवून घेणे माणसाला जमतच नाही. साहजिकच जीवनातले जे छोटे छोटे आनंद, ते त्याला अनुभवताच येत नाहीत! तो लोकांशी समरस होऊ शकत नाही, निसर्गाशी एकरुप बनू शकत नाही. त्यामुळे मोठ्या आणि खर्या सुखाला तो मुकतोच.. यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? तो आहे अहंकाराचे संपूर्ण विसर्जन! आपण मालक नाही हे एकदा का ठरवले की मग मालकी हक्क गाजवण्याची बुध्दीच उरत नाही. पुढच्या सर्व अनुकूल क्रिया आपोआप घडू लागतात, असे सेना महाराज सांगतात –
म्हणविलो विठोबाचा दास।
शरण जाईन मी संतांस ॥1॥
दृष्ट मळ नासे बुध्दीचा ।
सदा सुकाळ हो प्रेमाचा ॥2॥
हरीचे ऐकता संकीर्तन ।
अभक्तांं भक्ती लागे जाण ॥3॥
उभा राहीन कीर्तनांत ।
हर्षे डुले पंढरीनाथ ॥4॥
सेना म्हणे हेचि सुख ।
नाही ब्रह्मयासी देख ॥5॥
सगळ्या वारकरी संतांमध्ये सेना महाराज हे सर्वांत दुरुन पंढरीला येणारे संत. मध्य प्रदेशातील बुंदेलखंडामधल्या बांधवगडच्या राजाचे ते सेवक होते. जातीने नाभिक, त्यामुळे राजाची श्मश्रु करणे, तेल लावणे, मॉलिश करुन स्नान घालणे हे त्यांचे काम, असे ही म्हटले जाते की ते मूळचे मराठी. पण हिंडत हिंडत तिकडे गेले. त्यांच्या हजामत करण्याच्या मऊ हातावर राजा खुष झाला व ते तिकडेच राहिले. परंतु विठोबा आणि पंढरपूरचे प्रेम काही कमी झाले नाही. 800-900 किलोमीटरचा प्रवास करुन ते वारीला येतच असत! तर या अभंगात त्यांनी अहंकारविसर्जन कसे केले व त्यामुळे काय घडले हे सांगितले आहे.
ते म्हणतात, सर्व प्रथम मी विठोबाचा दास आहे अशी खूणगाठ मनाशी बांधली. सेवकापेक्षाही खालचा दर्जा म्हणजे दास… गुलाम! त्याला स्वतंत्र अस्तित्वच नसते, तर अहंभाव कुठला? असा शून्य होऊन मी संतांना शरण गेलो. कारण, एकवेळ विठोबा लक्ष देणारही नाही. पण संत मात्र उपेक्षा करणारच नाहीत! आणि झालेही तसेच!
संतांनी मला आपला म्हटले आणि माझ्या वाट्याला प्रेमाचा सुकाळ आला. हा अनुभव मी तेव्हा घेऊ शकलोो, जेव्हा माझ्या बुद्धीवर अहंकाराच्या दृष्टमळाचे जाड व जडथर चढलेले होते. ते संतस्पर्शाने नष्ट झाले. मग मी प्रभुनामाच्या गजरात रंगून गेलो. मूळचा मी गर्विष्ठ, त्यामुळे अभक्तच होतो. पण गर्व हरताच मी भक्त झालो, कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिलो आणि केवढा चमत्कार… की मी प्रत्यक्ष पंढरीच्या राजाला तिथे आनंदाने डोलतांना पाहिले! अजून काय हवे होते मला? ते दुर्लभ महासुख मला प्राप्त झाले, जे ब्रह्माादिक देवतांच्याही नशिबीं नाही… म्हणून लीन व्हा! सश्रद्ध व्हा!!




