अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राष्ट्रवादी शरद पवार गटाने त्यांची उमेदवारी माजी महापौर अभिषेक कळमकर यांना जाहीर केली आणि नगर शहरातील महाविकास आघाडीत बिघाडी दिसू लागली. काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटातून कळमकरांच्या उमेदवारीला थेट विरोध न करता स्वतःची स्वतंत्र चूल मांडण्याचे नियोजन सुरू केले गेले आहे. ठाकरे सेनेने तर आज मंगळवारी जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे व माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे अर्ज दाखल करण्याचे ठरवले आहे.
नगर शहरात अजित दादा पवार गटाचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्याविरोधात लढण्याची तयारी महाविकास आघाडीतील ठाकरे सेना, काँग्रेस व शरद पवार राष्ट्रवादीने केली आहे. मात्र, या आघाडीतील तीनही पक्षात इच्छुकांची मोठी रांग आहे. अशा स्थितीत ठाकरे सेनेने श्रीगोंद्याची शरद पवार गटाची जागा आपल्याकडे घेतली व त्या बदल्यात शरद पवार गटाला नगरची जागा दिल्याचे सांगितले जाते. शरद पवार गटाने अभिषेक कळमकर यांची उमेदवारी जाहीरही करून टाकली. पण या बदलामुळे स्थानिक स्तरावर महाविकास आघाडीतील ठाकरे सेना व काँग्रेसचे इच्छुक व त्यांचे समर्थक अस्वस्थ झाले आहेत. यातूनच कळमकर यांच्या उमेदवारीला स्पष्टपणे नाही, मात्र आतून विरोध सुरू झाला आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचा उमेदवार दिला नाही तर ठाकरे सेना पदाधिकारी सामूदायिक राजीनामे देतील असे आधी जाहीर केले गेले, पण नंतर घुमजाव करीत बंडखोरीचा विचार सुरू झाला. रविवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत प्रा. गाडे व फुलसौंदर या दोघांनी उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय झाला. मात्र, या दोघांनीच का, असा प्रश्न पुढे आल्याने पुन्हा सोमवारी दुपारी 1 वाजता बैठक आयोजित केली गेली. या बैठकीत अर्ज भरायचे की नाही, भरायचे तर कोणी-कोणी भरायचे, यावर खल झाल्याचे सांगण्यात आले. अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्याने काय घडते ते पाहून निर्णय घेण्याचे ठरवले गेल्याचे सांगण्यात येते. मात्र, स्थानिक स्तरावर ठाकरे सेनेत सुरू असलेल्या घडामोडींची श्रेष्ठींच्या स्तरावर कोणीही दखल घेतली नसल्याचे समजते.