Friday, May 3, 2024
Homeनाशिककृषी समिती बैठकीस इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची दांडी

कृषी समिती बैठकीस इतर विभागांच्या अधिकाऱ्यांची दांडी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या मासिक बैठकीस इतर विभागांच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने कृषी सभापती संजय बनकर व समिती सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या कृतीचा जाहीर निषेध नोंदविला.

- Advertisement -

संबंधित अधिकारी यांचा लेखी खुलासा येईपावेतो पुढील बैठक आयोजित न करण्याचे आदेश सभापतींनी दिले. कृषी समितीची मासिक आढावा बैठक शुक्रवारी(दि.४)ऑनलाईन आयोजित करण्यांत आली होती.बैठकीस सभापती संजय बनकर, सदस्य निलेश केदार, बलविर कौर, ज्योती वागले,विलास अलबाड, मोतीराम दिवे, कामिनी चारोस्कर आदी सदस्य उपस्थित होते. दि.४ नोव्हेंबर रोजी आयोजित बैठकीला इतर विभागाचे अधिकारी, सेवक यांना उपस्थित राहणे क्रमप्राप्त असून देखील बहुतांश अधिकारी अनुपस्थित होते.

त्यामुळे सभापती यांनी अनुपस्थित राहीलेल्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करुन त्यांना नोटीस बजावून सभेस अनुपस्थित राहण्याबाबत लेखी खुलासा मागविण्याबाबत सूचना केल्या होत्या.त्यानंतर शुक्रवारी (दि.४) पुन्हा बैठक आयोजित करण्यांत आली होती.पंरतू , या बैठकीला देखील त्याचप्रकारचा अनुपस्थितीबाबतचा अनुभव आल्याने सभापती संजय बनकर यांनी नाराजी व्यक्त केली. व निषेध व्यक्त करुन तसा ठराव संमत करण्यात आला.

यामध्ये कार्यकारी अभियंता कडवा कालवा विभाग, सिंचन भवन, त्रंबकरोड, नाशिक, कार्यकारी अभियंता पालखेड नाशिक पाटबंधारे विभाग, सिंचन परिसर , नाशिक, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, मालेगाव, जिल्हा अग्रणी बँक , गडकरी चौक, नाशिक, अधीक्षक अभियंता, एमएससीबी (मालेगाव मंडळ ) सोयगाव, मालेगाव, अधीक्षक अभियंता एमएससीबी विद्युत भवन, नाशिकरोड आदि विभागांचे अधिकारी / कर्मचारी अनुपस्थित असल्याने त्यांना नियमानुसार कारणे दाखवा नोटीस बजावून अनुपस्थित राहण्याबाबत लेखी खुलासा मागवावा, अशा कडक सूचना कृषी विकास अधिकारी यांना दिल्या.लेखी खुलासा येईपावेतो पुढील सभा आयोजित न करण्याचे आदेशही सभापती यांनी दिले.

विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार विविध विभागांच्या अधिकाऱ्यानी कृषि समिती बैठकीस उपस्थित राहणे बंधनकारक असतांनी एकाही बैठकीला सदर विभागांचे अधिकारी उपस्थित राहत नाहीत. यावरुन त्यांचे शेतकऱ्यांच्या विकासाच्या योजना राबविण्याबाबतचे गांभीर्य व धोरण लक्षात येते.या प्रकरणी विभागीय आयुक्तांकडे दाद मागणार आहोत. – संजय बनकर, सभापती कृषी व पशुसंवर्धन समिती जि.प.नाशिक.

- Advertisment -

ताज्या बातम्या