Thursday, May 7, 2026
HomeनगरAccident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत बापलेक जखमी

Accident News : अज्ञात वाहनाच्या धडकेत बापलेक जखमी

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी-शेवगाव रोडवर सोमवार (दि. 21) रोजी सकाळी मॉर्निंग वॉकवरून परतणार्‍या बाप-लेकाला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात विजयकुमार लुणावत व त्यांचा मुलगा विनीत लुणावत दोघेही गंभीर जखमी झाले असून या दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

ही दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पाथर्डी-शेवगाव रोडवरील महावितरण कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ समोरील बाजूस घडली आहे. शेवगाव रोडवरील वामनभाऊनगर येथे राहणारे विजयकुमार लुणावत (वय अंदाजे 65) व विनीत लुणावत (वय अंदाजे 40) हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले होते. शेवगावकडे चालत जाऊन ते परतीच्या मार्गावर असताना भरधाव वेगाने पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना जबर धडक दिली.
अपघात एवढा भीषण होता की,या धडकेमुळे दोघेही हवेत उडून फेकले गेले.

यामध्ये विजयकुमार लुणावत यांच्या डोक्याला गंभीर मार लागला असून विनीत लुणावत यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. जवळच असलेल्या नागरिकांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ मदतीला धाव घेत जखमींना पाथर्डीतील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी अपघाताला कारणीभूत ठरली असावी, अशी चर्चा आहे. मात्र अद्याप गाडीची ओळख पटलेली नाही. या अपघाताने शेवगाव रोडवरील स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

काही महिन्यांपूर्वी शेवगाव रोडवर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या एका महिलेस देखील पाठीमागून आलेल्या भरधाव वाहनाने उडवल्याची घटना घडली होती. त्या अपघातात संबंधित महिलेला आपला जीव गमवावा लागला होता.शेवगाव रोड हे पाथर्डी शहरातील नागरिकांचे मुख्य वॉकिंग पॉईंट मानले जाते. रोज पहाटेपासूनच शेकडो नागरिक मॉर्निंग वॉकसाठी या रस्त्याचा वापर करतात. मात्र, या रस्त्यावर वेगाने धावणारी वाहने व अपुर्‍या सुरक्षिततेमुळे अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे.

ताज्या बातम्या

AMC : पाणीपुरवठा योजनेला वीजेचा फटका

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शहर पाणीपुरवठा योजनेवरील विविध उपसा केंद्रांवरील वीजपुरवठा मागील महिन्यापासून सातत्याने खंडित होत असल्याने शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत...