अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहरातील सावेडी परिसरात अहिल्यानगर-मनमाड महामार्गावरील झेड.के. बॉलीवुड कॅफे येथे बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या कथित ‘कॅफे’वर तोफखाना पोलीस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी (5 मे) सायंकाळी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत कॅफेमध्ये अश्लिल कृत्यांसाठी तयार केलेले बंदिस्त कप्पे आढळून आले असून संबंधितांवर महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक जगदीश भांबळ यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, सावेडी परिसरातील सदर कॅफेमध्ये प्लायवुडचे लहान-लहान कप्पे तयार करून त्यांना पडदे लावण्यात आले आहेत. या कप्प्यांमध्ये शाळा व महाविद्यालयीन तरूण-तरूणींना अश्लिल कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून दिली जात होती. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, उपनिरीक्षक परशुराम दळवी, तसेच इतर पोलीस कर्मचार्यांसह पंचांच्या उपस्थितीत सायंकाळी 6.15 वाजताच्या सुमारास अचानक छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान पोलिसांची चाहूल लागताच काही युवक-युवती मागील दरवाजातून पळून गेले.
कॅफेमध्ये तपासणी केली असता, लाकडी कप्पे तयार करून त्यांना बाहेरून पडदे लावण्यात आलेले आढळले. प्रत्येक कप्प्यात बसण्यासाठी छोटे सोफे ठेवण्यात आले होते. तसेच, प्रत्यक्षात कॅफे चालविण्यासाठी आवश्यक असलेले साहित्य-उपलब्ध नव्हते. कॅफेचा कोणताही वैध परवानाही आढळून आला नाही. छाप्यावेळी काउंटरवर उपस्थित असलेल्या स्वप्निल शंकर डोंगरे (वय 25, रा. मानपाडा, कल्याण) याने स्वतःला कॅफेचा मालक असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्यासह ऋषिकेश सातपुते (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्याविरूध्द गुन्हा नोंदविला आहे.




