Friday, May 3, 2024
HomeUncategorized‘एसीजी'ची शेंद्रा एमआयसीत ६०० कोटीची गुंतवणूक

‘एसीजी’ची शेंद्रा एमआयसीत ६०० कोटीची गुंतवणूक

औरंगाबाद – aurangabad

सुमारे १३८ देशांत औषधीचे कॅप्सुल (Medication capsules) पुरविणारी जगातील आघाडीची कंपनी “एसीजी’ (ACG) ने भविष्यातील विस्तारासाठी औरंगाबादची निवड केली असून (Shendra MIDC) शेंद्रा एमआयडीसीत ६०० कोटी रूपयांच्या गुंतवणूकीचा निर्णय घेतला आहे. २० एकरावरील प्रकल्पात वर्षाकाठी ४० अब्ज कॅप्सुल निर्मितीचे लक्ष्य आहे. यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा एक हजाराहून अधिक रोजगारांची निर्मिती होईल. महिनाभरात बांधकाम सुरू होवून वर्षभरात उत्पादनाला सुरूवात होईल.

- Advertisement -

औषधनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या औषधासाठी कॅप्सुलची गरज भासते. “एसीजी’ अशा रिकाम्या कॅप्सुल आणि त्याच्याशी संबंधीत साहित्याचे उत्पादन करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. १९६१ मध्ये अजित आणि जसजित सिंग यांनी मुंबईत कंपनीची स्थापना केली. आजघडीला २३,९४७ यंत्राद्वारे कंपनी वर्षाला १२० अब्ज कॅप्सुलची निर्मिती करते. “एसीजी’ आता डीएमआयसीचा भाग असणाऱ्या शेंद्रा एमआयडीसीत दाखल झाली आहे.

२० एकरावर प्रकल्प

“एसीजी’ शेंद्र्यात २० एकर जागेवर कॅप्सुल निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. यासाठी नुकताच “एसीजी’ आणि महाराष्ट्र शासनात सामंजस्य करार झाला. प्रकल्पात वर्षाकाठी ४० अब्ज कॅप्सुलची निर्मिती होईल. “एसीजी’ या प्रकल्पातून त्यांची सद्याची वर्षाची १२० अब्ज कॅप्सुल निर्मितीची क्षमता दुप्पट म्हणजेच २४० अब्ज करेल. सोबतच संशोधन आणि विकास प्रकल्पही उभारला जाईल, अशी माहिती “ऑरीक’ मधील वरिष्ठ सूत्रांनी दिली. हा प्रकल्प कॅप्सुल निर्मितीचा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प ठरेल.

६०० कोटी गुंतवणूक

“एसीजी’ प्रकल्पात ६०० कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे. पहिल्या टप्प्यात ३५० कोटी गुंतवले जातील. या गुंतवणूकीमुळे शासनाने प्रकल्पाला मेगा प्रोजेक्टचा दर्जा दिला आहे. यातून ४५० प्रत्यक्ष तर ५५० अप्रत्यक्ष अशा १००० रोजगारांची निर्मिती होईल. महिनाभरात बांधकामाला सुरूवात होवून वर्षभरात प्रत्यक्ष उत्पादनाला सुरूवात होईल, असे सूत्र म्हणाले.

शाकाहारी कॅप्सुलचे उत्पादन

बहुतांशी कॅप्सुल निर्मितीसाठी मांसाहारी अंश असणाऱ्या जिलेटीनचा वापर होतो. भारत सरकार वनस्पतीच्या सेल्युलस पासून तयार होणाऱ्या शाकाहारी कॅप्सुलला प्रोत्साहन देत आहे. औरंगाबादच्या प्रकल्पात सेल्युलस पासून कॅप्सुल तयार करण्याची शक्यता आहे.

डीएमआयसीत कामाला वेग

१० हजार एकराच्या डीएमआयसीचा २२०० एकरावर शेंद्रा तर ७८०० ऐकरावर बिडकीन येथे विस्तार आहे. बिडकीनचा विकास ३ टप्प्यात होत असून पहिला २५०० हजार एकराचा टप्पा पूर्ण झाला आहे. आतापर्यंत डीएमआयसीत १३० प्लॉट विकले आहेत. पैकी १८ प्लॉटवर उत्पादनाला सुरूवात झाली आहे. ६० प्लॉटवर प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या