Wednesday, January 7, 2026
Homeनाशिककाही साध्य करा... साधुसंग धरा !

काही साध्य करा… साधुसंग धरा !

नंदन रहाणे 

आपण ज्या पृथ्वीवर वावरतो, तिथे जे जे काही दिसते ते त्रिमितीने युक्त असते. म्हणजे प्रत्येक वस्तुला लांबी, रुंदी, उंची किंवा खोली असते. मुंगी घ्या किंवा हत्ती घ्या, मातीचा कण घ्या अथवा पर्वताचा सुळका घ्या, गवताचे पाते घ्या नाहीतर वटवृक्ष घ्या… प्रत्येकाला या तीन मिती असणारच. शिवाय भारमान म्हणजे वजन ही असतेच. प्रत्येक वस्तुला याचा अर्थ असा की ही सृष्टी व तिच्यातील पदार्थ जड आहेत.

- Advertisement -

त्यांचे आणखीही एक वैशिष्ट्य आहे अन् ते म्हणजे सर्व पदार्थ काही ना काही प्रक्रियेने तयार होतात, काही काळ तसेच राहतात आणि नंतर त्यांचा नाश होतो. याला अपवाद कोणीही नाही… सजीवही नाही व निर्जीवहीं नाही! माणूस, वाघ, गरुड, देवमासा असे सारेच जन्माला येतात, बाढतात, नंतर मरतात, सरोबर भरतात तशी आटुनही जातात. घनदाट जंगलाना वणवे लागून त्यांची राख होते.

YouTube video player

वैशाखाच्या तडाख्यात हरणांचे कळपमाळावर कोसळतात.. माणूस हे सारे पाहात असतो, प्रत्यक्ष अनुभवही घेत असतो. तरीही तो यातून काहीच शिकत नाही. त्याला स्वार्थान आणि हव्यासाने झपाटलेले असते. मी, माझे, मला एवढेच त्याला कळत असते. इतरांचे काही का होईना, माझे मात्र चांगलेच झाले पाहिजे. जे उत्तम असेल ते फक्त माझ्याकडेच असावे, त्यापायी मी चोरी करीन, लूट करीन अशी ही माणसाची वृत्ती असते. आपण या जगात फक्त सुख भोगण्यासाठीच जन्माला आला आहोत व अनंतकाळ असेच जगणार या मस्तीमध्ये तो वावरत असतो… इतरांची पर्वा न करता! अशा प्रमत्त माणसांना ताळ्यावर आणण्यासाठी संत कटीबद्ध असतात. रोजच्या जगण्यातलीच उदाहरण देऊन नरहरी सोनार काय सांगत आहेत बघा-

चिताऱ्या काढी भिंतीवरी चित्रे  तैस विश्व सारे । अवघे हे ।।१।। पोरे बहु खेळती, शेवटी मोडिती । टाकुनिया जाती । आपुल्या घरा ।।२।। तैसे जन संसार करिताती सारे। मोहगुणे खरे । फार म्हणती ।।३।। काही साध्य करा, साधुसंग धरा । नाम हे उच्चारा । नरहरी म्हणे ।।४।

नरहरी महाराजांनी फार समर्पकपणे सांगितले आहे की, अगोदर काहीच नसते. मग पाया खणला जाऊन, तो दगडांनी भरतात. त्यावर विटांचे थर रचून भिंत उभी करतात. तिला गिलावा चढवून गुळगुळीत केली. मग शेवटी चितारी येतो आणि विविध चित्रे, पाने, फुले काढतो. पाहणारे त्या चित्रांनाच खरे मानतात व गुंतून पडतात. चित्रातले दृश्य खरे असते का? गल्लीतही मुलेमुले गोळा होतात. ठिकऱ्या आणून रचतात, लगोरीचे डाव खेळतात. विजय झाला की नाचतात, पराजय झाला की भांडतात. वेळ संपली की सगळे फरश्यांचे तुकडे तिथेच सोडून आपापल्या घराकडे निघून जातात.

मोठी माणसेही तशीच असतात. माझे माझे म्हणून संसाराचा डाव मांडतात, स्वार्थापायी भांडतात. मोहवंश होऊन सगळी धडपड खरी मानतात. पण एक वेळ अशी येते की, सगळे काही टाकून जावेच लागते! शेवटी मुख्य मुद्दा ऐरणीवर घेऊन नरहरी सोनार शेवटचा उपदेशाचा ठोका नेमकेपणाने टाकतात.. असे बाबांनो, अशा मायेत का फसता रे? जन्माला आलात, तर काही आत्महित साध्य करा. सज्जनांची, संतांची, साधुंची संगती धरा. श्रीहरीचे नाव अगदी फुकट आहे. ते उच्चारुन मोह, लोभ, लालसा, हव्यास यावर मात करा! त्यातच तुमचे कल्याण आहे!

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...