मुंबई । Mumbai
पावसाळी अधिवेशनादरम्यान विधीमंडळाच्या लाॅबीमध्ये झालेल्या आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमधील हाणामारी प्रकरणाचा चौकशी अहवाल आज (१० डिसेंबर) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर होणार आहे. या घटनेची गंभीर दखल घेत विशेष अधिकार हक्क भंग समितीने हा चौकशी अहवाल तयार केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अहवाल उद्या गुरुवारी (११ डिसेंबर २०२५) विधानसभेच्या सभागृहात ठेवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या समर्थकांच्या गैरकृत्यामुळे दोन्ही आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हाणामारी प्रकरणात पडळकर समर्थक ऋषिकेश टकले आणि आव्हाड समर्थक नितीन देशमुख यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विधीमंडळाच्या अतिसंवेदनशील लाॅबीमध्येच हा प्रकार घडल्याने राज्यभरात याचे गंभीर पडसाद उमटले होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अहवालामध्ये दोषींवर राज्य शासनाकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. प्राथमिक चौकशीत असे निदर्शनास आले आहे की, या दोन्ही आमदारांनी आपल्या समर्थकांना विधीमंडळात प्रवेश देताना नियमांचे उल्लंघन केले होते. या घटनेमुळे विधीमंडळात बाहेरील व्यक्तींना प्रवेश देण्याबाबतच्या नियमावलीचे उल्लंघन किती गंभीर आहे, हे स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर नागपूरच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही तब्बल १५ आमदारांकडून त्यांच्या समर्थकांना विधीमंडळात प्रवेश देताना अशाच प्रकारे नियमभंग झाल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आले आहे.
विधीमंडळाच्या सुरक्षिततेच्या आणि नियमांच्या दृष्टीने हा अत्यंत गंभीर प्रकार असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेतली आहे. विधीमंडळाच्या आत नियम तोडणाऱ्यांविरोधात आता कायदेशीर आणि प्रशासकीय पाऊले उचलली जाणार का, हे अहवाल सादर झाल्यावर स्पष्ट होईल. सभागृहात सादर होणाऱ्या अहवालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.




