Monday, May 6, 2024
Homeनगरशिर्डीत विनामास्क व्यक्तींवर कारवाई ; पोलिसांसोबत धक्काबुक्की

शिर्डीत विनामास्क व्यक्तींवर कारवाई ; पोलिसांसोबत धक्काबुक्की

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

विनामास्क दंडात्मक कारवाई सुरू असताना मुंबई येथील तिघांनी पोलिसांसोबत धक्काबुक्की केली आहे.

- Advertisement -

शहरात विनामास्क फिरणारे तसेच विषाणू साथरोग अनुषंगाने नियमांचे पालन न करणार्‍या व्यक्तींवर शिर्डी नगरपंचायत आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू असून यात रुपये 100 असा दंड आकारला जात आहे. मात्र यावेळी बाचाबाची आणि धक्काबुक्कीची घटना समोर आली आहे.

दि. 12 रोजी सकाळी 11 वा. पिंपळवाडी चौक नगर-मनमाड रोड याठिकाणी विनामास्क दंडात्मक कारवाई सुरू असताना मुंबई विलेपार्ले येथील तिघांना मास्क न वापरल्याने साध्या वेशातील पोलिसांनी जाब विचारला. संबंधित इसमांनी उलट प्रश्न करून बाचाबाची सुरू केली. यावेळी गणवेशातील पोलिसांना बोलविण्यात आले.

मात्र संबंधित इसम कुणाचेही ऐकण्यास तयार नव्हते.त्यानंतर पोलीस आणि तीन इसमांत वाद होऊन झटापट झाली. पोलिसांची होणारी झटापट पाहून स्थानिक नागरिकांनी देखिल मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तदनंतर पोलिसांनी तिघा इसमांना गाडीत बसवून शिर्डी पोलीस स्टेशन मध्ये नेले.

संबंधित व्यक्ती साईभक्त आहेत. यामुळे शिर्डीतील सचिन तांबे, गोपीनाथ गोंदकर, रवींद्र गोंदकर, दीपक वारुळे, दत्तू कोते आदींनी शिर्डी पोलीस स्टेशऩमध्ये धाव घेतली. यावेळी पोलिसांनी तिघांची माहिती घेतली असता यातील एकावर हाफ मर्डर, तसेच दुसर्‍यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल असल्याचे निदर्शनास आले.

आपल्या बचावासाठी गावातील मंडळी आल्याचे लक्षात येताच संबंधित तिन इसमांनी पोलीस स्टेशन मध्ये देखिल आवाज चढवला. यावेळी उपस्थित सुज्ञ पदाधिकार्‍यांनी आपण चुकीच्या व्यक्तींसाठी आलो हे लक्षात आल्याने पोलिसांना कारवाई करण्यास सांगून बाहेर पडले.

पोलीस कॉन्स्टेबल किशोर अस्तिकराव औताडे यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी मरुगण सेल्व्राज देवेंद्र (वय 33) रा. विलेपार्ले, वेंकटेश सुब्रहमण्यम तेवर (वय 27) रा. माहिम, माशिला मनी मारुमुतु पिरायजी (वय 34) रा. विलेपार्ले मुंबई यांच्यावर भादंवि कलम 353, 332, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे करत आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून साईबाबा मंदिर बंद असल्याने येथिल आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली आहे. मंदिर जरी बंद असले तरी दिवसाकाठी हजार भाविक समाधी मंदिराच्या कळसाचं दर्शन घेत आहेत. अलिकडे गर्दी होऊ लागली असून येथील व्यावसायिक आणि नागरिकांनी मास्क वापरणे महत्त्वाचे आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर हा स्वतःसाठी आणि परिवारासाठी महत्त्वाचा आहे. करोना आटोक्यात राहिला तरच लवकरात लवकर मंदिर खुले होऊन साईनगरी पूर्वपदावर येईल हे शिर्डीकरांनी विसरता कामा नये.

दिवाळी सणात पोलीस आणि नगर प्रशासनाने दंडात्मक कारवाई शिथिल करून वेगळ्या प्रकारची कारवाई सुरू करणे गरजेचे आहे. नागरिक सध्या आर्थिक अडचणीत असून ऐन सणात दंडात्मक कारवाई त्रासदायक ठरत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या