मुंबई | Mumbai
लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election) निकाल लागून दोन आठवडे होत आले आहेत. मात्र,या निकालाच्या दिवशी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या घोळावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) आणि शिंदेंच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्यात लढत झाली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल किर्तीकर यांचा फक्त ४८ मतांनी पराभव झाला. मात्र, या मतमोजणीच्या वेळी घोळ झाल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात आला आहे. त्यावरून दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यासंदर्भात आज ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आणि अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत या मतमोजणी प्रक्रियेत फेरफार झाल्याचे आरोप करून महत्त्वाची मागणी केली आहे.
हे देखील वाचा : भाजपमध्ये मोठे फेरबदल; विधानसभेसाठी महाराष्ट्राच्या प्रभारीपदी ‘या’ नेत्यांची नियुक्ती
यावेळी बोलतांना अनिल परब (Anil Parab) म्हणाले की, “४ जूनला जो निकाल लागला त्यात अमोल कीर्तिकर यांचा ४८ मतांनी पराभव झाला.हा पराभव संशयास्पद आहे.आम्ही या विरोधात कोर्टात जात आहोत.निवडणुकीची एक प्रक्रिया असते. त्याद्वारे निवडणूक होत असते. यावेळी मात्र निवडणूक प्रक्रियेला हरताळ फासण्यात आला आहे. १९ व्या फेरीनंतर ही प्रक्रिया डावलली गेली.निकाल जवळजवळ येत होते त्यावेळी पारदर्शकता बंद झाली. कुठल्याही मतदानाचा राऊंड पूर्ण झाल्यानंतर घोषणा केली जाते की कुणाला किती मिळाली आहेत. त्यानंतर दुसरा राऊंड सुरु होतो. १९ व्या फेरीपर्यंत हे सगळे बरोबर चालले होते. मात्र त्यानंतर गडबड करण्यात आली.पक्षाचे प्रतिनिधीही त्या ठिकाणी असतात.कारण पक्षांची मते जेव्हा कळतात तेव्हा उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर त्याचा ताळा मांडला जातो, असे त्यांनी म्हटले.
हे देखील वाचा : “लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाकडे…”; पंकजा मुंडेंचा राज्य सरकारला घरचा आहेर
पुढे ते म्हणाले की, टेबलमध्ये आणि आमच्या प्रतिनिधींमध्ये जाणीवपूर्वक अंतर ठेवण्यात आले.मात्, एआरओच्या टेबलवरुन वेगळीच संख्या पाठवली जात होती.मतदान संपल्यानंतर १७ सी नावाचा फॉर्म असतो.त्यात किती मतदान असते ते पेटीवर लिहिलेले असते.त्यावर सगळ्यांच्या सह्या असतात.हा फॉर्म टॅली होतो, की मतपेटीतली मते तशीच आहेत का? दुसरा प्रकार असतो १७ सी पार्ट टू. त्यात मतमोजणीच्या दिवशी फॉर्म भरायचा असतो आणि दोन्हीची सरासरी बघायची असते. यावेळी अर्ध्या लोकांना हे फॉर्म देण्यात आले. अर्ध्यांना दिलेच नाहीत.६५० मतांचा फेरफार करण्यात आला आहे ” असा आरोप अनिल परब यांनी केला.
हे देखील वाचा : अजितदादांचं कुटुंब आता वेगळं…; रोहित पवारांचं मोठं विधान
तसेच निकालात गडबड वाटल्यानंतर आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले ते म्हणाले की दोन दिवसात देऊ.पण नंतर हे फुटेज देण्यास नकार दिला. कोर्टाच्या आदेशानुसार देऊ शकत नाही असे ते आता सांगत आहेत. मतमोजणीवेळी मोबाईल वापरला गेला, त्यावर कोणाचे फोन आले याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. १० दिवसानंतर गुन्हा दाखल झाला. या १० दिवसात मोबाईल बदलले गेले असा आमचा आरोप आहे. गुरव कोण आहे? अधिकाऱ्याने यांचा मोबाईल वापरला का? सगळ्यांची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे, अशी मागणी अनिल परब यांनी केली.
हे देखील वाचा : पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात; सिग्नलची वाट पाहत असलेल्या एक्स्प्रेसला मालगाडीची धडक
तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले की, “अमोल कीर्तिकरांच्या सीटबाबत कोर्टाची लढाई सुरु होणारच आहे.कारण ही जागा आम्ही जिंकलो आहोत. हुकूमशाहीच्या विरोधात मुंबईकरांनी जो निकाल दिला तो जगजाहीर आहे. मात्र, यात जी गडबड झाली आहे त्यातील टेक्निकल गोष्टी आम्ही मांडू इच्छितो. निवडणूक निकाल आणि निवडणूक आयोग हे पाहिले तर निवडणूक आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन नाही तर एंटरायली कॉम्प्रोमाईज्ड कमिशन आहे. एका पक्षाच्या सांगण्यावरुन ते काम करत आहेत. सगळी गडबड करुनही इंडिया आघाडीने चांगले यश मिळवले आहे.ही गडबड झाली नसती तर सरकार बदलले असते,” असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा