Sunday, May 5, 2024
Homeअग्रलेखस्वयंप्रेरणेची प्रशंसनीय आशादायी उदाहरणे!

स्वयंप्रेरणेची प्रशंसनीय आशादायी उदाहरणे!

सध्या जगातील अनेक देश करोना काळाच्या अभूतपूर्व झाकोळात वावरत आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. समाजमाध्यमांमुळे अफवाही वार्‍यासारख्या पसरत आहेत. त्यामळे लोकांमध्ये दहशत आहे.

कामासाठी घराबाहेर पडावे तर संसर्ग होण्याची आणि नाही पडावे तर दैनंदिन जीवन विस्कळीत होण्याची भीती अशा कात्रीत लोक सापडले आहेत. सद्यस्थितीत आशादायी काही घडणारच नाही का असा प्रश्न लोकांना सतावत असावा. तथापि अशा काहीशा निराशेच्या वातावरणातही काही लोक शांतपणे समाजाच्या भल्यासाठी झटत आहेत. करोनाच्या दहशतीवर मात करून काम करत आहेत. निर्बंध कसोशीने आणि मनापासून पाळले तर करोनाला दूर ठेवणे शक्य आहे हेही यानिमित्ताने लोकांना सोदाहरण पटवून देत आहेत. मराठवाड्यातील अनेक तरुणांनी एकत्र येऊन जलसंधारणाची चळवळ उभी केली आहे. करोनाच्या साथीबरोबरच तापमानही वाढत आहे. साधारणतः मार्च ते जून महिन्यात अनेक गावांना पाणीटंचाई सहन करावी लागते. तथापि मराठवाड्यातील बहुतेक गावांना बारा महिने अठरा काळ पाणीटंचाई भेडसावते. जणू काही ती त्यांच्या पाचवीलाच पुजलेली असावी. उर्वरित आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रानेही मराठवाड्यावर मागासपलेपणाचा शिक्का मारण्यात कळत-नकळत स्वारस्य दाखवले आहे. अन्याय झाल्याची भावना मराठवाड्यातही रुजल्याचे अनुभवास येते. पण मराठवाड्यातील तरुणाईने मात्र यावर मात करण्याचा मार्ग शोधला आहे. संकेत कुलकर्णी या इतिहास विषयात अधिक संशोधन करणार्‍या तज्ज्ञांच्या मते मराठवाड्यातील अनेक गावांमध्ये 1-2 तरी ऐतिहासिक बारव आहेत. त्या स्वच्छ करण्याची मोहीम गावखेड्यातील तरुणांनी सुरु केली आहे. मुंबईच्या रोहन काळे याने प्रथम याची सुरुवात केली. त्याने फेसबुकवर ‘महाराष्ट्र बारव मोहीम’ असा ग्रुप सुरु केला आणि या ग्रुपला शेकडो तरुण जोडले गेले. रोहन आणि त्याच्या मित्राने मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील 700 पेक्षा जास्त बारवांना भेट दिली. त्यांच्या नोंदी केल्या. ती माहिती सर्वांसाठी उपलब्ध करून दिली.

- Advertisement -

आता या बारव स्वच्छ करण्याचे काम सुरु झाले आहे. ज्या गावांमध्ये बारव आहेत त्या त्या गावातील तरुण यासाठी एकत्र येत आहेत. बारव शेकडो वर्षे गावाला पाणी पुरवत होत्या. त्यांची निगा राखली तर दुष्काळातही त्यांचे पाणी उपलब्ध होऊ शकते हे लक्षात घेऊन गावोगावचे तरुण या मोहिमेला जोडले जात आहेत. कर्नाटक राज्यातील तुमकुरू जिल्ह्यातही अशीच मोहीम आकाराला आली आहे. या जिल्ह्यातील अनेक गावांमध्येही भीषण पाणीटंचाई असते. मल्लिकार्जुन होसापायला हे पाणीबचतीसाठी काम करतात. तेथील अनेक गावांमध्ये ‘तळपीरगे (जिवंत झरा)’ ही पाणीबचतीची प्राचीन पद्धत होती असे त्यांनी अनेक गावकर्‍यांना सांगितले. ते झरे शोधून द्यायला देखील मदत करतात. कालौघात वापर थांबलेले 300 पेक्षा जास्त जिवंत झरे त्यांनी आत्तापर्यंत गावकर्‍यांच्या मदतीने शोधले आहेत. त्यामुळे अनेक गावे टँकरमुक्त होत आहेत. जिवंत झर्‍यांच्या उपयुक्ततेची पद्धत दोन हजार वर्षे जुनी असून त्याचे लिखित दस्तऐवज सोळाव्या शतकापासून सापडतात असे मल्लिकार्जुन यांचे म्हणणे आहे. तळपीरगे शोधून वापरात आणण्याच्या पद्धतीने नुकतेच निरकल्लू गाव दुष्काळमुक्त झाले. गेली सलग 10 वर्षे हे गाव दुष्काळाशी झुंजत होते.

शहरांमध्ये विविध प्रकारची सामाजिक कामे सतत सुरु असतात. तथापि गावखेड्यातील तरुणही गावाच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येऊ लागले आहेत. गावाच्या समस्या सोडवायच्या असतील तरी फक्त शासनावरच अवलंबून राहाता येणार नाही. शासनाकडून समस्या सोडवल्या जातीलही कदाचित पण त्यासाठी किती काळ तिष्ठत राहावे लागेल हे कोणीच निश्चित सांगू शकणार नाही. त्यापेक्षा गावकरी एकत्र आले तर समस्या लवकर सुटू शकतात याचे भान गावपातळीवर रुजत आहे. तरुणाईने घेतलेल्या पुढाकाराला निसर्गाकडून मिळणार्‍या साथीसोबतच गावकर्‍यांकडून देखील सहकार्य मिळू लागले आहे हे विशेष. त्यामुळे अशी अनेक गावे ‘गाव करील ते राव काय करील’ असा अनुभव घेत आहेत. काम करण्याची प्रेरणा आणि काम करणार्‍या कार्यकर्त्यांना करोनाची साथ थांबवू शकत नाही याचे भान समाजाल येईल आणि समाजहिताच्या अनेक चळवळी सुरु होतील अशी आशा या मोहिमांमुळे पल्लवित झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या