Sunday, May 19, 2024
Homeअग्रलेखभेदाभेद भ्रम अंमगळ ठरवणारा कौतुकास्पद उपक्रम!

भेदाभेद भ्रम अंमगळ ठरवणारा कौतुकास्पद उपक्रम!

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म
भेदाभेद भ्रम अमंगळ
कोणाही जीवाचा न घडो मत्सर
वर्म सर्वेश्वर पूजनाचे
असा उपदेश संत तुकाराम महाराजांनी केला तर संत ज्ञानेश्वरांनी ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ अशी प्रार्थना केली. महाराष्ट्राला वैचारिक आणि सामाजिक सुधारणांचा मोठाच वारसा लाभला आहे. त्या वारशाचे छोट्या मोठ्या कृतीतून पाईक होण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील अनेक संस्था करतात. नाशिकमधील शंकराचार्य न्यास आणि धर्म जागरण मंच या संस्था समाजातील भेदाभेद दूर सारण्यासाठी गेली दहा वर्षे प्रयत्न करत आहेत. या संस्था समाजातील सर्व जातीच्या माणसांना शास्त्रोक्त पूजाविधीचे आणि पौरोहित्याचे मोफत प्रशिक्षण देतात. प्रशिक्षणार्थींना संस्कृतमधून संभाषण करायला देखील शिकवले जाते. नाशिकमधील उपक्रमाचे यंदाचे दहावे वर्षे. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमधील साडेतीनशेपेक्षा जास्त लोकांनी या संस्थांमध्ये पौरोहित्याचे धडे गिरवले आहेत. त्यात समाजातील अठरापगड जातींच्या लोकांचा समावेश आहे. असे उपयुक्त कार्य पुण्यातही ज्ञानप्रबोधिनी सारख्या काही संस्था गेली दोन-तीन दशके करत आहेत. कदाचित राज्यात आणखी काही ठिकाणी हा उपक्रम चालू असेलही. समाजातील सद्यस्थिती मात्र नेमकी संतवचनांच्या विपरित आढळते. जाती आणि धर्माच्या नावाखाली समाजाचे विघटन करण्याचे आसुरी प्रयत्न जाणीवपूर्वक सुरु असावेत का या शंकेने जाणते अस्वस्थ आहेत. डॉ. राहत इंदौरी म्हणतात,
झूठों ने झूठों से कहा है सच बोलो
घर के अंदर तो झूठों की एक मंडी है
दरवाज़े पर लिखा हुआ है सच बोलो
समाजाच्या दुदैर्वाने कोणताही राजकीय पक्ष आणि त्यांचेे नेते-कार्यकर्ते याला अपवाद नाहीत. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी संस्कृती आणि धर्मांना वेठीला धरण्यात कोणालाही काहीही वावगे वाटू नये हीच शोकांतिका आहे. लोकांनाही याचा दोष देणे त्यांच्यासाठी अन्यायकारक ठरेल का? कारण अशा अनेक कुप्रथा आणि परंपरा गेली शेकडो वर्षे समाजाच्या अंगवळणी पडल्या आहेत. ज्या संतांनी विश्वकल्याणाचे पसायदान मागितले त्यांनाही याच कुप्रथांचा, समाजातील भेदाभेदांचा फटका सहन करावा लागला. सर्व संतांनाही कुठल्या ना कुठल्या जातीने आपल्या मांडीवर बसवून जणू दत्तक घेतले आहे. खरे तर ही त्या विशाल व्यक्तिमत्वांची अवहेलनाच नाही का? समाजाच्या या कृपण वृत्तीमुळे सर्व संतांचे विचार फक्त पोथीबद्ध उरतात. नेतेमंडळी जातींचे उच्चाटन करण्याची कितीही भलामण करत असले तरी पडद्यामागचे सुत्रधार सर्वच पक्षांचे सारखे असतात हे आता जनताही ओळखून आहे. भारतीय संस्कृतीत भेदाभेदाला जागा नाही हे संतांनी सतत सांगितले. समाजसुधारकांनी त्या विचारांचा प्रसार करणार्‍या विविध संस्था उभारल्या. चळवळी चालवल्या. ‘हे विश्वचि माझे घर’ किंवा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या मूल्याची देणगी समाजाला देणार्‍या सनातन हिंदू धर्माचे गोडवे सगळेच गातात. पण वर्तन मात्र त्या विपरित! माणसांना माणुसकीला, शेजारधर्माला आणि माणुसपणालाही पारखे करण्याचे प्रयत्न सतत सुरु आहेत. असे करण्याने सनातन हिंदू धर्माला आपण लघुत्व बहाल करत आहोत याचे भानच सुटले आहे. शंकराचार्य न्यास आणि धर्म जागरण मंचाने मात्र गेली दहा वर्षे चाकोरीबाह्य उपक्रम चालवला आहे. अशा नवनवीन कल्पनाच विखारी वातावरण फैलावण्याला अडसर निर्माण करु शकतील. या उपक्रमाची कल्पना ज्यांनी मांडली त्यांना नक्कीच द्रष्टे म्हणावे लागेल. जातीच्या उतरंडीच्या नावाखाली समाजातील ज्या घटकांना नेहमीच दुय्यम स्थान दिले त्यांना पुन्हा सर्वांच्या बरोबरीचे स्थान देण्याचा हा प्रयत्न आहे. आता मंदीरांमध्ये पुजार्‍यांची नेमणूक करताना पौरोहित्य शिकलेल्या सर्व जातींच्या पुरोहितांचा विचार केला जाईल आणि समाजाला एकता बहाल करण्याचे असे प्रयत्न बळकट केले जातील अशी अपेक्षा करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या