अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राहुरी न्यायालयाच्या आवारात 25 जानेवारी 2024 रोजी अॅड. मनीषा आढाव यांनी माझ्याकडून दोन पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या, परंतु त्याचे पैसे देण्याचे विसरल्या. त्यावेळी तेथे एक निळ्या रंगाची कार आली होती. त्यात अॅड. राजाराम आढाव होते. त्यांनी एक पाणी बाटली त्यांना दिली. दुपारी त्या पैसे देण्यासाठी माझ्याकडे आल्या व पैसे देऊन शुभम महाडिक याच्या दुचाकीवर बसून गेल्या, असा घटनाक्रम बुधवारी साक्षीदार चहावाल्याने न्यायालयात सांगितला. मानोरी (ता. राहुरी) येथील अॅड. राजाराम आढाव व अॅड. मनिषा आढाव दाम्पत्याच्या हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर सुरू आहे.
माफीचा साक्षीदार हर्षल ढोकणे, राहुरी न्यायालयातील वकील यांची साक्ष झाल्यानंतर बुधवारी न्यायालयाच्या आवारात असलेल्या चहा विक्रेत्याची साक्ष नोंदविण्यात आली. विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी घेतलेल्या सरतपासणीत त्या चहा विक्रेत्याने सांगितले की, 25 जानेवारी 2024 रोजी अॅड. आढाव दाम्पत्याला शेवटी एकत्र पाहिले होते. ते दोघेही माझ्या चहाच्या टपरीवर आले होते. अॅड. मनिषा आढाव यांनी माझ्याकडून दोन पाण्याच्या बाटल्या विकत घेतल्या होत्या. मात्र, पैसे न देताच त्या न्यायालयासमोर उभ्या असलेल्या निळ्या रंगाच्या कारकडे गेल्या. त्या कारमध्ये बसलेल्या लोकांशी बोलल्या. कारमध्ये ड्रायव्हर सीटच्या शेजारी अॅड. राजाराम आढाव बसले होते. कार निघून गेल्यानंतर त्या न्यायालयात गेल्या. दरम्यान, दुपारी एक वाजता अॅड. मनिषा आढाव पाणी बाटलीचे पैसे देण्यासाठी माझ्याकडे आल्या. घाईत असल्याने पाणी बाटलीचे पैसे राहिले.
शुभम महाडिकच्या मित्राचे जामीन प्रकरण पाथर्डी येथे असल्याने गडबडीत पैसे देण्याचे विसरले, असे म्हणाल्या. त्यावेळी त्यांना मी म्हणालो, मॅडम आज खुप गडबडीत आहात. त्या म्हणाल्या, शुभम भैय्या आला आहे त्याच्यासोबत जायचे, वकिल साहेबांनी बोलावले आहे. त्यानंतर त्या शुभम महाडिकच्या दुचाकीवर बसून निघून गेल्या. त्यानंतर 26 जानेवारी 2024 रोजी अॅड. आढाव दाम्पत्याचा खून झाल्याचे समजले. दरम्यान, तहसीलदार यांच्यासमोर झालेल्या आरोपींच्या ओळख परेड दरम्यान संशयित आरोपी शुभम महाडिक याला ओळखल्याचेही त्याने न्यायालयात सांगितले. त्यानंतर न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित आरोपी शुभम महाडिक याला ओळखले. संशयित आरोपीचे वकील अॅड. सतीष वाणी यांनी उलटपासणी घेतली. पुढील सुनावणी 22, 23 व 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे.