शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Former President Ramnath Kovind) यांनी गुरुवारी (दि.7) सपत्नीक शिर्डी येथे येऊन साईबाबा समाधी मंदिरमध्ये समाधीचे मनोभावे दर्शन (Sai Baba Samadhi Darshan) घेतले. मध्यान्ह आरतीपूर्वी त्यांनी साईबाबांची पद्मपूजा केली. तसेच शिर्डी माझे पंढरपूर (Pandharpur) ही छोटी आरती भक्तिभावाने सादर केली. यावेळी श्री साईबाबा संस्थानच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व साईबाबांची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार केला. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना माजी राष्ट्रपती कोविंद (Former President Ramnath Kovind) म्हणाले, इष्ट देवाचे ज्यावेळी बोलावणे येते, त्यावेळीच दर्शनासाठी येणे होते. साईबाबांच्या चरणी मी कायम प्रार्थना करत असतो. तुम्ही मला बोलवा, मी दर महिन्याला येत राहीन.
शिर्डी दौर्याबाबत बोलताना ते म्हणाले, काल काळाराम मंदिर येथे धर्मध्वज स्थापनेच्या कार्यक्रमासाठी आलो होतो. नाशिकला आलो असल्याने शिर्डी जवळ आहे, त्यामुळे आज साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. साईबाबांवर माझी खूप श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा आज साईचरणी अर्पण केली आहे. याप्रसगी जगभरातील युद्धजन्य परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत जागतिक शांततेसाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केल्याचे सांगितले. जगात युद्धाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते संपावे तसेच देशातील सर्व नागरिक सुखी, समाधानी आणि सुरक्षित राहावेत यासाठी साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, वंदे मातरमला जनगणमनप्रमाणे महत्त्व देण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. हा चांगला निर्णय आहे. आपण देवाची आरती करतो, त्यावेळी शब्द बदलू शकतात.
मात्र भावना राष्ट्रभक्तीचीच असते. जन-गण-मन आणि वंदे मातरम या दोन्ही गीतांत भारतमातेप्रती श्रद्धा व्यक्त होते. त्यामुळे वंदे मातरम जोडले जात असेल तर त्याचा आनंदच आहे, असे त्यांनी स्पष्ट करत नाशिकमधील कार्यक्रमात जन-गण-मन, वंदे मातरम तसेच महाराष्ट्र गीतही गायले गेले. महाराष्ट्र सरकारने ही परंपरा जपल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते. या दौर्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दर्शन व्यवस्था सुरळीत पार पडावी यासाठी संस्थान प्रशासन आणि पोलिसांनी विशेष नियोजन केले होते.





