नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे पाकिस्तानकडून हवाई हल्ला झाल्याच्या घटनेनंतर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात संघर्ष सुरू झाला आहे. यादरम्यान रविवारी तालिबानने पाकिस्तानला आयएसआयएस दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या मुद्द्यावर इशारा दिला आहे. याबरोबरच तालिबानने काबूलमध्ये झालेल्या पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या एअरस्ट्राईकला प्रत्युत्तर म्हणून केलेल्या हल्ल्यात एकूण ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला आहे.
अफगाणिस्तानच्या हल्ल्यानंतर हेलमंड, पक्तिया, खोस्त आणि नांगरहारमध्ये पाकिस्तानी आणि अफगाण सैन्यात तीव्र चकमक झाल्याचे वृत्त आहे. या भागात तणाव वेगाने वाढत आहे आणि सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे. अफगाणिस्तानच्या निशाण्यावर पाकिस्तानच्या लष्कर चौक्या होत्या. २५ चौक्या पाकिस्तानच्या या अफगाणिस्तानच्या ताब्यात आहेत. पाकिस्तानच्या सात सैनिकांना अफगाणिस्तानने ओलिसही ठेवलेय. हा पाकिस्तानच्या लष्करावरील सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जातंय.
“पाकिस्तानने त्यांच्या भूमीवर दडून बसलेल्या ISIS च्या महत्त्वाच्या सदस्यांना हद्दपार करावे किंवा त्यांना इस्लामिक अमिरातीकडे सोपवावे… ISIS ग्रुप अफगाणिस्तानसह जगातील अनेक देशांसाठी धोका आहे,” असे तालिबानचे प्रवक्ते जबिउल्लाह मुजाहिद यांनी बोलताना सांगितले.
पुढे ते म्हणाले की, अफगाण सैन्याने २५ पाकिस्तानी लष्करी चौक्या ताब्यात घेतल्या आहेत, त्यात ५८ पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत. अफगाणिस्तानच्या हल्ल्यात ३० हून अधिक पाकिस्तानी सैनिक जखमी झाले आहेत.
९ ऑक्टोबरला रात्री पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबूल आणि पक्तिका प्रांतांवर हवाई हल्ले केल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. पाकिस्तानने केलेल्या या हवाई हल्ल्यात काबूल आणि पक्तिका येथील एक संपूर्ण नागरी बाजारपेठ आणि ३५ निवासी घरे उद्ध्वस्त केली. यानंतर काबूल आणि पक्तिका येथे झालेल्या हल्ल्यांचे परिणाम आता भोगावे लागतील, असा इशारा अफगाणिस्तानकडून देण्यात आला होता. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी रात्री अफगाणिस्तानकडून पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




