Friday, May 3, 2024
Homeनगरदिवाळीनंतर राजकीय आतषबाजी रंगणार

दिवाळीनंतर राजकीय आतषबाजी रंगणार

अहमदनगर |Ahmednagar| ज्ञानेश दुधाडे

कोविडचे दीड वर्षे वाया गेल्यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. आठ दिवसांवर दिवाळी सण आला असून बाजारात चैतन्य, उत्साह निर्माण होण्यास सुरूवात झाली आहे. त्यात दिवाळीनंतर आणखी भर पडणार असून जिल्ह्यात विधान परिषद, विविध सहकारी संस्था, नगर पालिका, नगर परिषद आणि त्यानंतर लगेच जोडून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे खर्‍याअर्थाने दिवाळीनंतर जिल्ह्यात राजकीय आतषबाजी पाहण्यास मिळणार आहे.

- Advertisement -

साधारपणे नोव्हेंबर महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात जिल्ह्यात विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार आहे. विधान परिषदेच्या नगरच्या जागेची मुदत 1 जानेवारीला संपत असून त्याआधी डिसेंबरमध्ये या जागेसाठी निवडणूक होणार आहे. या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, महापालिकाचे नगरसेवक, नगर पालिका आणि नगर परिषदेचे नगरसेवक मतदार आहेत. राज्यातील महाविकास आघाडी या निवडणुकीत कायम राहणार असल्याने जिल्ह्यात भाजपची चांगलीच राजकीय कोंडी होणार असल्याचे सध्यातरी दिसत आहे.

दरम्यान, आधीच पाच नगर पालिका आणि नगर परिषदेवर प्रशासक असून आणखी सात नगर पालिका आणि नगर परिषदेची मुदत डिसेंबरमध्ये संपणार आहे. यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर लगेच 12 नगर पालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. यामुळे भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार असून राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगणार आहेत. यासोबत ग्रामीण भागात सेवा सोसायट्यांचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून यामुळे ऐन थंडीत गावा-गावातील राजकीय गरमा-गरमी वाढणार आहे.

21 मार्चपूर्वी जिल्हा परिषदेत नवीन अध्यक्षांची निवड करावी लागणार असल्याने जानेवारी महिन्यांच्या शेवटच्या अथवा फेबु्रवारी महिन्यांच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. खर्‍याअर्थाने ही निवडणूक म्हणजे मिनी विधानसभा निवडणुकी प्रमाणेच असल्याने या निवडणूक महाविकास आघाडी होणार की स्वतंत्रपणे लढूननंतर एकत्र येण्याचा निर्णय घेणार याकडे मतदारांचे लक्ष राहणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहिल्यास त्यातून राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसमध्ये बंडखोरी वाढण्याची शक्यता आहे. वास्तवात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका या कार्यकर्ते घडविणार्‍या असल्याने प्रत्येक राजकीय पक्ष आपली पकड मजबूत करण्यासाठी त्या ताकदीने लढतात. जिल्ह्यात आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आपले यश राखलेले आहे. यामुळेच या निवडणूका या विधानसभा निवडणूकी प्रमाणे ताकदीने लढण्यात येत असल्याने या निवडणुकांना मोठे महत्व आहे.

आचारसंहितेचा कचाटा

जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीपासून आचारसंहिता लागू होणार आहे. डिसेंबरमध्ये ही निवडणूक झाल्यावर साधारण जिल्हा परिषदेला 15 ते 25 दिवसांचा कालावधी मिळणार असून त्यानंतर पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीसाठी लागणारी आचारंसहिता ही मार्च महिन्यांत संपणार आहे. यामुळे आता कोविडमधून सावल्यानंतर लोकप्रतिनिधींना मार्चअखेर निधी खर्च करण्यासाठी नियोजनबद्ध आखणी करावी लागणार आहे. अन्यथा निधी अखर्चित राहण्याचा धोका आहे.

राष्ट्रवादी, सेना आणि काँग्रेसकडून तयारी सुरू

जिल्ह्यात होणार्‍या विविध निवडणुकांसाठी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसकडून तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादीकडून पक्षाचा संघटनात्मक आढावा घेण्यात येत असून शिवसेनेच्या वतीने जिल्हाभर कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी खास अभियान राबविण्यात येत असून काँग्रसेने देखील निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे भाजपच्या गोटात अद्याप शांतता दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या