नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
इराण आणि इस्रायलमध्ये १२ दिवस चाललेला भीषण संघर्ष युद्धविरामाने थांबला. मध्यपूर्वेतील परिस्थिती आता काहीशी सामान्य होईल, असे मानले जात होते. परंतु इस्रायलने अचानक आपले लक्ष दुसऱ्या प्रदेशाकडे वळवले आहे. शुक्रवारी सकाळी इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हवाई हल्ले केले. यामुळे परिसरात स्फोटांचे आवाज ऐकू आले, ज्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, या भागात अचानक मोठे स्फोट ऐकू आले, इस्रायली लढाऊ विमानांच्या गर्जनाही झाल्या. याशिवाय, दक्षिण लेबनॉनच्या अनेक भागात पाळत ठेवणारे ड्रोन देखील उडताना दिसले.
लेबनॉन मधील हल्ल्यांबाबत बोलताना इस्रायली सैन्याने सांगितले की, ‘हिजबुल्लाहच्या कारवाया थांबवण्यासाठी हे हल्ले करण्यात आले आहेत. दक्षिण लेबनॉनमधील नबातियाह अल-फौका आणि इकलीम अल-तुफाहच्या टेकड्यांवरील बऱ्याच ठिकाणांवर हल्ले करण्यात आले आहेत. हिजबुल्लाहच्या पायाभूत सुविधा आणि त्यावर काम करणाऱ्या लोकांना टार्गेट करण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले आहे.
एका वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने सांगितले की, इस्रायली लढाऊ विमानांनी दक्षिण लेबनॉनमधील माउंट शुकेफ भागात एका लपण्याच्या ठिकाणाला लक्ष्य केले. हे लपण्याचे ठिकाण हिजबुल्लाहच्या अग्नी नियंत्रण आणि सुरक्षा यंत्रणेचे संचालन करण्यासाठी वापरले जात होते. इस्रायली सैन्याच्या मते, हे एका भूमिगत प्रकल्पाचा भाग आहे, जे पूर्वी इस्रायली हल्ल्यांमध्ये नुकसान झाले होते, परंतु आता ते पुन्हा बांधले जात आहे.
इस्रायली हल्ल्याच्या एक दिवस आधी हिजबुल्लाहचे उपप्रमुख शेख नईम कासिम यांनी इस्रायला स्पष्ट इशारा दिला होता. लेबनॉन कोणाच्याही दबावाखाली येणार नाही. हा आमचा देश आहे, आम्हाला तो हवा आहे आणि आम्ही त्यासाठी लढू असे कासिम यांनी म्हटले होते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




