Thursday, May 2, 2024
Homeअग्रलेखवरुण राजाची कृपा, देशात आबादानी !

वरुण राजाची कृपा, देशात आबादानी !

मोसमी पावसाचा आता परतीचा प्रवास सुरू झाला, असे बोलले जात आहे. भारतीय हवामान विभागाने तसा हवाला नुकताच दिला आहे. तथापि निम्मा हस्त, चित्रा व स्वाती नक्षत्रे अजून बाकी आहेत. यातील हस्त आणि चित्रा ही दणदणीत पावसाची नक्षत्रे मानली जातात.

मात्र आतापर्यंत पावसाने यंदा भारताला भरभरून जलदान दिले आहे. भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार यंदा सरासरीच्या 109 टक्के पाऊस झाला आहे. 36 हवामानशास्त्रीय उपविभागांपैकी 31 उपविभागांत सरासरीइतका वा त्याहून अधिक पाऊस पडला. महाराष्ट्राला त्याने चिंब भिजवले आहे.

- Advertisement -

राज्यात 16 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. देशात सलग दुसर्‍या वर्षी सरासरी ओलांडली गेली आहे. पर्जन्यराजाने भारतावर ‘आभाळमाया’ कायम ठेवली व सगळीकडे आबादानी केली आहे. केंद्र सरकारने अलीकडेच केलेले काही कायदे शेतकर्‍यांच्या भल्यासाठी असल्याचे ढोल पिटवले जात आहेत.

तथापि सरकार मेहेरबान होण्याआधीच पर्जन्यराजा देशावर आणि शेतकर्‍यांवर यंदा संतुष्ट झाला. सर्वत्र ‘जलसमृद्धी’ आली आहे. जेथे दरवर्षी पावसाची अवकृपा अनुभवास येते, त्या भागांतसुद्धा चालू वर्षी पावसाने कृपादृष्टी दाखवली. पावसाळा दरवर्षीच येतो. तरीही सर्वांना त्याची नवलाई वाटते. पाऊस वर्षानुवर्षे बरसत असला तरी शेतकरी समाजाला त्याच्या आगमनाची ओढ आणि आतुरता असते. पावसाच्या येण्यावरच शेतकर्‍यांचे वर्षभरातील कामकाजाचे वेळापत्रक ठरते.

समाधानकारक पावसाबाबतच्या हवामान विभागाच्या नुसत्या अंदाजांनीसुद्धा शेतकर्‍यांना दिलासा मिळतो. सरकार घोषणांचा पाऊस पाडते, पण खरा पाऊस पाडू शकत नाही. शेती पिकवण्यासाठी नैसर्गिक पावसाची गरज असते. दुष्काळी भागात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयोग अलीकडे राबवले जात आहेत, पण कृत्रिम पाऊस पडतो का? तो कुठे व किती पडला? याबद्दल आजवर कोणीच खात्रीने सांगू शकलेले नाही.

हा खटाटोप फक्त दुष्काळात होरपळणार्‍या जनतेच्या तात्पुरत्या समाधानापुरताच केला जात असावा. लागोपाठ दुसर्‍या वर्षी पावसाने समाधानकारक हजेरी लावून त्याच्यावर विसंबलेल्या शेतकर्‍यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. धरणे, तलाव तुडुंब भरले आहेत. नदी-नाल्यांचा खळखळाट सर्वत्र सुरू आहे. पावसाच्या जोरदार बरसण्याने अनेक शहरे जलमय झाली, पण ‘करोना’च्या टाळेबंदीने पावसामुळे होणार्‍या गैरसोयीलाही काही प्रमाणात टाळे लागले. काही राज्यांत पूरस्थिती उद्भवली. उभी पिके पाण्यात सडली.

घरादारांचे नुकसान झाले. पशुधन वाहून गेले. काही ठिकाणी छोटे पूल कोसळले. गावागावांचा संपर्क तुटला. ही हानी असह्य असली तरी जलसमृद्धी आल्याने सगळे समाधानी आहेत. कोरड्यापेक्षा ओला दुष्काळ केव्हाही चांगला, असे म्हणणार्‍या आणि मानणार्‍यांची संख्या बरीच आहे. शेतीत काहीच न पिकण्यापेक्षा पीक चांगले येऊन झालेले थोडेफार नुकसान परवडले, खरीपातील नुकसानीची कसर रब्बीत भरून काढता येईल, असा पुढचा विचार बळीराजाच्या मनात असतो.

शेतकर्‍यांच्या कांदाचाळीतील उन्हाळ कांद्याचे पावसाने नुकसान झाले. चांगला बाजारभाव असताना त्याचा लाभ पदरात पडण्यापूर्वीच सरकारने निर्यातबंदी केली. तोंडचा घास हिरावला, पण टमाट्याने शेतकर्‍यांना बर्‍यापैकी हात दिला. गेल्या शंभर वर्षांत पावसाचे प्रमाण अजिबात कमी झालेले नाही, उलट त्यात थोडीशी वाढच झाली आहे, असे हवामानतज्ञ सांगतात. चांगला पाऊस झाल्याने सर्वत्र आशादायी चित्र निर्माण झाले आहे. दरवर्षीचा मोसमी पाऊस म्हणजे ‘लाख दुखों की एक दवा’ या म्हणीची सहज आठवण देतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या