Monday, May 6, 2024
Homeअग्रलेखमहाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची लोंबती लक्तरे!

महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाची लोंबती लक्तरे!

‘करोना’च्या सावटात मराठी मुलखात दिवाळीचा सण जमेल तेवढ्या धूमधडाक्यात साजरा झाला. तथापि या मंगलपर्वाच्या आनंदाला गालबोट लावणारी आणि माणुसकीचा गळा घोटणारी लाजीरवाणी घटना परवा मध्यरात्री बीड जिल्ह्यात घडली आहे.

एका तरुणासोबत पुण्यात ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहणार्‍या तरुणीला त्या नराधमाने अ‍ॅसिड आणि पेट्रोल ओतून जिवंत जाळले. दोघे जण दिवाळीसाठी नांदेड जिल्ह्यातील शेळगाव या त्यांच्या गावी दुचाकीवरून परतताना त्याच्यातील सैतान जागा झाला. त्याने दुचाकी येळंबघाटच्या दगडखाणीकडे वळवली. तेथे त्याने हे दुष्कृत्य केले. हमरस्त्यापासून खाण काही अंतरावर असल्याने जळालेल्या अवस्थेत ही तरुणी सुमारे बारा तास त्या ठिकाणी मदतीच्या प्रतीक्षेत होती. दुपारी रस्त्याने जाणार्‍यांना तिच्या विव्हळण्याचा आवाज कानी आला. त्यांनी पोलिसांना कळवले. मात्र रुग्णालयात मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली. तरुणीला जाळून पसार झालेला आरोपी अविनाश राजुरे याचा शोध पोलिसांना नांदेडमध्ये लागला. तेथे त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. ज्याच्यावर विश्वास टाकून पीडित तरुणी त्याच्यासोबत राहत होती तोच विश्वासघात करील, असे तिला स्वप्नातही वाटले नसेल.

- Advertisement -

आजकाल तरुण-तरुणी शिकून-सवरून ‘उच्च’शिक्षित होत आहेत. त्यांच्या जीवनपद्धतीच्या कल्पना बदलत आहेत. लग्नबंधनाशिवाय वैवाहिक जीवनाचे सुख मिळवण्याचा तो पर्याय तरुणाई निवडत असेल का? सामाजिक बंधने झुगारून एकत्र राहण्याच्या या नव्या पद्धतीमुळे समाजात नवे-नवे प्रश्न निर्माण होत आहेत. गावापासून दूर पुण्यात राहताना शेळगावातील त्या तरुण-तरुणीत नेमके कोणत्या कारणाने मतभेद झाले असतील? तरुणीला संपवण्याचे पाऊल त्या तरुणाने का उचलले असेल ते पोलीस तपासात उघड होईलच, पण नातलगांचा विरोध पत्करून मित्र वा प्रियकरावर विश्वास ठेवणार्‍या अशा कितीतरी तरुणींचा विश्वास ‘अंधविश्वास’ ठरत असेल. पद्धत नवी असो की जुनी; समाजात बदल होतच राहणार. त्या बदलातून निर्माण होणार्‍या नव्या समस्या अशा भयावह घटनांतून उघडकीस येत आहेत. याच वर्षी फेब्रुवारीत वर्ध्यातील हिंगणघाट येथे एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून एका प्राध्यापिकेला भर चौकात जिवंत जाळले होते. त्याआधी गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये मदत मागणार्‍या डॉक्टर तरुणीची अब्रू लुटून तिला जाळल्याची घटना हैदराबादेसारख्या शहरातही घडली होती. दिल्लीतील ‘निर्भया’ घटनेसारखीच सुन्न करणारी ती घटना होती.

या घटनेपासून बोध घेऊन आंध्र प्रदेश सरकारने बलात्कार्‍यांना एकवीस दिवसांत मृत्युदंडाच्या शिक्षेची तरतूद असलेला ‘दिशा कायदा’ संमत केला. महाराष्ट्रातही असा कायदा आणण्याची घोषणा राज्याच्या गृहमंत्र्यांनी केली होती, पण त्या घोषणेला मूर्त स्वरुप अद्याप का मिळाले नाही? तशा कायद्याअभावी बीडची घटना आता गाजत आहे. आणखी किती घटनांनंतर कडक तरतुदींचा कायदा शासन राज्यात अमलात आणणार आहे? दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश आदी राज्यांत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांचे प्रमाण अलीकडे झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्राच्या पुढारलेपणात याही बाबतीत उणेपणा राहू नये म्हणून मराठी तरुणाईत चढाओढ लागली असेल का? छत्रपती शिवरायांसोबत अनेक महापुरुष आणि संतांची भूमी म्हणून अभिमान बाळगणार्‍या मराठी मुलखाची प्रतिमा व प्रतिष्ठा किती अधोगतीला जाईपर्यंत शासन-प्रशासन निष्क्रिय राहणार? केवळ कायद्याने सर्वच प्रश्न सुटत नाहीत हे खरे, पण गुन्हेगारांवर काही प्रमाणात वचक बसण्यासाठी तरी कायदे हवेच! महाविकास आघाडी सरकारचा ‘दिशा कायदा’ येत्या विधिमंडळ अधिवेशनात अस्तित्वात येईल अशी आशा मराठी जनतेने करावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या