Saturday, November 23, 2024
Homeनगर20 परवाने कायमस्वरूपी तर 22 तात्पुरते निलंबित

20 परवाने कायमस्वरूपी तर 22 तात्पुरते निलंबित

कृषी विभागाची जिल्ह्यात कारवाई

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

खरीप हंगाम सुरू झालेला असून बाजारामध्ये शेतकर्‍यांची बी-बियाणे, खते व इतर कृषी निविष्ठा खरेदीसाठी लगबग सुरू झालेली आहे. खरीप हंगाम 2024-25 साठी शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत आणि वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याच्यादृष्टीने कृषी विभागाने नियोजन केलेले आहे. दरम्यान खते, बियाणे काळा बाजार, खरेदी विक्रीचे दप्तर न ठेवणे, बियाणांच्या गुणवत्ता यासह अन्य तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या तपासणीअंती जिल्ह्यातील 20 कृषी निविष्ठा विक्रीचे परवाने कायमस्वरूपी, तर 22 परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

नगर जिल्ह्यात कृषी विभागाने जिल्हास्तरावर आणि तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना केलेली आहे. तसेच प्रत्येक तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत आहे. शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये, यासाठी जिल्ह्यातून बियाण्यांचे 355, खतांचे 350 आणि कीटक नाशकांचे 78 नमुने काढून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. तसेच जिल्हास्तरावर 1 व प्रत्येक तालुका स्तरावर 1 अशी 15 भरारी पथके जिल्ह्यामध्ये कार्यरत करण्यात आलेली असून भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्याची अचानक तपासणी केली जात आहे. शेतकर्‍यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक करणार्‍या विक्री केंद्रावर तातडीने कारवाई केली जाणार आहे.

निरीक्षकांनी केलेल्या तपासणीमध्ये दोषी आढळून आलेल्या आतापर्यंत 16 बियाणे विक्री केंद्राचे, 4 खते विक्री केंद्राचे आणि 2 कीटकनाशक विक्री केंद्राचे परवाने तत्पूर्ते निलंबीत तर 8 बियाणे, 9 खते आणि 3 कीटकनाशक परवाने कायम स्वरूपी रद्द करण्यात आलेली आहेत. 15 पेक्षा जास्त केंद्रांना नोटीस बजावण्यात आलेले आहे. निविष्ठा उत्पादकांनी किंवा जिल्ह्यामधील निविष्ठा विक्री केंद्र चालकांनी कोणत्याही प्रकारे कायद्याचे उल्लंघन करु नये अन्यथा त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषी सुधाकर बोराळे कृषी दिला आहे. खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी दुकानातून कृषी निविष्ठा खरेदी करताना पक्की बिले ताब्यात घ्यावीत, तसेच बियाणे पिशवी व टॅग जपून ठेवावा. तसेच निविष्ठाच्या गुणवत्ताबाबत तक्रार असेल तर तात्काळ टोल फ्री क्रमांक 11002334000 किंबा 9822446655 या क्रमांकाव कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

या तालुक्यात कारवाई
यंदा नगर दक्षिणेत चांगला पाऊस झालेला असून यामुळे याठिकाणी हंगाम जोरात आहे. 10 जुलैपर्यंत जिल्ह्यात 97 टक्क्यांपर्यंत खरीप हंगामाची पेरणी पोहचलेली आहे. बियाणे, खते, बिल, गणवत्ता याबाबत तक्रारी आल्यानंतर कृषी विभागाने केलेल्या तपासणीत नेवासा, पाथर्डी, श्रीगोंदा, नगर आणि कर्जत तालुक्यात कृषी निविष्ठा विक्री केंद्रावर कारवाई केलेली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या