बारामती | Baramati
आज (गुरुवार) बारामतीत (Baramati) कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक स्तरावरील प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शनाचे (Agricultural Exhibition) आयोजन करण्यात आले होते. या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन शरद पवार, प्रतापराव पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्या उपस्थितीत पार पडले. या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमात बोलतांना मंत्री कोकाटे यांनी अजित पवारांचे (Ajit Pawar) तोंडभरून कौतुक केले. तसेच मंत्रिपदाची अपेक्षा नसताना अजितदादांनी आपल्याला कृषी मंत्री केल्याचे म्हणत त्यांनी दादांना जे कळतं ते कुणालाच कळत नाही, असे विधान केले. त्यामुळे कोकाटे यांचा अप्रत्यक्षरित्या रोख शरद पवारांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “सकाळी लवकर उठून कामाला लागण्याची माझी ही पहिलीच वेळ आहे. दादांना माहिती आहे मी उशिरा उठतो. दादांनी (अजित पवार) रात्रीच सांगितले होतं,उद्याच्या दिवस तसदी घ्यावी लागेल. तेव्हा मी त्यांना म्हटले जव्हा गरज असते तेव्हा खांद्याला खांदा लावून मी कुठेही उपस्थित असतो. नसेल तर पहाटेचा शपथविधी आठवा मीच त्यावेळी पाठीमागे उभा होतो”, असे म्हणत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे (Minister Manikrao Kokate) यांनी सभागृहाला खळखळून हसवले. त्यांच्या या विधानानंतर सभागृहात एकच हशा पिकला.
तसेच “बारामतीचे रस्ते, प्लॅनिंग बघून जणू सिंगापूरमध्ये आल्यासारखे वाटले. इतकं सुंदर शहर दादांनी नटवले आहे. त्यांचे अवलोकन करण्याचा प्रयत्न राजकारणात (Politics) आमच्यासारख्या लोकांनी केला पाहिजे. आपला स्वार्थ जनतेच्या हितामध्ये आहे. जनतेला सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यासाठीच आपण राजकारण करतो. तीच भूमिका घेऊन जाणे आमच्या सर्वांची इच्छा आहे”, असे मंत्री कोकाटे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की,”राजेंद्र पवार (Rajendra Pawar) यांना २०२१ मध्ये राज्य सरकारचा कृषीरत्न पुरस्कार जाहीर झाला होता. पण त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, कृषी खात्याच्या वतीने तो पुरस्कार अजूनही प्रलंबित आहे. मी त्यांना जाहीर निमंत्रण देतो, सोयीची वेळ कळवा, आम्ही पुरस्कार देऊ इच्छितो. या पुरस्कारासाठी तुम्ही योग्य आहात. योग्य व्यक्तीला हा पुरस्कार मिळत आहे. राज्य सरकार तुमचा गौरव करू इच्छित आहे,” असेही मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटले.