अहिल्यानगर (प्रतिनिधी)
कांदा पिकाची लागवड केली नसतांनाही शेतकर्यांकडून पीक विम्याची रक्कम लाटण्यासाठी जास्त क्षेत्र दाखवून लागवड केल्याचा प्रकार कृषी विभागाने केलेल्या प्रत्यक्ष तपासणीतून उघडकीस आला आहे.
जिल्ह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव व पाथर्डी या सात तालुक्यातील सात हजार 241 शेतकर्यांनी तब्बल 2055.98 हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड नसतांनाही विमा उतरविल्याचे समोर आले आहे. कृषी विभागाच्या तपासणीमुळे तब्बल 1 कोटी 27 लाख रूपयांची बचत झाली आहे.
सरकारच्यावतीने दोन वर्षापासून एक रूपयात पिक विमा योजना राबवण्यात येत आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत गेल्या दोन वर्षांपासून शेतकर्यांना केवळ एक रूपयात या योजनेत सहभागी होता येते. शेतकर्यांच्या विमा हप्त्याची रक्कम राज्य सरकार भरते, त्यासोबत विमा उतरवितांना शेतकरी स्वतःच पिकाची नोंद करतो व यावेळी विमा उतरविलेल्या पिकाची कोणतीही पडताळणी होत नाही. नैसर्गिक आपत्तीत पिकांचे नुकसान झाल्यास विमा उतरवलेल्या क्षेत्रानुसार शेतकर्याला नुकसान भरपाई मिळते. याचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचे समोर येत आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सन 2024 अंतर्गत महाराष्ट्रात पेरणी अहवालातील क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रावर विमा काढल्याचे स्पष्ट झाल्याने कृषी आयुक्तालयाने 25 ऑगस्ट 2024 रोजी विमाधारक शेतकर्यांच्या कांदा पिकाची प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करण्याविषयी सुचित केले होते. त्याअनुषंगाने अहिल्यानगर जिल्ह्यात पेरणी अहवालातील क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढलेल्या सात तालुक्यात कांदा पिकाची प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली. .
या तपासणीत कांदा पिकाची लागवड केलेली नसताना तपासणी झालेल्या संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, श्रीगोंदा, कोपरगाव व पाथर्डी असे एकूण 2055.98 हेक्टर क्षेत्रावर पीक नसतानाही पेरणी क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्राचा विमा उतरविल्याचे स्पष्ट झाले आहे. या सातही तालुक्यातील अहवाल प्राप्त झाले असून, दरम्यान बनावट अर्ज रद्द करण्याच्या सुचना देण्यात आल्यामुळे पीक विमा हप्त्यापोटी शासनाची सुमारे 1 कोटी 27 हजार रूपयांच्या विमा रकमेची बचत होणार झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली.
कांदा पीक नसताना विमा उतरविलेल्या अर्जदारांची तालुकानिहाय संख्या कंसात हेक्टरी क्षेत्र पुढीलप्रमाणे : संगमनेर 36 (9.76), श्रीरामपूर 132 (81.7), राहुरी 562 (217.49), नेवासा 1 हजार 409 (601.48), श्रीगोंदा 1 हजार 361 (268.68), कोपरगाव 276 (130.57), पाथर्डी 3 हजार 465 (746.93) असे एकूण 7 हजार 241 शेतकरी संख्या असून क्षेत्र 2055.98 हेक्टर आहे.