Friday, November 13, 2026
HomeनगरAhilyanagar : संगमनेर, कोपरगाव, नगर आणि श्रीगोंद्याच्या हाती सत्तेची गणित!

Ahilyanagar : संगमनेर, कोपरगाव, नगर आणि श्रीगोंद्याच्या हाती सत्तेची गणित!

14 तालुक्यांतील 3 हजार 837 मतदार ठरविणार संचालक मंडळाचे भवितव्य

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडीसाठी नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच तालुकानिहाय सभासद मतदारसंख्येचे गणितही महत्त्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यातील 14 तालुक्यांमध्ये 3 हजार 837 सभासद मतदार असून, संगमनेर तालुक्यात सर्वाधिक 715 मतदार आहेत. त्याखालोखाल कोपरगावमध्ये 529, नगरमध्ये 391 आणि श्रीगोंद्यात 299 मतदार आहेत. त्यामुळे निवडणुकीतील राजकीय चर्चांमध्ये या तालुक्यांतील मतदारसंख्येचा संदर्भ महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, केवळ मतदारसंख्या नव्हे, तर स्थानिक सहकारी संस्थांवरील प्रभाव, उमेदवारांची ताकद आणि नेत्यांची जुळवाजुळव यांवरही निकालाचे गणित अवलंबून असेल.

- Advertisement -

दरम्यान, प्रत्येक तालुकानिहाय सोसायटी मतदारसंघात वेगवेगळे उमेदवार असले तरी सात जनरलच्या जागांपैकी 6 जागांवर निवडणूक होत असून या ठिकाणी संपूर्ण जिल्हाभरातून मतदान होणार आहे. यासाठी जादा सभासद असणार्‍या मतदारसंघातून लीड घेणार्‍या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सहकार क्षेत्रातील संस्थांचे प्रतिनिधी मतदान करतात. त्यामुळे विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीप्रमाणे केवळ लोकसंख्या अथवा मतदारसंख्या निर्णायक ठरत नाही. संबंधित मतदारसंघातील संस्थांची संख्या, त्यांचे राजकीय संबंध आणि उमेदवारांमधील स्थानिक समीकरणे यांनाही महत्त्व असते. अशा परिस्थितीत तालुकानिहाय मतदारसंख्येची आकडेवारी निवडणुकीतील राजकीय हालचाली समजून घेण्यासाठी महत्त्वाची ठरते.

बँकेसाठी जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात 715 मतदार असून, जिल्ह्यातील एकूण मतदारांच्या तुलनेत त्यांचे प्रमाण सुमारे 18.6 टक्के आहे. त्यामुळे तालुक्यातील सहकारी संस्थांची भूमिका आणि तेथील निवडणूक समीकरणांकडे लक्ष राहणार आहे. मात्र, या मतदारांचे मतदान कोणत्या उमेदवाराच्या बाजूने होते, यावरच प्रत्यक्ष राजकीय परिणाम अवलंबून असेल. कोपरगाव तालुक्यात 529 मतदार असून, ही संख्या जिल्ह्याच्या एकूण मतदारांच्या सुमारे 13.8 टक्के आहे. अहिल्यानगर तालुक्यात 391, श्रीगोंद्यात 299, राहात्यात 263 आणि राहुरीत 258 मतदार आहेत. या तालुक्यांतील मतदारसंख्येमुळे स्थानिक पातळीवरील राजकीय जुळवाजुळव आणि सहकारी संस्थांमधील संपर्क यांना महत्त्व प्राप्त होऊ शकते.

नेवासा, पारनेर, अकोलेचेही गणित महत्त्वाचे
नेवासा तालुक्यात 246, अकोलेत 231 आणि पारनेरमध्ये 227 मतदार आहेत. कर्जतमध्ये 168, श्रीरामपूरमध्ये 147, पाथर्डीत 131, शेवगावमध्ये 117 आणि जामखेडमध्ये 115 सभासद मतदार आहेत. मतदारसंख्या तुलनेने कमी असलेल्या तालुक्यांमध्येही संबंधित जागेवरील उमेदवार, सहकारी संस्थांमधील स्थानिक संबंध आणि मतांची संभाव्य विभागणी यांमुळे निवडणुकीचे गणित बदलू शकते. त्यामुळे मोठ्या तालुक्यांतील मतदारसंख्येकडे लक्ष देतानाच लहान तालुक्यांतील संस्थात्मक समीकरणांकडे दुर्लक्ष करता येणार नाही.

ताज्या बातम्या

केंद्रीय गृह मंत्री अमित शहा दोन दिवस पुणे दौऱ्यावर

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai केंद्रीय गृह मंत्री अमित शहा येत्या १५ आणि १६ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात दिवंगत उपमुख्यमंत्री...