अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मागे घेण्यासाठी आज बुधवार (दि.21) रोजी शेवटची मुदत आहे. तत्पूर्वी मंगळवारी दसर्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येत जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांना यश येताना दिसत असले, तरी इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने या सर्वांशी अंतिम चर्चा करून बिनविरोधसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील नेत्यांनी एकी केली असली तरी निवडणुकीतील इच्छुक काय भूमिका घेणार हे आज दुपारी तीननंतर स्पष्ट होणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी नगरच्या शासकीय विश्रामगृहावर मंगळवारी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत दुपारी तीन ते सायंकाळी सहा या तीन तासांच्या कालावधीत झालेल्या बैठकीत वेगवान घडामोडी घडत जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, लोकप्रतिनिधी, आमदार एकत्र येत दुष्काळी परिस्थितीमुळे बँकेची निवडणूक बिनविरोध करणे हिताचे असल्याचे सांगत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पुन्हा केली.
यावेळी खा. नीलेश लंके, माजीमंत्री शंकरराव गडाख, आमदार आशुतोष काळे, आमदार मोनिका राजळे, आमदार किरण लहामटे, आमदार विक्रम पाचपुते, आमदार हेमंत ओगले, आमदार विवेक कोल्हे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, आमदार काशिनाथ दाते, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, माजी आमदार वैभव पिचड, बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम गायकर, माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले, माजी संचालक भानुदास मुरकुटे, करण ससाणे, राजेंद्र नागवडे, अंबादास पिसाळ, प्रताप ढाकणे, सुजित झावरे, अमित भांगरे यांच्यासह बँकेसाठी इच्छुक असणारे तालुका पातळीवरील नेते उपस्थित होते. यावेळी सुरूवातील जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते समोरासमोर एकत्र बसत जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी चर्चा झाली. या चर्चेच्यावेळी काही नेत्यांनी तालुकानिहाय इच्छुकांचे म्हणणे एकून घेण्याची विनंती करण्यात आली. ही विनंती विखे, थोरात आणि शिंदे यांनी मान्य करत तालुकानिहाय सर्वांची मते जाणून घेतली.
शिंदे, विखे, थोरात आणि गडाखांशी बंद खोलीत चर्चा
जिल्हा बँक बिनविरोधी करण्याबाबत एकत्रित चर्चा झाल्यानंतर पुन्हा दुपारी साडेचारनंतर सभापती राम शिंदे, पालकमंत्री विखे पाटील, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्यासोबत तालुकानिहाय नेते आणि इच्छुकांनी संवाद साधत आपल्या गटाला किंवा नेत्याला उमेदवारी का आवश्यक आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी पवारांच्या आदेशानंतरही खो
जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 15 संचालकांपैकी सहा संचालक फुटले होते. त्यावेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत चंद्रशेखर घुले यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 15 संचालकांपैकी केवळ 9 मते मिळाली होती. त्यावेळी अजित पवार यांचा आदेश डावलणारे नेते आता जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी नेत्यांचे शब्द पाळणार का? हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी माघारीसाठी आज शेवटची मुदत असून या निवडणुकीबाबत चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांच्या वतीने आज बुधवारी नगरमध्ये सकाळी बैठक बोलवण्यात आली आहे. ही बैठक नगरमधील प्रताप ढाकणे यांच्या निवासस्थानी होणार आहे. या बैठकीला लंके, ढाकणे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, अमित भांगरे यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार हजर राहणार असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक तिढा स्थानिक नेते सोडवणार
बिनविरोधची घोषणा विखे पाटील करतील – सभापती शिंदे
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीसाठी अवघा एक दिवस असतांना दसर्याच्या मुहूर्तावर नगरच्या शासकीय विश्रामगृहावर झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे ‘सिमोल्लंघन’ झाले. सोसायटी मतदारसंघातील ज्या काही चार ते पाच जागांचा तिढा आहे. तो स्थानिक पातळीवर नेत्यांनी आपापसात चर्चा करून सोडवून एक उमेदवार देण्यासह राखीव सात जागांबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात एकत्रित उमेदवार देण्याचा निर्णय मंगळवारी झाला. त्यामुळे उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्हा बँकेच्या किती जागा बिनविरोध होणार याबाबत उत्सुकता आहे.
दरम्यान, ज्या काही जागांबाबत तिढा आहे. त्यावर चर्चा करून आज बुधवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दुपारी 12 वाजता बँकेच्या नवनिर्वाचित 21 संचालकांची नावे जाहीर करतील. त्यानंतर ज्यांची नावे या यादीत नाही त्यांनी तातडीने आपली उमेदवारी दुपारी 3 वाजेपर्यंत मागे द्यावी, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्यादृष्टीने मंत्री विखे व थोरात यांच्यात सहमती एक्सप्रेस झाली होती. मात्र, सभापती शिंदे व खा. नीलेश लंके यांनी निवडणुकीचा आग्रह धरला होता. त्यादृष्टीने मंडळ स्थापन करण्याची तयारी देखील झाली होती. मात्र, ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीकवर निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार मंत्री विखे व थोरात यांनी पुढाकार घेत निवडणूक बिनविरोधच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. बँकेच्या निवडणुकीसाठी तब्बल 240 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यात नेवासा व संगमनेर अर्ज छाननीत बिनविरोध झाले होते. उर्वरित 19 जागांसाठी 239 उमेदवार राहिले. त्यातही सोमवारपर्यंत अवघ्या 22 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 217 उमेदवार रिंगणात राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध कशी होणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर मंत्री विखे व थोरात यांनी मंगळवारी दुपारी सर्वपक्षीय नेत्यांनी बैठक येथील शासकीय विश्रामगृह येथे बोलविली. या बैठकीला जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते हजर होते.
या बैठकीनंतर सभापती शिंदे, मंत्री विखे व थोरात यांनी तालुकानिहाय नेते व इच्छुकांबरोबर चर्चा केली. त्यावेळी सोसायटी मतदारसंघ किंवा राखीव सात जागा यापैकी एक जागेवर संधी देण्यात येईल. त्या दृष्टीने तालुकास्तरीय नेते व इच्छुकांनी चर्चा करून सांगा. यावेळी काही तालुक्याच्या नेत्यांनी उमेदवार निश्चितीचे अधिकार मंत्री विखे व थोरात यांना दिले. एकंदरीत बँकेच्या निवडणुकीसाठी नेते एकत्र आले असल्याचे चित्र दिसले मात्र बिनविरोधचा तिढा स्थानिक पातळीवर सोडवावा लागणार असल्याचे दिसले.
मतभेद दूर झाले- शिंदे
बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याबाबत सर्वच सकारात्मक आहेत. सुरवातीला समन्वय नसल्याने व मतभेद असल्याने काही अडचणी उभ्या राहिल्या होत्या. मात्र आता मतभेद दूर झाल्याने बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे मत सभापती राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरले. त्यानंतर तालुकानिहाय नेत्यांची मते ऐकून घेण्यात आली आहे. काही जागांचा तिढा आहे. परंतू तो रात्री उशीरापर्यंत सोडविण्यात येणार आहे.
पहिल्यांदा सर्वपक्षीय नेत्यांची व्यापक बैठक
राजकीय व्यासपीठावर एकमेकांच्या विरोधात असलेले नेते आज जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदा एकत्र आल्याचे दिसून आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीकवर निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सर्व नेत्यांनी सकात्मक प्रतिसाद दिला. आजवर बँकेच्या निवडणुकीत नेते एकत्रित उमेदवार निश्चित करीत होते. मात्र, यावेळी निवडणुकीत आव्हान उभे राहिल्याने सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित आणण्याशिवाय पर्याय राहिला नाही. म्हणून पहिल्यांदा राजकीय व्यासपीठावर विरोधक असलेले बँकेच्या निवडणुकीनिमित्त एकत्र आल्याचे चित्र होते.




