Monday, July 27, 2026
Homeमुख्य बातम्याAhilyanagar : जिल्हा बँकेच्या शेतकर्‍यांना 1100 कोटींची कर्जमाफी

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या शेतकर्‍यांना 1100 कोटींची कर्जमाफी

पहिल्या यादीत 1 लाख 32 हजार नावे || राष्ट्रीयकृत बँकेच्या 16 हजार 222 शेतकर्‍यांना लाभ, दोन दिवसात 22 हजार शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शुक्रवारी जाहीर केलेल्या तिसर्‍या यादीत अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1 लाख 16 हजार शेतकर्‍यांची पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध झाली. या यादीत दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या शेतकर्‍यांसाठी तब्बल 1 हजार 98 कोटी रुपयांची कर्जमाफी प्रस्तावित करण्यात आली असून, ही यादी अंतिम पडताळणीसाठी अधिकृत पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, नगर जिल्ह्यातून जिल्हा बँकसह राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्जदार शेतकर्‍यांची 2 लाख 33 हजार 711 नावे असलेली यादी कर्जमाफीच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. यातील पहिल्या टप्प्यात 1 लाख 32 हजार 734 शेतकरी दोन लाखांपर्यतच्या कर्जमाफीला पात्र झालेली आहेत. शुक्रवारी रात्री सहकार विभाग पातळीवर नगर जिल्ह्यातील कर्जमाफीत पात्र असणार्‍यांची यादी सहकार विभागाला प्राप्त झाली होती. ही यादी शुक्रवारी रात्री ते शनिवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 378 गावांतील सेवा सोसायट्या, जिल्हा बँकेच्या शाखेसह संंबंधीत गावच्या ग्रामपंचायत आणि आपलं सरकार केंद्र पातळीवर पाठवण्यात आल्या.

कर्जमाफीची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शनिवारी जिल्हाभर शेतकर्‍यांची यादी पाहण्यासाठी फारशी गर्दी नव्हती. कर्जमाफीत ज्यांची नावे आलेली आहेत, अशा शेतकर्‍यांना अ‍ॅग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करण सक्तीचे करण्यात आले होते. यासाठी शेतकर्‍यांना आपलं सरकार केंद्रावर जावे लागले. शनिवार आणि रविवारी पहिल्या दोन दिवसात कर्जमाफीत नावे आलेल्या 1 लाख 32 हजारांपैकी 22 हजार 153 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरण झाले होते. यावेळी तांत्रिक अडचण येत असल्याने आपलं सरकार केंद्र चालक व शेतकर्‍यांचा घाम निघतांना दिसला. पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेच्या 1 लाख 16 हजार शेतकर्‍यांना 1 हजार 100 कोटींची कर्जमाफी मिळालेली आहे.

जिल्हा बँकेचे अद्याप 70 ते 80 हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित असून यातून पात्र असणार्‍यांची नावे पुढील यादी येणार असल्याचे सांगण्यात आले. तर राष्ट्रीयकृत बँकेच्या 16 हजार 222 शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळालेली असून त्यांच्या थकबाकीची रक्कम अद्याप मिळाली नसल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी दिली. श्रीगोंदा तालुक्यातील सर्वाधिक 21 हजार शेतकर्‍यांना तर सर्वात कमी कोपरगाव तालुक्यातील 515 जिल्हा बँकेतील शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे.

रविवारी आधार प्रमाणिकरण ठप्प
दरम्यान, कर्जमाफीच्या यादीत नावे असणार्‍या शेतकर्‍यांना ग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण करणे ही प्रक्रिया किचकट ठरतांना दिसत आहे. अनेक तासंतास उभे राहुन देखील शेतकर्‍यांचे आधार प्रामाणीकरण होत नसल्याने शेतकरी वैतागले आहेत. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. रविवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी आपलं सरकार पोर्टलवर कर्जमाफीसाठी आधार प्रामाणिक करण करण्याची प्रक्रिया ठप्प असल्याचे सांगण्यात आले. याबाबत सहकार विभागाने सरकारच्या महाआयटी विभागाला कळवले आहे.

जिल्हा बँकेचे पात्र शेतकरी
अकोले 6 हजार 190, जामखेड 6 हजार 842, कर्जत 6 हजार 556, कोपरगाव 2 हजार 515, नगर 6 हजार 598, नेवासा 16 हजार 360, पारनेर 5 हजार 741, पाथर्डी 5 हजार 698, राहाता 3 हजार 928, राहुरी 10 हजार 900, संगमेनर 7 हजार 168, शेवगाव 10 हजार 867, श्रीगोंदा 21 हजार 57, श्रीरामपूर 6 हजार 92 असे 1 लाख 16 हजार शेतकर्‍यांना 1 हजार 100 कोटींची कर्जमाफी मिळालेली आहे.

कर्जमाफीचे मुद्दे
2 लाख 33 हजार 711 खाते पोर्टलवर अपलोड
पहिल्या यादीत 1 लाख 32 हजार शेतकरी पात्र
22 हजार 153 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणिकरण
1 लाख 10 हजार शेतकर्‍यांचे इ-केवायसी पेडींग
जिल्हा बँकेचे पात्र शेतकरी 1 लाख 16 हजार
राष्ट्रीयकृत बँकेचे पात्र शेतकरी 16 हजार 222 पात्र शेतकरी

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतूनही विसर्ग वाढविला; लाभक्षेत्रात समाधान

0
अकोले | Akole उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल...