Wednesday, January 7, 2026
HomeनगरAhilyanagar : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Ahilyanagar : जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

पाथर्डी तालुक्यात ढगफुटी || नगर, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात अतिवृष्टी || श्रीरामपूर, राहुरीत मुसळधार

  • तीन व्यक्तींसह जनावरे वाहून गेली; आढे-नाले, नद्यांना महापूरसदृश स्थिती
  • अनेक ठिकाणी नदीपात्रा लगतच्या घरांना पुराचा विळखा, 165 व्यक्तींची बचाव पथकांमार्फत सुटका
  • आणखी दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगर दक्षिणेतील पाथर्डी तालुक्यातील काही गावात ढगफुटीसदृश तर नगर, पारनेर, शेवगाव, श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेती पिकांसह नागरिकांच्या घरांचे, संसार उपयोगी साहित्य, पशूधनाची मोठी हानी झाली आहे. नगर तालुक्यातील एक व्यक्ती तर पाथर्डी तालुक्यातील दोन गावातील दोघेजण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. तर शेवगाव, कर्जत आणि पाथर्डी तालुक्यातील 165 व्यक्तींची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.

- Advertisement -

दरम्यान, जिल्ह्यात आणखी दोन पावसाचा यलो अर्लट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाच्यावतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, काल सोमवारी रात्री श्रीरामपूर शहर व तालुक्यात सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला. राहुरीतही हीच स्थिती होती. राहाता, कोपरगाव तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली.
नगर दक्षिणेतील प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनूसार सोमवारी (दि. 15) पाथर्डी तालुक्यातील करंजी, तिसगावसह अन्य गावात या पट्ट्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला. तर शेवगाव, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यात मुसळधार पाऊस बरसला. पाथर्डीच्या टाकळीमानूर आणि माणिकदौंडी परिसरातील लांडकवाडी येथील दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. करंजी, जवखेडे, हनुमानटाकळी येथील 127 नागरिकांना एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या जवानांनी पुरातून बाहेर काढले.

YouTube video player

याशिवाय कासार पिंपळगाव, मढी, शिरापूर, निवडुंगे, शिरसाटवाडी, माणिकदौंडी, मानेवाडी, मोहटे, कारेगाव, वाळुंज यांसह नदीकाठच्या गावांतील नागरिकांना स्थानिक तरुणांनी जेसीबी, मानवी साखळी व दोरीच्या साहाय्याने जीव धोक्यात घालून वाचवले. परिस्थितीची माहिती मिळताच पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. मोनिका राजळे, आ. शिवाजी कर्डिले व आ. शिवाजीराव गर्जे यांनी तातडीने मदत कार्य गतीने करण्याच्या सूचना दिल्या. खा. निलेश लंके यांनीही पूर परिस्थितीबाबत प्रशासनाला सूचना केल्या. या बिकट परिस्थितीत विविध गावात सरपंच, ग्रामसेवक व स्थानिक कार्यकर्त्यांनी तर जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचवले. गेल्या 50 वर्षांत एवढा पाऊस कधी पाहिला नाही, असे अनेक नागरिकांनी सांगितले. पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार उद्धव नाईक, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, लोका कृषी अधिकारी महादेव लोंढे यांच्यासह विविध विभागाचे प्रतिनिधी यांच्याकडून मदत कार्य सुरू होते.

करंजी येथे रविवारी रात्री पडलेला मुसळधार पाऊस व सोमवारी झालेल्या ढगफुटीने शेतीपिकांसह परिसरातील दुकाने, घरांसह ट्रॅक्टर, गाय, म्हैस, शेळ्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. करंजी पाठोपाठ सातवड, घाटशिरस, तिसगाव, मांडवे येथेही नदीला मोठा पूर आल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेवगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकर्‍यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले. उभ्या पिकांतून पाणी वाहिले. नद्या-नाल्यांना आलेल्या पुरामुळे रस्ते पाण्याखाली गेले. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. तर काही घरांमध्ये व वस्त्यांमध्ये पाणी घुसल्याने अनेक गावांत जनजीवन विस्कळीत झाले.पारनेर तालुक्यात पावसाने साठवलेला कांदा, भाजीपाला आणि फुलपिकांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. तसेच अनेक ठिकाणीे रस्ते खराब झाले आहेत.

दरम्यान, पावसामुळे तालुक्यातील अनेक शाळांना सुट्टी देण्यात आली. कर्जत तालुक्यातील करपडी येथील सायकर वस्ती येथील नवनाथ सायकर व गोरख धोंडे यांच्यासह 15 ते 20 जण पुराच्या पाण्यामध्ये अडकले होते. प्रशासनाने सिद्धटेक येथील आपत्तीग्रस्त पथक आणून सर्वांना होडीद्वारे सुखरूप बाहेर काढले.तालुक्यातील चिलवडी, होलेवाडी, आंबीजळगाव, आळसुंदे, यासह अनेक गावांमध्ये जोरदार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. आपत्ती निवारणासाठी प्रशासन, पोलिस, महसूल यंत्रणा, एनडीआरएफ तसेच लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले.

मनुष्यहानीसह पशूधन दगावले, घरांची पडझड
जिल्ह्यात परतीच्या पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. यात पाथर्डी, पाथर्डी, नगर, पारनेर, कर्जत तालुक्यातील अनेक महसूल मंडलात अतिवृष्टी झाली. ओढे- नाले आणि नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नगर आणि पाथर्डी तालुक्यात तीन व्यक्तींसह 26 जनावरे दगावली असून 51 घरांची पडझड झाली आहे. वाळुंज (ता.नगर) येथील प्रथमेश बाळासाहेब साळवे (वय 22) हा तरूण सीनानदी वाहून गेला. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासह अग्निशामक दलाने या तरूणाची शोध मोहिम राबविली. अखेर त्याचा मृतदेह आढळून आला. यासह पाथर्डीच्या टाकळीमानूर येथील गणपत बर्डे आणि माणिकदौंडी परिसरातील लांडकवाडी येथील राजू बजरंग साळुंके हे दोघे पुराच्या पाण्यात वाहून गेले. पारनेर आणि संगमनेर तालुक्यात वीज पडून प्रत्येकी एक या प्रमाणे दोन गाई मरण पावल्या आहेत. पाथर्डी तालुक्यात 13 शेळ्या आणि 5 करडे तर शेवगाव तालुक्यात 4 शेळ्या आणि 2 बोकड पुराच्या पाण्यात वाहून गेले. पाथर्डी तालुक्यात 17, कर्जत 12, राहुरी 6, श्रीगोंदे आणि जामखेड प्रत्येकी दोन, नगर, पारनेर, संगमनेर प्रत्येकी एक घराचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे 51 घरांची पडझड झाली आहे. बचाव पथकाने शेवगाव तालुक्यातील वडूल येथील 12, कर्जतच्या करपडी येथून 8 व्यक्ती आणि पाथर्डीच्या करंजी, कसारपिंपळगाव, हनुमान टाकळीच्या निकाळजेवस्ती येथून 144 व्यक्तींची पुराच्या पाण्यातून सुटका केली.

रविवारी झालेला पाऊस
नालेगाव 34, वाळकी 36, रुईछत्तीसी 61, वाडेगव्हाण 71, निघोज 68, पळवे खु. 71, श्रीगोंदा 64, काष्टी 52, बेलवंडी 71, पेडगाव 79, चिंभळा 71, देवदैठण 76, कोळगाव 85, लोणीव्यंकनाथ 71, भानगाव 87, आढळगाव 87, राशीन 111, भांबोरा 68, कोंभळी 69, मिरजगाव 77, कुळधरण 34, खेड 68, आरणगाव 45, पाथर्डी 99, माणिकदौंडी 99, टाकळी 40, कोरडगाव 56, करंजी 34, तिसगाव 74, खरवंडी 40, अकोला 56, श्रीरामपूर 35, बेलापूर 59, टाकळीभान 61, कारेगाव 57, राहाता 30, लोणी 40, पुणतांबा 31 अस्तगाव 35 मिली मीटर पावसाची नोंद झालेली आहे.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...