अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाने कॉपीमुक्त अभियान सुरू केले आहे. 26 जानेवारीपर्यंत हे अभियान सप्ताह सुरू राहणार असून त्याचा श्रीगणेशा माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्याहस्ते झाला आहे. बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी व इयत्ता दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे. पुणे विभागीय शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियान सप्ताह सुरू केला आहे. त्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात 20 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत कॉपीमुक्त अभियान सप्ताह राबविले जाईल. शिक्षणाधिकारी कडूस यांनी आज रेसिडेन्शिअल माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये कॉपीमुक्त अभियानाबाबत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शपथ दिली.
कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताहाचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, शाळा विकास व व्यवस्थापन समिती सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक व माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्य, शिक्षकांना संयुक्त सभेमध्ये कॉपीमुक्त अभियानाची शाळा पातळीवर अंमलबजावणी करण्यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांनी माहिती देणे. कॉपीमुक्त अभियानाची शपथ सर्व शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये परिपाठाच्यावेळी घेणे. शाळास्तरावर मंडळ शिक्षासूचीचे वाचन करणे, मंडळाच्या उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठामागील बाजूस असलेल्या सूचना, व प्रवेश पत्रावरील (Hall Ticket) सूचनांचे वाचन करणे, गैरमार्ग केल्यास होणार्या परिणामांची जाणीव करून देणे.
परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी याबाबत तज्ञांमार्फत शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पालक व विद्यार्थ्यांना उद्बोधन करणे, अभ्यासाची तयारी, परीक्षा तणावमुक्त वातावरणात कशी देता येईल, उत्तरपत्रिका कशा प्रकारे लिहाव्यात याबाबत तज्ञांमार्फत मार्गदर्शन करणे, तसेच राज्य मंडळामार्फत तयार केलेली चित्रफित विद्यार्थ्यांना दाखविणे, कॉपीमुक्त अभियानाच्या जागृतीसाठी कॉपीमुक्ती घोषवाक्यासह शाळा परिसरात जानजागृती फेरी काढणे. ग्रामसभा बैठकीमध्ये मुख्याध्यापक, शिक्षक यांनी कॉपीमुक्त अभियानासंदर्भात माहिती देणे व याबाबत जनजागृती करणे व कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी ग्रामस्थांना आवाहन करणे आदी विषयांबाबत जागृती केली जाणार आहे.
तणावमुक्त वातावरणात आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्यासाठी कॉपीमुक्त अभियान जनजागृती सप्ताहाचा विद्यार्थ्यांना नक्कीच उपयोग होईल. सर्व घटकांच्या सहकार्याने हे अभियान यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.
– अशोक कडूस, शिक्षणाधिकारी, माध्यमिक.