मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
मालेगाव-कुसुंबा रोडवरील वडगाव बसथांब्याजवळ पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन भरधाव ट्रक समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. एका ट्रकमध्ये केमिकलचे ड्रम व कपडे तर दुसऱ्यात रासायनिक पावडर होती. धडकेनंतर दोन्ही ट्रकला आग लागली आणि केमिकल ड्रमचा स्फोट होऊन ज्वाळांनी रौद्ररूप धारण केले.
स्फोटामुळे जळते ड्रम रस्त्यालगतच्या घरांवर व दुकानांवर पडल्याने दोन घरे आणि तीन-चार दुकाने आगीत भस्मसात झाली. लाकडी फर्निचर, कपडे व अन्य साहित्य जळाले. या घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून दादाजी वाघ (५२) हेही भाजले गेले आहेत.
आगीची तीव्रता इतकी होती की नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढला. अग्निशमन दलाच्या पाच बंबांनी सुमारे तीन ते चार तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी जळालेले ट्रक हटवल्यानंतर मार्ग पुन्हा सुरू करण्यात आला.
अग्नितांडव नियंत्रणात आणण्यास मुख्य अग्निशमन दल अधिकारी संजय पवार यांच्यासह अमोल जाधव, रफिक खान, परिस लोंढे, मोहन बैरागी, याय्या खान, शुभम पाटील, सागर ह्याळीज, आरीफ बेग, भिमा सरदार, जयेश सोनवणे, शेख वासिफ, चंद्रकांत अहिरराव, संजय गायकवाड, शाहबाज बेग आदी जवानांनी यश मिळविले




