मुंबई | प्रतिनिधी Mumbai
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या दहावीनंतरच्या शिक्षणाला पाठबळ देण्यासाठी त्यांना मिळणाऱ्या अर्थसहाय्यात वाढ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तब्बल १२ वर्षानंतर दिव्यांग विद्यार्थ्याच्या अर्थसहाय्यात ५०० ते १२०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
उच्च माध्यमिक परिक्षोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना या सुधारित योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यापीठ, संस्था, शिक्षण मंडळाला भरावे लागणारे शुल्क, प्रवेश फी, ट्युशन फी, नोंदणी फी, खेळ, युनियन, लायब्ररी, मॅगझिन, वैद्यकीय तपासणी यासारखे इतर द्याव्या लागणाऱ्या अनिवार्य शुल्कासाठी रक्कम मंजूर करण्यात येणार आहे. याशिवाय शिक्षण शुल्काव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना वित्तीय सहाय्य निश्चित करण्यात आले आहे.
त्यानुसार गट १ अंतर्गत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी, पदव्युत्तर डिप्लोमासाठी निवासी विद्यार्थ्यास १२०० ऐवजी १७०० रुपये तर अनिवासी विद्यार्थ्याला ५५० ऐवजी ९०० रुपये वित्तीय सहाय्य मिळेल. गट २ अंतर्गत इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निवासी विद्यार्थ्यास ८२० ऐवजी १२०० रुपये तर अनिवासीसाठी ५३० ऐवजी ८५० रुपये देण्यात येतील. गट ३ अंतर्गत वरील दोन्ही गटात समाविष्ट नसलेल्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवासी विद्यार्थ्यास ८२० ऐवजी १२०० रुपये तर अनिवासीसाठी ५३० रुपयांच्या ऐवजी आता ८५० रुपये मिळतील. गट ४ अंतर्गत इयत्ता दहावीनंतरच्या पदवीतर डिप्लोमांसाठी निवासी विद्यार्थ्याला ५७० ऐवजी ११०० रुपये तर अनिवासीसाठी ३०० ऐवजी ८०० रुपये वित्तीय सहाय्य देण्यात येईल.
दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रकल्प, टंकलेखन, छपाई आणि पत्रव्यवहार, पुस्तकासाठी म्हणून आता १ हजार ८०० रुपये (प्रत्यक्ष खर्चाच्या मर्यादेत) तर अभ्यास दौऱ्यासाठी १५०० रुपये आणि शिक्षण शुल्काची प्रतिपूर्ती संपूर्ण रक्कम मिळणार आहे.





