अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात ‘ब’ वर्ग असलेल्या श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर या तीन नगरपरिषदांसह ‘क’ वर्गच्या जामखेड, राहाता, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, देवळाली प्रवरा, शिर्डी नगरपरिषदा तर एकच नेवासा नगरपंचायतची निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला असून आज शुक्रवारी अर्ज माघारीचा अखेरचा दिवस असल्याने अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्वसंध्येला आपल्याला अडथळे ठरू शकणार्या उमेदवारांना माघारीसाठी गळ घालण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांपासून नगरपरिषदांच्या निवडणूक रखडल्या आहेत. त्यात श्रीगोंदा, जामखेड व शेवगाव या नगरपरिषदांच्या तर नेवासा नगरपंचायतीची निवडणूक दोन वर्षापासून झाली नाही. आता या सर्वच नगरपरिषदा व नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्याने सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिर्डी नगरपरिषदेची पहिली निवडणूक होत आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुकीला विशेष महत्व आले आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपरिषद असलेल्या श्रीरामपूर नगरपालिकेत 34 जागांसाठी 17 प्रभागांतून मतदान होत आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रामुख्याने काँग्रेस आघाडीचे करण ससाणे, भाजपा-राष्ट्रवादी महायुतीचे श्रीनिवास बिहाणी व एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रकाश चित्ते यांच्यात प्रमुख तिरंगी लढत आहे.समाजवादी पक्षाचे जोएब जमादार उद्धव ठाकरे शिवसेनेचे अशोक थोरे देखील रिंगणात आहेत. कोण माघार घेतो यावर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
संगमनेरात विधान परिषदेचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे, दुसरीकडे महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा खताळ यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या धर्मपत्नी दुर्गा तांबे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे दुर्गा तांबे या लढतात की माघार घेतात याबाबत मोठी उत्सुकता आहे.
शिर्डी नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपाच्या जयश्री थोरात, काँग्रेसच्या माधुरी शेजवळ, उबाठा (ठाकरे) गटाकडून भाग्यश्री सावकारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय पाच महिलांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून चुरस अधिक रंगतदार केली आहे. त्यामुळे या अपक्षांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न सुरू होते. कुणाला यश येते हे आज समजणार आहे.
राहुरी नगराध्यक्ष पदासाठी सखाहरी शांताराम बर्डे, राहुल अशोक बर्डे, भाऊसाहेब छबुराव मोरे (जनसेवा मंडळ आघाडी), सुनील ठकाजी पवार (भाजपा), गुलाब मोहन बर्डे, बापुसाहेब भाऊसाहेब माळी(वंचित बहुजन आघाडी), ईश्वर नारायण मासरे (शिवसेना शिंदे गट), मृणाल भाऊसाहेब मोरे यांनी उमेद्वारी अर्ज दाखल केले. यात कोण माघार घेतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत.
राहाता नगराध्यक्ष पदासाठी महायुतीकडून डॉ. स्वाधिन गाडेकर, महाविकास आघाडीकडून धनंजय गाडेकर, ठाकरे गटाकडून राजेंद्र पठारे, राष्ट्रीय जनमंच पक्षाकडून बाळासाहेब गिधाड, आम आदमी पार्टीकडून रामनाथ सदाफळ, बहुजन समाजवादी पार्टीकडून अनिल पावटे तर अपक्ष म्हणून भानुदास गाडेकर व तुषार सदाफळ या 9 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
कोपरगाव नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून पराग संधान, राष्ट्रवादी अजित पवार गट ओमप्रकाश (काका) कोयटे, शिवसेना एकनाथ शिंदे गटातर्फे राजेंद्र झावरे, उद्धव सेनेकडून सपना भरत मोरे, तर अपक्ष म्हणून विजय वहाडणे, दीपक वाजे, सुहासिनी कोयटे, योगेश वाणी, रहिमुलीसा कुरेशी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी कोण लढतो आणि कोण माघार घेतो यावर येथील लढत होणार आहे.
नेवासा नगरपंचायत निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचे डॉ. करणसिंह घुले यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळाली आहे. गडाख यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून नंदकुमार पाटील, आम आदमी पार्टीकडून संजय सुखदान, तर काँग्रेसकडून अल्ताफ पठाण यांच्यासह नगराध्यक्षपदासाठी तब्बल 27 इच्छुकांचे अर्ज दाखल आहेत. त्यामुळे माघारीसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू होते.
देवळाली नगराध्यक्ष पदासाठी भाजपा कडून सत्यजित कदम, काँग्रेस कडून डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक कृष्णा मुसमाडे. (दोन अर्ज), बसपाकडून आश्विनी चंद्रकांत दोंदे, शिवसेना (शिंदे गट) कडून बाबासाहेब मुसमाडे तर वंचित बहुजन आघाडीकडून अॅड. प्रसाद सांगळे, संतोष एकनाथ चोळके (वंचित बहूजन आघाडी),जयेश साहेबराव माळी (अपक्ष) अनंत कृष्णराव कदम (शिंदे गट), शिवाजी बाबुराव मुसमाडे (अपक्ष), गणेश बाळासाहेब भांड (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने येथे कशी लढत होते याकडे राजकीय विश्लेषकांच्या नजरा आहेत.
श्रीगोंद्यात नगराध्यक्ष पदासाठी पाचपुते कुटुंबातील इंद्रायणी पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आली. सुनिता खेतमाळीस यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून ज्योती खेडकर तर शिवसेना शिंदे गटाकडून शुभांगी पोटे उमेदवार असणार आहेत. तर महाविकास आघाडीने गौरी भोस यांना उमेदवारी दिली आहे.
शेवगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी उच्चांकी अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्या लांडे, भाजपकडून रत्नमाला फलके, तर शिवसेना शिंदे गटाकडून माया मुंढे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून परविन काझी यांना पक्षाने एबी फॉर्म दिल्याने त्यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपाचे माजी प्रदेश चिटणीस अरूण मुंढे यांनी ऐनवेळी शिवसेना शिंदे गटाकडून त्यांच्या पत्नीचा अर्ज दाखल केला आहे.
पाथर्डीमध्ये अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट व अजित पवार गट या तिन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून अभय आव्हाड, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून बंडू पाटील बोरूडे, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून संजय भागवत यांनी अर्ज दाखल केला. तर शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाकडून सोमनाथ बोरूडे यांनी अर्ज दाखल केला आहे.




