Monday, November 9, 2026
HomeनगरAhilyanagar : निम्म्याहून अधिक जिल्हा टंंचाईच्या चपेटमध्ये

Ahilyanagar : निम्म्याहून अधिक जिल्हा टंंचाईच्या चपेटमध्ये

गत वर्षीच्या दुप्पट टंचाई कृती आराखडा, जानेवारीनंतर 649 तर एप्रिलनंतर 714 गावात तीव्र टंचाईच्या झळा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पावसाने पाठ दाखवल्याने नगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यात यंदा दुष्काळाची तीव्रता सर्वाधिक राहणार आहे. जिल्ह्यात यंदा निम्म्यापेक्षा अधिक गावात आतापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून तिची तीव्रता खर्‍या अर्थाने जानेवारी महिन्यानंतर वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर 2026 या काळात 201 तर जानेवारी ते मार्च 2027 या काळात 649 आणि एप्रिल ते जून या कालावधीत 774 गावात दुष्काळ अंतिम अवतारणार आहे. आतापासून नगर जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक भाग दुष्काळाच्या झळा सोसत असल्याचे चित्र आहे.

- Advertisement -

या दुष्काळावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद ग्रामीण पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यात सध्या पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्याची धावपळ सुरू आहे. यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात येत असून प्रत्येक गावात किमान पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पाणीटंचाई कृती आराखडा (संभाव्य) नुसार यंदा ऑक्टोंबर ते जून या काळात मोठी टंचाई परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याची तीव्रता जानेवारी ते जून 2027 या काळात सर्वाधिक अधिक राहणार आहे.

या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येत असून यात टंचाई असणार्‍या गावात बुडक्या खोदणे, विहीर खोलीकरण अथवा गाळ काढणे, खासगी विहिरी अधिगृहण करणे, टँकर भरण्यासाठी उद्भव निश्चित करणे, टँकर व बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करणे, प्रगतीपथावरील नळ योजना शीघ्रगतीने पूर्ण करणे, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, नवीन इंधनविहीरी व तात्पुरत्या पूरक आणि योजनांची तातडीने कामे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

असा आहे संभाव्य दुष्काळ
जिल्ह्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर 2026 या काळात 201 गावात पाणीटंचाई राहणार असून या ठिकाणी 232 उपाययोजना, जानेवारी ते मार्च 2027 या काळात 649 गावात दुष्काळ राहणार असून या ठिकाणी 763 आणि एप्रिल ते जून या कालावधीत 774 गावात दुष्काळ राहणार असून या ठिकाणी 806 उपाययोजना सुचवण्यात आलेल्या आहेत.

सर्वाधिक झळा एप्रिल ते जूनदरम्यान
जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल ते जून हा काळ सर्वात कठीण जाणार असून या कालावधीत पारनेर 90, श्रीगोंदा 82, कर्जत 68, जामखेड 44, पाथर्डी 98, शेवगाव 47, राहुरी 2, राहाता 9, श्रीरामपूर 12, नेवासा 53, कोपरगाव 7, संगमनेर 132, अकोले तालुक्यातील 25 गावांचा समावेश राहणार आहे.

यंदाचा आराखडा 70 ते 80 कोटींचा
जिल्ह्यात यंदाचा टंचाई कृती आराखडा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्प्ट अथवा तिप्पट होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी दमदार पावसानंतर जिल्ह्यात 29 कोटी 45 लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार करण्यात आला होता. तो यंदा दुप्पट झाल्यास यंदा 70 ते 80 कोटी रुपयांची तरतूद केवळ टंचाईकृती आरखड्यासह पाण्याच्या टँकरसाठी करावी लागणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : दुष्काळामुळे जिल्ह्यात गहू पेरणीला ब्रेक

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar यंदा पावसातील खंड आणि दुष्काळी परिस्थितीचा परिणाम रब्बी हंगामाच्या पेरणीवरही दिसू लागला आहे. जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरणीला अपेक्षित वेग मिळत नसून, 7...