अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हाभरात मंदिरांत चोरी करणार्या टोळीचा अखेर पर्दाफाश झाला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई करून 8 मंदिर चोरी प्रकरणे उघडकीस आणत राहाता तालुक्यातील तिघा चोरट्यांना अटक केली आहे. त्यांनी शिर्डी, राहुरी, लोणी, श्रीरामपूर तालुका, अहिल्यानगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली आहे.
दीपक रावसाहेब कचरे (वय 24, रा. लोहगाव, ता. राहाता), किरण बाळासाहेब राऊत (वय 20) व अजय उर्फ लाल्या वसंत बनसोडे (वय 18, दोघे रा. नेहरूनगर, लोहगाव, ता. राहाता) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून सुमारे 32 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मंदिर चोरीच्या गुन्ह्या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस माहिती घेत असताना, भुईकोट किल्ला मैदान भिंगार येथे संशयित येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार सापळा रचून संशयितांना पकडण्यात आले. चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कबाडी, अंमलदार लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, रिचर्ड गायकवाड, भिमराज खर्से, रमीजराज आतार, सुनील मालणकर यांच्या पथकाने केली. जप्त केलेला मुद्देमाल व ताब्यातील संशयित आरोपी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव येथील रामेश्वर मंदिराच्या सभामंडपातील दानपेटीमधील चोरलेली 71 हजार रूपयांची रोकड वाटून घेतल्याचेही त्यांनी सांगितले. पिंपळवाडी गावातील हनुमान मंदिर (शिर्डी), कोल्हार बु. येथील नेमबाई माता मंदिर (लोणी), निमगाव खैरी गावातील वाघाई देवी मंदिर (श्रीरामपूर तालुका), गुंडेगाव येथील रामेश्वर मंदिर, पाथरेगावाचे ग्रामदैवत महालक्ष्मी मंदिर (लोणी), घारगावातील येमाई माता मंदिर (घारगाव) आदी मंदिरातील चोरी प्रकरणे उघडकीस आले आहेत.




