अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात आणि ढोल-ताशांच्या दणदणाटात बुधवारी अहिल्यानगर शहरात गणरायाचे आगमन झाले. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांनी मोठ्या उत्साहात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला प्रारंभ झाला. शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना विधिवत पार पडली. या वेळी रूद्रवंश ढोल पथकाच्या गजराने परिसर उत्साहाने दुमदुमला. तर भिंगारमध्ये मानाच्या देशमुख वाडा गणपतीची प्रतिष्ठापना झाली.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी शहरात तसेच जिल्ह्यात मिरवणुकांची धूम होती. बहुतांश सार्वजनिक मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात, बँड वाजवून आणि डीजेच्या दणदणाटात श्रींचे आगमन घडवून आणले. अहिल्यानगर शहरात यंदा साडेतीनशेवर मंडळांची नोंदणी, तर संपूर्ण जिल्ह्यात दोन हजारावर गणेश मंडळांनी नोंदणी केली आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रतिष्ठापनेची लगबग जिल्ह्यात सुरू होती. दरम्यान पावसानेही उघडीप दिल्याने भक्तीमय वातावरणात उत्साह अधिकच ओसंडून वाहिला. शहराचे ग्रामदैवत मानल्या जाणार्या श्री विशाल गणेश मंदिरात सकाळी लवकरच भक्तांची गर्दी झाली होती. फुलांच्या सजावटीने आणि विद्युत रोषणाईने नटलेल्या मंदिरात सर्वत्र भक्तिभावाचे वातावरण होते.
या प्रसंगी देवस्थान समितीचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडित खरपुडे, सचिव अशोक कानडे, महंत संगमनाथ महाराज, विश्वस्त पांडुरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, बापूसाहेब एकाडे, चंद्रकांत फुलारी, विजय कोथिंबिरे, हरीचंद्र गिरमे, ज्ञानेश्वर रासकर, प्रा. माणिक विधाते, संजय चाफे, नितिन पुंड यांसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी अधीक्षक घार्गे म्हणाले की, अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत म्हणून विशाल गणेशाची ओळख केवळ धार्मिक नाही, तर सामाजिक एकतेचे प्रतिक आहे. मंदिरात होत असलेले कार्यक्रम ही भाविकांना एकत्र आणणारी आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारी पर्वणी आहे.
गणेशोत्सवाच्या काळात शिस्त, सुरक्षा आणि स्वच्छता ही आपली जबाबदारी आहे. भक्तांनी शांततेत आणि आनंदात सण साजरा करावा. पोलीस विभाग नेहमी समाजाच्या सोबत उभा आहे. दरम्यान, यावेळी ग्रामदैवत श्री विशाल गणेशाच्या आरती चे प्रकाशन अधीक्षक घार्गे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आरतीचे रचयिता महंत संगमनाथ महाराज व मान्यवर उपस्थित होते.
दहा दिवस विविध कार्यक्रम
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक उपक्रम आणि आनंदाचा पर्व आहे. यंदाही अहिल्यानगरमध्ये गणेशोत्सवाची सुरूवात दिमाखात झाली असून पुढील दहा दिवस शहरात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.




