अहिल्यानगर (प्रतिनिधी)
रात्रीच्या सुमारास मेंढपाळाच्या पालावर दरोडा टाकणार्या टोळीचा अखेर छडा लागला असून, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच संशयित आरोपींना अटक करून तब्बल 3 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि मोटारसायकलींचा समावेश आहे. या कारवाईत विळद (ता. जि. अहिल्यानगर) व मांजरी (ता. गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) शिवारातील दोन वेगवेगळ्या दरोड्यांचा उलगडा झाला आहे.
9 जून रोजी पोपट बन्सी होडगर (वय 35, रा. पिंप्री घुमट, विळद) हे त्यांच्या कुटुंबीयांसह शेतात पालात झोपले असताना, 6 ते 7 अज्ञात दरोडेखोरांनी लाकडी दांडके व चाकूच्या धाकाने मारहाण करत जबरी चोरी केली. या घटनेत त्यांच्या पत्नीचे दागिने लुटण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात याबाबत दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विशेष तपास सुरु केला. पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरु ठेवला. रविवारी (15 जून) पांढरीपुल येथे सापळा रचून पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये भैय्या कडू काळे (वय 18, रा. शिरोडी, ता. गंगापूर), ताराचंद विरूपन भोसले (वय 35, रा. गाजगाव, ता. गंगापूर), किसन उर्फ विजय गौतम काळे (वय 23, रा. पानसवाडी, ता. नेवासा), नागेश विरूपन भोसले (वय 20, रा. गाजगाव, ता. गंगापूर), सोनुल लक्षरी भोसले (वय 19, रा. बिडकीन, छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे. अटकेतील संशयित आरोपींकडून 12 ग्रॅम सोन्याचे दागिने, चार मोबाईल, दोन मोटारसायकल असा एकूण 3 लाख 4 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीतील बदाम काळे, रघुवीर भोसले व महेश काळे हे तीन संशयित आरोपी अद्याप पसार आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.
तपासादरम्यान संशयित आरोपींनी विळद येथील दरोड्यासह मांजरी (ता. गंगापूर) येथील मेंढपाळाच्या पालावरही दरोडा टाकल्याची कबुली दिली असून, संबंधित घटनेबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. पोलीस अधीक्षक घार्गे, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, निरीक्षक आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बिरप्पा करमल, गणेश धोत्रे, सुनील मालणकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, अमृत आढाव, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, चंद्रकांत कुसळकर व अरूण मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.




