अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या तीन वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यात कुणबी व कुणबी-मराठा नोंदी शोधणे आणि त्याआधारे जात प्रमाणपत्रे देण्याच्या प्रक्रियेने मोठा वेग घेतला आहे. 24 ऑक्टोबर 2023 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेत जिल्ह्यात 1 लाख 50 हजार 606 कुणबी नोंदी शोधण्यात यश आले असून या सर्व नोंदींचे स्कॅनिंग करून त्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आल्या आहेत.
याच कालावधीत जिल्ह्यात जात प्रमाणपत्रासाठी 1 लाख 90 हजार 807 अर्ज प्राप्त झाले होते. प्रशासनाने अत्यंत तत्परतेने यातील 1 लाख 90 हजार 248 अर्जांवर कार्यवाही करत प्रमाणपत्रे निर्गमित (वाटप) केली आहेत. सद्यःस्थितीत जिल्ह्यात केवळ 430 अर्ज प्रलंबित असून 129 अर्ज त्रुटींअभावी नामंजूर करण्यात आले आहेत. सर्व तालुक्यांमध्ये अपील प्रकरणांची संख्या शून्य असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण 1.90 लाखांहून अधिक अर्जांपैकी केवळ 430 प्रकरणे प्रलंबित असून, कागदपत्रांची पडताळणी करून ही प्रमाणपत्रेही लवकरच वितरित केली जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
तालुकानिहाय प्रमाणपत्र
नगर 20 हजार 135, नेवासा 13 हजार 169, पाथर्डी 16 हजार 133, शेवगाव 17 हजार 699, संगमनेर 19 हजार 926, अकोले 8 हजार 807, श्रीरामपूर 8 हजार 694, राहुरी 14 हजार 813, कर्जत 17 हजार 502, जामखेड 14 हजार 322, श्रीगोंदा 12 हजार 552, पारनेर 17 हजार 680, राहाता 4 हजार 337, कोपरगाव 4 हजार 479 असे 1 लाख 90 हजार 248 प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आलेले आहे.
पारनेरमध्ये नोंदी आणि नगरमध्ये सर्वाधिक अर्ज
जिल्ह्यात सर्वाधिक 31 हजार 535 कुणबी नोंदी पारनेर तालुक्यात आढळल्या आहेत. त्यापाठोपाठ श्रीगोंदा 26 हजार 619 आणि जामखेड 25 हजार 41 या तालुक्यांचा आहे. तर अहिल्यानगर तालुक्यात कुणबी नोंदींची संख्या सर्वात कमी 1 हजार 42 असली, तरी येथे सर्वाधिक 20 हजार 227 अर्ज प्राप्त झाले असून 20 हजार 135 प्रमाणपत्रे निर्गमित करण्यात आली आहेत. संगमनेर तालुक्यातही 19 हजार 950 अर्जांपैकी 19 हजार 926 जणांना प्रमाणपत्रे मिळाली आहेत.




