नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहर आणि परिसरात पुन्हा एकदा चाेरट्यांनी डोके वर काढले असून, चोरट्यांचे मुख्य लक्ष्य ज्येष्ठ नागरिक आणि वृद्ध महिला (Women) ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. जुन्या काकतकर हॉस्पिटलजवळ जैन मंदिरातून दर्शन घेऊन घराकडे जाणाऱ्या एका ६४ वर्षीय वृद्धेला जोराचा धक्का देऊन खाली पाडून एक लाख ६० हजार रुपयांची सोन्याची पोत बळजबरीने तोडून नेल्याची धक्कादायक घटना घडली. तर दुसऱ्या घटनेत, महामार्ग बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊन ६६ वर्षीय वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची साखळी चोरट्याने लंपास केली. या दोन वेगवेगळ्या घटनांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या (Citizen) सुरक्षिततेचा प्रश्न पुढे आला आहे.
त्र्यंबक रोड लगत असलेल्या महावीर कॉलनी, गुप्तावाडी कॉर्नर परिसरात मंगळवारी (दि. २०) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. शहरातील चार्टर्ड अकाउंटंट अक्षय राजेंद्र शहा यांच्या आई श्रद्धा शहा (वय ६४) या महावीर कॉलनी येथील जैन मंदिरातून दर्शन घेऊन पायी घराकडे परतत होत्या. गुप्ता वाडी कॉर्नर आणि जुन्या काकतकर हॉस्पिटलजवळ श्रद्धा शहा पोहोचल्या असता, अंधाराचा फायदा घेत समोरून एका पादचारी चोरट्याने त्यांना जोराचा धक्का दिला. धक्का बसल्याने श्रद्धा शहा जमिनीवर कोसळल्या. त्या खाली पडताच चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १ लाख ६० हजार रुपये किमतीची व ३० ग्रॅम वजनाची सोन्याचे पेंडल असलेली पोत बळजबरीने तोडून घेतली आणि पळ काढला. माहिती मिळताच अक्षय शहा यांनी ‘डायल ११२’ वर संपर्क साधला. सरकारवाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम राबवली. अक्षय शहा यांच्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, उल्हासनगर (जि. ठाणे) येथील रहिवासी अशोक श्यामराव पाटील (वय ६६) हे नाशिकमधील (Nashik) जेलरोड येथे नातलगांकडे आले होते. १९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते महामार्ग बसस्थानकावरून उल्हासनगरला जाण्यासाठी कसारा बसमध्ये बसत होते. त्यावेळी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने अशोक पाटील यांच्या नकळत त्यांच्या गळ्यातील ३६ हजार रुपये किमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी (चेन) चपळाईने चोरून नेली. तब्बेत बरी नसल्याने पाटील यांनी सुरुवातीला उल्हासनगर गाठले. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांनी २१ ऑक्टोबर रोजी नाशिक येथे येऊन मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मुंबई नाका पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांचे आवाहन व चिंता
दोन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना आणि वृद्धांना लक्ष्य केले असून बसस्थानके, रेल्वे स्टेशन अशा गर्दीच्या ठिकाणी प्रवाशांनी आपल्या दागिन्यांची व मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. तसेच, रात्रीच्या वेळी एकट्याने वावरणाऱ्या महिलांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जुन्या काकतकर हॉस्पिटल परिसरातील अंधार आणि बस स्थानकातील प्रवाशांची गर्दी चाेरट्यांच्या पथ्यावर पडत असल्याचे या घटनांवरून स्पष्ट होत आहे.




