अहिल्यानगर | प्रतिनिधी | Ahilyanagar
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी टप्प्याटप्प्याने प्रक्रिया सुरू असून नगरपरिषद आणि नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पाठोपाठ मंगळवारी पंचायत समिती सभापती पदाच्या सोडती काढण्यात आल्या. यात कोपरगाव, राहाता, जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, नगरला महिलराज असल्याचे निश्चित झाले आहे. चक्रीय पध्दतीने काढण्यात आलेल्या आरक्षणात यापूर्वीचे आरक्षण विचारत घेऊन नव्याने आरक्षण निश्चित करण्यात आल्याने त्यात संगमनेर, कोपरगाव आणि पाथर्डी या तीन पंचायत समित्यांचे सभापतीपद अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव झाले तर यापूर्वीच राज्यस्तरावरून अकोले पंचायत समिती सभापतीपद जमाती व्यक्तीसाठी राखीव झालेली आहे.
नगरला जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आलेल्या या आरक्षणांमध्ये श्रीरामपूर, शेवगाव, राहुरी, नगर, पारनेर आणि श्रीगोंदा पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निघाले असून यातील नगर, पारनेर आणि श्रीगोंद्यात खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आहे. दरम्यान, आधी राज्य पातळीवरून जिल्हा परिषद अध्यक्षपद, त्यानंतर नगरपरिषद, नगरपंचायत नगराध्यक्षपद आणि त्यानंतर जिल्हा पातळीवर पंचायत समिती सभापती पद काढण्यात आले आहे. आता सर्वांच्या नजरा 13 तारखेला होणार्या जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीच्या गणाच्या आरक्षणाकडे लागल्या आहेत.
जिल्हा पातळीवर काल ग्रामविकास विभागाच्या सुचनेनूसार जिल्हा प्रशासनाने 14 पैकी 13 पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण चिठ्ठीव्दारे काढले. यात सहा ठिकाणी महिला राखीवसह खुले, चार ठिकाणी महिला राखीवसह ओबीसी, अनुसूचित जमाती महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जाती महिला यांचा समावेश आहे. काढण्यात आलेल्या या आरक्षणात कर्जत, राहाता, नेवासा आणि जामखेडमध्ये ओबीसीचे आरक्षण राहणार आहे. यात राहाता, जामखेड या ठिकाणी ओबीसी महिलांना सभापती पदावर विराजमान होण्याची संधी मिळणार आहे. 1996 पासूनच्या चक्रीय आरक्षणाचा विचार केल्याने कोपरगाव पंचायत समिती सभापती पदे अनुसूचित जमाती महिला यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तर पाथर्डी पंचायत समिती अनुसूचित जातीच्या महिला प्रवरगासाठी राहणार आहे. संगमनेरचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित या सभापती आरक्षण सोडतील जिल्हाधिकारी डॉ. पंकजा आशिया, उपजिल्हाधिकारी महसूल शारदा जाधव, तहसीलदार शरद घोरपडे, महसूल सहाय्यक नीता कदम यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुरुवातीला उपजिल्हाधिकारी जाधव यांनी काढण्यात येणार्या आरक्षणाच्या नियमनबाबत प्रस्तावना केली. यात 1996 पासून ते 2009 पर्यंत कोणत्या पंचायत समितीमध्ये काय आरक्षण होते याचा विचार करून त्या ठिकाणी आता सभापती पदाचे आरक्षण काढण्यात येत असल्याचे सांगितले. यात सुरुवातीला संगमनेर, कोपरगाव आणि पाथर्डी हे तालुके अनुसूचित जाती व जमातीसाठी राखीव ठेवण्यात येत असून उर्वरित ठिकाणीच्या आरक्षणासाठी ईश्वरी चिठ्ठ्या काढण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोपरगाव, पाथर्डी, संगमनेर वगळून चिठ्ठीचा कौल
राज्य यापूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या अध्यक्षपदाच्या आरक्षणाच्या वेळीच राज्यातील 13 पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमातीसाठी राखीव करण्यात आले होते यात नगर जिल्ह्यातील अकोले पंचायत समितीचा समावेश असल्याने नगरला जिल्हा पातळीवर झालेल्या सभापती पदाच्या आरक्षणावेळी अकोले वगळून उर्वरित 13 पंचायत समितीच्या अंतर्गत येणार्या लोकसंख्येचा विचार करून सभापती पदाचे आरक्षण काढण्यात आलेले आहे. हे आरक्षण काढताना कोपरगाव, पाथर्डी, संगमनेर या पंचायत समितींना वगळून उर्वरित ठिकाणी चक्रीय पद्धतीने ओबीसी व खुल्या प्रवर्गाचे आरक्षण काढण्यात आले.
सदस्य पदाचे आरक्षण सुधारित पध्दतीने
पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण काढतांना ग्रामविकास विभागाच्या वतीने दिलेल्या सूचनांच्या आधारे व लोकसंख्येच्या प्रमाणात हे आरक्षण काढण्यात आलेले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष पद व पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण हे 1962 च्या जुन्या चक्रीय पद्धतीच्या नियमानुसार काढण्यात आलेले असून 13 तारखेला काढण्यात येणारे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण 2025 च्या सुधारित नियमानुसार काढण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
डावखुर्या शहाबाजने काढल्या चिठ्या
नगरच्या बोल्हेगाव येथील शहाबाज पटेल या बालकाच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या. त्याने डाव्या हाताने आरक्षण चिठ्ठ्या काढण्यास सुरूवात केली. यात नऊपैकी चार पंचायत समितीच्या ओबीसी आरक्षणानुसार सभापतीची निवड करण्यात आली. यात कर्जत, जामखेड, राहाता आणि नेवासा येथील सभापती पदाचे आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. त्यानंतर पुन्हा या पंचायत समितीमधून राहाता आणि जामखेड या ठिकाणी महिला ओबीसी सभापती पदाच्या सोडती काढण्यात आल्या.
या ठिकाणी खुल्या प्रवर्गाला संधी
आरक्षण सोडतीच्या शेवटच्या टप्प्यात सर्वसाधारण प्रवर्गातील सभापतींसाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या. यात श्रीरामपूर, राहुरी, श्रीगोंदा, नगर, शेवगाव आणि पारनेर चे सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गातील व्यक्तीसाठी खुले करण्यात आले. यात नगर, श्रीगोंदा पारनेर या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी सभापतीपद राहणार आहे.
असे आहे आरक्षण
संगमनेर अनुसूचित जाती व्यक्ती, कोपरगाव अनुसूचित जमाती महिला, कर्जत ओबीसी व्यक्ती, राहता ओबीसी महिला, श्रीरामपूर सर्वसाधारण, नेवासा ओबीसी व्यक्ती, शेवगाव सर्वसाधारण व्यक्ती, पाथर्डी अनुसूचित जाती महिला, राहुरी सर्वसाधारण व्यक्ती, नगर सर्वसाधारण महिला, जामखेड ओबीसी महिला, श्रीगोंदा सर्वसाधारण महिला आणि अकोले अनुसूचित जमाती यांचा समावेश आहे.
आधी सभापती आणि नंतर गणाचे आरक्षण
ग्रामविकास विभागाच्यावतीने काढण्यात आलेल्या पंचायत समितीच्या सभापती पदाच्या आरक्षणापूर्वी पंचायत समितीच्या गणाचे आरक्षण काढणे आवश्यक होते. येत्या 13 तारेखला गट आणि गणाच्या सदस्याचे आरक्षण काढण्यात येणार आहे. या आरक्षणात संबंधीत पंचायत समितीच्या सर्व गणात सभापती पदासाठी जाहीर झालेल्या आरक्षणानूसार असणे आरक्षण आवश्यक आहे. अन्यथा कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यापूर्वी असा प्रकार काही वर्षापूर्वी श्रीगोंदा पंचायत समितीच्या बाबतीत घडला होता. त्यावेळी सभापती पदाचे काढलेल्या आरक्षणापैकी संबंधीत पंचायत समितीच्या गणात एकही आरक्षण नव्हते. यामुळे सरकारला या पंचायत समितीमधील आरक्षण बदलण्याची वेळ आली होती, अशी आठवण माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी नगरच्या सभापती आरक्षण सोडती दरम्यान करून दिली. तसेच मागासवर्गीयचे आरक्षण एकमेंकामध्ये वर्ग होवू शकते. मात्र, मागसवर्गीयांच्या जागेवर खुले आरक्षण वर्ग होवू शकत नाही, ही बाब जिल्हा प्रशासनाने ग्रामविकास विभाग व राज्य निवडणूक आयोगाला कळवण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले आणि रामदास भोर यांनी केली.
श्रीरामपूरकर भाग्यवान
श्रीरामपूर पंचायत समिती सभापतीनपद सर्वसाधारण व्यक्तीसाठी निश्चित झाले आहे. लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने हा तालुका नागरिकांचा मागस प्रवर्गात केवळ चार वेळा हे आरक्षण आल्याने यंदाच्या चक्रीय पद्धतीनुसार तो वगळला गेला. त्यामुळे या पंचायत समितीचे सभापतीपद यंदा थेट सर्वसाधारण व्यक्तीसाठी निश्चित झाले. श्रीरामपूर नगरपंचायत पाठोपाठ पंचायत समिती खुल्या प्रवर्गासाठी असल्याने श्रीरामपूरकर भाग्यवान ठरले आहेत




